गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


व्यासजन्मकथन

आपल्या प्रतिज्ञांमुळे भीष्माला आईच्या म्हणण्याचा स्वीकार करता आला नाही. या विषयावर उभयतांचे बोलणे सुरु असताना सत्यवतीला वाटले की, भीष्माला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राबद्दल सांगावे. तिने या पुत्राबद्दल पूर्वी कुणालाच सांगितले नव्हते. तिचे राजा शंतनूशी लग्न होण्यापूर्वी ती मत्स्यगंधा नावाची धीवरकन्या होती. एकदा ती तिच्या वडिलांची नाव चालवीत असताना अचानक पराशर नावाचे श्रेष्ठ मुनी नदीपार जाण्याकरिता तिच्या नावेत आले. तिच्या रुपावर ते भाळले. ऋषींच्या तेजामुळे ती प्रभावित झाली. त्यांचेपासून तिला जो पुत्र झाला तो कृष्ण द्वैपायन व्यास. त्या तेजस्वी पुत्राला ते पराशर मुनी आपल्यासोबत घेऊन गेले. तो फार मोठा तपस्वी व महर्षी झाला. त्याने मातेला सांगितले होते की त्याचे केवळ स्मरण करताच तो (तपोबलामुळे) मातेसमोर उपस्थित होईल.

व्यासजन्मकथन

शांतनवा मी अजुन कुणाला कथिले ना मनिचे ।

वृत्त हे माझ्या पुत्राचे ॥धृ॥

विदित तुला मी दाशकन्यका

असे पित्याची माझ्या नौका

पार नदीच्या नेई पथिका

दाश-नृपाच्या भवानी गेले दिवस सुता सौख्याचे ॥१॥

गंगेचा तू माझाही सुत

आज तुझ्या मी कानी घालत

कौमार्यातच घडले अवचित

धैर्य लाभले आज मला ते सत्य सांगण्याचे ॥२॥

धीवरकन्या म्हणुन वाढले

वनश्रीत मी होते रमले

रुप खरोखर होते आगळे

मत्स्यगंध परि होता शरिरा, शल्य असे त्याचे ॥३॥

मीहि कधी ती नाव चालवी

एके दिवशी आले तपस्वी

मुनी पराशर चढले नावीं

उभी राहिली निश्चल पाहुन प्रखर तेज त्यांचे ॥४॥

पाहुन मजसी मोहित झाले

मधुरमधुरसे काही बोलले

प्रेमभरे त्या मला स्पर्शिले

मीही भुलले, भयहि वाटले त्यांच्या शापाचे ॥५॥

त्यांचेपासुन पुत्र लाभला

कौमार्यातच गंधवतीला

घेऊन गेले मुनी तयाला

तोच जाहला महान योगी व्यास नाम ज्याचे ॥६॥

पराशरांनी दिला वर मला

मत्स्यगंध त्यामुळे लोपला

कन्याभावहि पुन्हा अर्पिला

मातृभक्‍त द्वैपायन माझा, स्मरण येइ त्याचे ॥७॥