गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


कर्णाचे कृष्णास उत्तर

’आपण खरे कुणाचे ?’ हा प्रश्न कर्णाला जीवनभर सतावीत होता. सूत म्हणून भीम, भीष्म व इतरांकडून हेटाळणी नेहमी त्याने सहन केली होती. त्याचे शौर्यही त्यामुळेच कोणी मानायाला तयार नव्हते. आपण कुंतिपुत्र आहोत हे कळल्याने त्याला फार आनंद झाला. पण तो त्याने व्यक्‍त केला नाही. आता निर्णय काय घ्यायचा हा त्याच्यापुढे फार मोठा प्रश्न होता. ह्या निर्णयाने त्याच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळणार होती. त्याला आपल्य सूतकुळातील मातेचे --- राधेचे ---- प्रांजळ प्रेम आठवले. सूतकन्यांशी त्याचा विवाह झाला होता. त्या आपल्या भार्यांचे जिवापाद प्रेम त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. दुर्योधन राजाला दिलेले मैत्रीचे वचन मोडता कसे येईल याचा विचार आला. पण त्याबरोबर आपण इतर क्षत्रिय राजांच्या तोडीचे आहोत, राजपुत्र आहोत हेही मनात आले. उरलेले आयुष्य सूतपुत्र म्हणून घालवायचे की युधिष्ठिराचा भाऊ म्हणून याविषयी त्याच्या मनात घालमेल झाली. त्याने कर्तव्याचा विचार करुन सूतपुत्र म्हणून कौरव पक्षाकडेच राहायचे ठरवले. कृष्णाला विनविले की हे जन्मरहस्य त्याने कोणालाही --- पांडवांनाही सांगू नये. पांडवांकडे येणे त्याला योग्य वाटले नाही !

कर्णाचे कृष्णाला उत्तर

या जन्माचे गूढ ऐकले, आज कळे माता

माधवा सरली रे चिंता ॥धृ॥

मोठा हा क्षण आयुष्याचा

क्षत्रिय झालो मी सूताचा

राजमुकुट घालण्या पात्रता, मिळे मला आता ॥१॥

येउन मी बंधूस मिळावे

कसे बरे हे मी मानावे

भिस्त कुरुंची असे मजवरि, मी त्यांचा त्राता ॥२॥

प्राणपणाने मजला जपले

मायेच्या पंखात ठेवले

त्यजू कशी ममतेची मूर्ती ती राधामाता ? ॥३॥

पार्थासाथी मला निवडले

सुयोधनाने राज्य अर्पिले

वचन मैत्रिचे दिले नृपाला, पाळिन त्या शब्दा ॥४॥

वध-वंधाची भीति घातली

खूप आमिषे जरी दाविली

कधी न फसविन सुयोधनाला, माझा हितकर्ता ॥५॥

सूतच माझे बांधव झाले

त्या कन्यांशी विवाह केले

स्नेहबंधने अशी तोडणे अशक्य यदुनाथा ॥६॥

ख्यात प्रतिज्ञा ती पार्थाची

माझीही ती पार्थ-वधाची

दुष्कीर्ती होईल आमुची, त्या खोटया ठरता ॥७॥

पांडव माझे बंधू म्हणुनी

स्नेह दाटतो खरोखर मनी

अगम्य येती, मना वेढती नियतीच्या लाटा ॥८॥

गुप्त ठेवी ही गोष्ट माधवा

सांगु नको हे गूढ पांडवा

राज्य मला देईल युधिष्ठिर हे त्यासी कळता ॥९॥

अर्पिन मी ते सुयोधनाला

धर्म योग्य परि राजपदाला

धर्म जिथे जय तेथे मज हे विदित देवकीसुता ॥१०॥

सुयोधनाच्या मोदासाठी

कटू बोललो पांडवाप्रती

खेद होतसे फार मनाला, ती वचने स्मरता ॥११॥

अशुभ अशी स्वप्ने मज पडती;

रणी पडावी माझी आहुती,

मिठीत घेउन अखेरचे रे भेट सूर्यभक्‍ता ॥१२॥