गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


कीचकवध

यमधर्माने चारही पांडवांना जिवंत केल्यानंतर त्यांना विराटगृही राहून अज्ञातवास काढा असा त्याने आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे विराट राजाकडे जाऊन पांडवांनी आश्रय मिळविला. आपण पांडवांकडे सेवक म्हणून काम केल्याचे सांगून वेगवेगळी कामे मिळविली. एक वर्षाचा काळ गुप्त राहून काढायचा होता. युधिष्ठिर द्यूतक्रीडा प्रवीण कंक म्हणून, भीम आचारी म्हणून तेथे राहिला. बृहन्नडा नाव धारण करुन राज्यकन्येला नृत्य शिकविण्याच्या कामी अर्जुन, गुरांचा अधिकारी म्हणून सहदेव, अश्वांची देखरेख करणारा म्हणून नकुल व सैरन्ध्री हे नाव धारण करुन सुदेष्णा राणीची दासी म्हणून द्रौपदी असे सर्व तेथे राहू लागले. सुदेष्णेचा भाऊ व सेनापती असलेला कीचक हा फार कामुक वृत्तीचा व दुष्ट होता. तो द्रोपदीवर भाळला व तिला त्रास देऊ लागला. तिने त्याला सांगून ठेवले होते की तिला पाच गंधर्व पती असून ते त्याला शिक्षा करतील. तिने त्याला सांगून ठेवले होते की तिला पाच गंधर्व पती असून ते त्याला शिक्षा करतील. पण त्याचा दुराचार वाढतच गेला. एकदा भांडणात त्याने तिला लाथही मारली. शेवटी द्रौपदीने व भीमाने मिळून एक डाव रचला. त्याच्या मागणीप्रमाणे तिने त्याला मध्यरात्री एके ठिकाणी एकांतात भेटण्याचे कबूल केले. ठरलेल्या महालात तिच्याऐवजी भीम तेथे गेला व त्याने त्या दुष्टाला ठार केले. गंधर्वाने त्याला मारल्याची वदंता सर्वत्र पसरली.

कीचकवध

विराटगृही राहिले एक वर्ष

रुपे पालटूनी नव्या भूमिकेत

कुणी कङ्‌क बल्लव कुणी होय नर्तक

कुणा ज्ञात नच हे खरे पांडुसूत ॥१॥

सुदेष्णा असे पट्टराणी नृपाची

तिची एक दासी बने याज्ञसेनी

तिची वस्त्रं साधी परी रुप दैवी

पडे मोहिनी स्त्रीसही ते बघोनी ॥२॥

तिला पाहिले दुष्ट सेनापतीने

महाराणिच्या बंधुने कीचकाने

करी आर्जवे तो तिची वासनेने

क्षणी निन्दिले त्यास त्या मानिनीने ॥३॥

तिला मारिली लाथ दासी म्हणोनी

पुन्हा कलह होताच त्या राक्षसाने

असे क्लेश भोगीत भीमास भेटे

विलापात सांगे तया गुप्ततेने ॥४॥

"तिथे धर्म सम्राट आज्ञा जयाची

शिरी वाहती मंडळे भूपतिंची

इथे सेवकाचे करी काम राजा

फळे भोगतो कोणत्या पातकाची ? ॥५॥

जिच्या धावती मागुनी दासदासी

इथे सेविका ती करि क्षुद्रकृत्ये

रथी एकटा पार्थ जिंकी रिपुंना

इथे राजकन्येस शिकवीत नृत्ये ॥६॥

वनीची स्थिती ती सहनीय होती

तिथे दास्य नव्हते कुणाचेहि करणे

इथे क्लेश अत्यंत हृदयास चिंता

कसा काळ जाईल हा गुप्ततेने ॥७॥

तया कामुका टाकुनी बोलले मी

"मला पाच गंधर्व असती भ्रतार

तुझी नीच कृत्ये कळता भ्रतार

इथे तत्क्षणी तूज करतील ठार" ॥८॥

तया कीचका गाठिला नृत्यकक्षी

रचूनी कटा गुप्त वायूसुताने

निशाकाल एकान्त पाहून त्याने

जिवे मारिला दुष्ट बाहूबलाने ॥९॥

निशाकालि गंधर्व आला महाली

झणि मारिले ठार सेनापतीला

प्रभाती असे वृत्त कळले प्रजेला

असे पार कृष्णा करी संकटाला ॥१०॥