गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


हिडिम्बेचे निवेदन

लाक्षागृह जळून खाक झाले. पौरजनांनी सकाळी बघितले व त्यांचा समज झाला की पांडव आगीत निधन पावले आहेत. निषाद स्त्री तेथे आल्याचे कुणालाच माहीत नव्हते. पुरोचन पांडवांना मारणार होता पण तोच जळून गेला होता. पांडवांबद्दल दुःखद वार्ता कळताच हस्तिनापुरात प्रजेला वाईट वाटले. धृतराष्ट्राने उत्तरक्रिया वगैरे केल्या. पांडव तेथून जिवंत बाहेर पडल्यानंतर लपतछपत वनातच हिंडत राहिले. दुर्योधन घातपात करील अशी त्यांना भीती होती. त्या वनात हिडिम्ब नावाचा नरभक्षक राक्षस आपल्या हिडिम्बा नावाच्या बहिणीसह राहात होता. त्याला मनुष्यप्राण्याचा वास येत असे व माग काढीत तो त्यांची शिकार करीत असे. हिडिम्बा त्याच्या आज्ञेने मनुष्यांच्या शोधात फिरत असताना पांडव जिथे झोपले होते तेथे आली. भीम जागा राहून पहारा देत होता. बलशाली भीमाला पाहताच हिडिम्बेचे मन त्याच्यावर जडले. तिने भीमाला आपल मनोगत स्पष्टच सांगितले.

हिडिम्बेचे निवेदन

कोठुन आला नरवर आपण इथे अशा या वनी

राजलक्षणे दिसती मजला मोहित होते मनी ॥धृ॥

कोण पुरुष हे इथे झोपले ?

कांतिमान किती दिसती सगळे

वृद्धेलाही वनात आणले

शूर भासता, परी गृहाला आले का सोडुनी ? ॥१॥

हिडिंब राक्षस स्वामी इथला

नरमांसाचा असे भुकेला

वासावरुनी शंका त्याला

मला धाडिले वनी पाहण्या आहे का नर कुणी ? ॥२॥

मेघाहुनही कभिन्न काळा

केसांचा शिरि रंग तांबडा

ओठापुढती असती दाढा

क्रूर अती हा बंधू माझा, जा लवकर येथुनी ॥३॥

देवतुल्य हे तेज आपले

शरीरसौष्ठव आज पाहिले

मुखा पाहता भान न उरले

मनात मी ठरविले साजणा, तुम्ही पती जीवनी ॥४॥

मदनाने मी जर्जर निश्चित

सागरजल मी, चंद्रा पाहत

स्वीकारा मज हे मी विनवित

भाव हृदयिचे जाणुन आपण घ्यावा निर्णय झणि ॥५॥

नाव हिडिंबा राक्षसीण मी

बळ असुरांचे, इच्छागामी

येण्याआधी तो दुष्कर्मी

स्कंधावरती नेइन आपणा, चला चला येथुनी ॥६॥

जशि चंद्राच्या निकट रोहिणी

तसे राहु या रम्य उपवनी

रुप मानवी धारण करुनी

वाहिन्मी सेवेची पुष्पे गंधित ह्या चरणी ॥७॥

नकाच राहू यांना सोडुन

उठवा त्यांना त्या निद्रेतुन

करा जिवाचे अपुल्या रक्षण

स्थळी सुरक्षित या सर्वांना नेइन दुरवर वनी ॥८॥

पुनःपुन्हा मातेसी विनविन

"जाणा स्त्रीचे जडलेले मन

सुतास अपुल्या प्राणहि अर्पिन"

चरणाशी मी बसता त्यांच्या घेतिल स्वीकारुनी ॥९॥