गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


संजय-भाषण

द्रुपदपुरोहित पांडवांतर्फे धृतराष्ट्राला भेटून आल्यावर कौरवांतर्फे धृतराष्ट्राचा निरोप सांगण्यासीं संजय पांडवांकडे आला. त्याने सांगितले की धृतराष्ट्राला ’शम’ हवा आहे. युद्धावर पाळी येऊ नये असेच त्याला वाटते. पांडव स्वभावाने धर्मपरायण, नीतिमान व विचारी आहेत. त्यांच्यापाशी मोठी सेना आहे, पराक्रमी महारथीही आहेत, तसेच युद्धात त्यांचे शौर्यही प्रत्यक्षात येईल पण त्यांच्या सारख्यांनी युद्धासारखे हीन, हिंस्त्र कृत्य करु नये; ते लांच्छनास्पद होईल. युद्ध म्हटले की जय-पराजय आलाच. कोणाचा जय होईल हे सांगता येत नाही. पण कोणाचाही जय झाला तरी तो पराजयासारखाच होणार कारण त्यात ज्ञातिवध होईल व फार मोठी हानी होईल. ज्ञातिवध करुन जगणे हे मरणासमानच ठरणार आहे. दोन्ही पक्ष सामर्थ्य संपन्न आहेत; अशा स्थितीत जय पराजय सारखेच ठरणार आहेत. कौरवांनी राज्य परत दिले नाही तरी पांडवांनी शांत राहाणे हेच योग्य आहे. कुळाचा नाश करुन राज्य मिळविण्यापेक्षा अंधक व वृष्णी यांच्या राज्यात पांडवांनी भिक्षा मागून जगणे हे अधिक उचित होय. युद्धाने काहीच मिळणार नाही; ते दोन्ही पक्षांना हितावह नाही.

संजय-भाषण

राजाचा हा निरोप तुजसि सांगतो

धर्मराज, तुझा पिता शांति इच्छितो ॥धृ॥

धर्म, भीम, कृष्णार्जुन

करि अपणा मी वंदन

कुशल इथे सकलांचे नृप विचारतो ॥१॥

धरु नका कुणि रोषा

शम व्हावा ही मनिषा

श्रेष्ठ कुळाचे राजा हीत पाहतो ॥२॥

काळ कंठला वनात

धर्मनिष्ठ राहिलात

दया, न्याय, धर्मा तू सतत पाळितो ॥३॥

इहलोकी परलोकी

तोच श्रेष्ठ तोच सुखी

सर्व त्याग करुनी जो धर्म रक्षितो ॥४॥

उभय पक्ष बलवत्तर

रण होइल धुवांधार

जय अजया अर्थ नसे, नाश अटळ तो ॥५॥

राज्याचा भाग तुला

त्यांना जरि नाहि दिला

युद्धाहुन भिक्षेचा मार्ग उचित तो ॥६॥

कीर्ती जो नष्ट करी

विवेकास दूर करी

गीळ असा क्रोध नृपा, हानि करवितो ॥७॥

घोर युद्ध करुन असे

राज्यलाभ योग्य नसे

कीर्तिलोप तुजला का उचित वाटतो ? ॥८॥

इतुका का थांबलास

साह्य लाभले रिपूस

द्यूतातच धडा रिपुस का न दिला तो ? ॥९॥

सर्वानाश रणी असे

दावानल जणु भासे

पराजयासम रणात विजय भासतो ॥१०॥

समराचा महापूर

वाहुन नेईल कूळ

ठाम रहा शांतीवर हेच प्रार्थितो ॥११॥

सर्वांचे हित शमात

संशय कसला न यात

कुरु-सृंजय दोघांचे सौख्य याचितो ॥१२॥