गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


भीम-विषप्रयोग

पांडू राजाची हस्तिनापुरात उत्तरक्रिया पार पाडल्यानंतर व्यास आपली माता सत्यवती हीस भेटले. पुढे येणार्‍या काळात अनर्थ घडेल हे व्यासांनी अंतर्ज्ञानाने जाणले व मातेला वनात जाऊन तप करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सत्यवती आपल्या दोन सुनांसह वनात गेली.

इकडे धृतराष्ट्राच्या छत्राखाली सर्व कौरव व पाच पांडव एकत्र वाढत होते. ते एकत्र खेळत असताना बलशाली भीमसेन दांडगाई करी. एकाच वेळी अनेक कौरवांना जमिनीवरुन ओढत नेई; त्यांचे खांदे, गुडघे खरचटले जात, पाण्यात खेळताना तो दहा दहा कौरवांना हाताने धरुन बुडवीत असे व ते गुदमरले की त्यांना वर आणीत असे. ह्या वागण्यामुळे तो त्यांना आवडेनासा झाला व ते त्याला घाबरु लागले. भीम बालसुलभ पोरकटपणामुळे असे वागत होता, द्वेषाने नव्हे. पण ही भीमाची अचाट शक्‍ती पाहून दुर्योधनाच्या मनात मात्र दुष्टभाव येऊ लागला. भीमाशी तो द्वेषाने वागू लागला. राजवैभवात कोणी वाटेकरी नसावे असे त्याला वाटू लागले. भीमाला विष देऊन मारण्याचा बेत त्याने रचला. भीमाला बाजूला केले की इतर पांडवांना कैदेत टाकून राज्य आपल्यालाच मिळवता येईल असा दुष्ट विचार त्याने मनात पक्का केला. त्याप्रमाणे अन्नातून भीमाला विष देऊन त्याला नदीत फेकून दिले. पण सुदैवाने भीम वाचला.

 

भीम-विषप्रयोग

खेळती कुमार प्रसादात

बालवयातच झाली त्यांच्या कलहाला सुरवात ॥धृ॥

कौरव पांडव सवे खेळती

पाचहि पांडव उजवे ठरती

भीमबलाला कौरव भीती

ओढित नेई दहा कुमारा त्याचा एकच हात ॥१॥

काखी घेऊन दहाजणांना

जळात बुडवी बळे तयांना

गुदमरल्यावर सोडी त्यांना

भीती धरुनी दूर धावती पाहुन शक्‍ति अचाट ॥२॥

फळे काढण्या झाडावरुनी

कुमार जाती वरती चढुनी

झाडे हलवी भीम करांनी

कौरव पडती फांदीवरुनी एकापाठोपाठ ॥३॥

मनात योजी दुष्ट सुयोधन

भीमा मारिन विषान्न देउन

करीन कैदी ते धर्मार्जुन

होइन राजा ह्या पृथ्वीचा करुन रिपूवर मात ॥४॥

ओठी साखर हृदय विषारी

रचे सुयोधन डाव अंतरी

उदक-क्रीडन भवन उभारी

जळातल्या क्रीडेस बोलवी सजवुन गंगाकाठ ॥५॥

जमुनी सगळे घेती भोजन

भीमा भरवी स्वये सुयोधन

अन्नामध्ये वीष कालवुन

भीमही खाई अजाणता ते, ग्लानी परि शरिरात ॥६॥

भवन सोडिती क्रीडेसाठी

कमलसुशोभित जळी उतरती

नाचत खिदळत खेळ खेळती

शिणलेले ते वस्त्र लेवुनी, घेत विसावा शांत ॥७॥

भीमाला ये प्रगाढ निद्रा

वीष व्यापिते सर्व शरीरा

सुयोधनाची हर्षित मुद्रा

वेलींनी बांधून देह तो ढकलुन देति जळात ॥८॥

भीमदेह जाताच तळाशी

सर्पदंश ते झाले त्यासी

नसे वेदना त्या शरिरासी

नागविषाने वीष मारिले, येइ जीव देहात ॥९॥

दुर्मुख झाले सगळे कौरव

पाहताच तो जिवंत पांडव

विदुर सांगतो आहे संभव

उपाय शोधिल पुन्हा सुयोधन करण्या तुमचा घात ॥१०॥