संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥

तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥

रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥

भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥

विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥

निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥