गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


कृष्ण्साहाय्य

अज्ञातवास संपवून पांडव द्यूताच्या वेळी ठरलेल्या करारातून मुक्‍त झाले. तेरा वर्षांचा काळ खरोखर पूर्ण झाला की नाही याबद्दल थोडा वाद झाला पण भीष्मांनी काळ पूर्ण झाल्याचा निर्णय दिला. अभिमन्यू व विराटाची कन्या उत्तरा यांचा विवाह झाला. द्यूतात गेलेले राज्य पांडवांना परत मिळाले पाहिजे असे कृष्ण, द्रुपद, विराट, सात्यकी इत्यादी मान्यवरांना वाटत होते. दुर्योधनाची दुष्ट वृत्ती व राज्यलोलुपता पाहाता तो सहजासहजी राज्य देणार नाही याची कल्पना पांडवांना होती. म्हणून दूत पाठवून वाटाघाटी करण्याचे ठरले. दुर्योधन सत्ता मिळाल्यापासून अनेक राजांना मान व वित्त देऊन वश करुन घेत होता. आपली सैन्याची शक्‍ती विविध उपायांनी वाढवीत होता. त्यानुसार त्याने लष्करी मदत मिळविण्याच्या दृष्टीने कृष्णाची भेट घेण्याचे ठरवले. पांडवांना युद्ध नको होते परंतु कौरवांच्या हालचाली बघता निष्क्रिय राहुनही चालणार नव्हते. दोन्ही पक्ष आपले मित्र असलेल्या राजांना युद्धासाठी साहाय्याचे आवाहन करीत होते. कृष्णाकडे मदत मागण्यासाठी अर्जुनहि द्वारकेला आला. दुर्योधन आधी आला व तो निजलेल्या कृष्णाच्या डोक्याजवळ बसला. अर्जुन कृष्णाच्या पायाजवळ बसला त्यामुळे जागे झाल्यावर तो कृष्णाला प्रथम दिसला. कुणाला कसे साह्य करावे हा कृष्णापुढे प्रश्नच होता. पण कृष्णाने तो प्रश्न मोठया चातुर्याने सोडवला.

कृष्ण्साहाय्य

अज्ञाताचे पर्व संपले दिसली ना वाट

युद्धाचे ढग धूसर कळे जमले गगनात ॥१॥

तेरा वर्षे सुयोधनाचे चिंतन हे चित्ती

अफाट जमवुन सैन्या होइन अजिंक्य मी जगती ॥२॥

पांडवासवे राहिन ना मी राज्य विभागून

ते किंवा मी असू अधिपती राज्याचे पूर्ण ॥३॥

द्वारकेस जाऊन भेटतो मधूसूदनास

पार्थाशी जरि सख्य तयाचे प्रार्थिन मी त्यास ॥४॥

येत कुरुपती कृष्णापाशी, तो परि निद्रेत

बसे उशाशी स्तब्ध, बघतसे उठण्याची वाट ॥५॥

तेवढयात तो साह्य मागण्या अर्जुनही आला

प्रेमभराने पाहत कृष्णा, पायाशी बसला ॥६॥

’साह्य करावे, आलो आधी’ अपुल्या दाराशी

दुर्योधन मागतो मागणे जनार्दनापाशी ॥७॥

’मीही आलो साह्य मागण्या’ म्हणे गुडाकेश

आदर करुनी त्या दोघांचा सांगे जगदीश ॥८॥

"प्रथम जरी आलास कौरवा परि या नयनांना

पार्थच दिसला प्रथम म्हणोनी हक्कही दोघांना ॥९॥

शस्त्राविण मी - अथवा सेना - निवडावे यातुनी

पहिला देतो हक्क अर्जुना कनिष्ठ तो म्हणुनी" ॥१०॥

प्रेमभरे पाहून धनंजय बोले कृष्णाला

"शस्त्रहीन जरि तूच हवा परि माझ्या पक्षाला" ॥११॥

आनंदाने भरुन आले हृदय कौरवाचे

इच्छित होते तेच मिळाले - सैन्य द्वारकेचे ॥१२॥

"तुष्ट असे मी द्वारकाधिशा, सैन्य देई मजला’

धन्यवाद देऊन सुयोधन भेटे रामाला ॥१३॥

यादव सैनिक रणात लढतिल त्यांच्या कृष्णाशी

स्तंभित होई चित्त, पाहता दैवगती ही अशी ॥१४॥