गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


कुंती-कर्ण-संवाद

कर्णाची भेट घेण्यासाठी कुंती भागीरथीतीरी आली. कर्ण मध्यान्हकाळी दोन्ही बाहू वर करुन सूर्याची उपासना करीत होता. कुंती त्याच्या मागे उत्तरियाच्या सावलीत उभी राहून त्याची आराधना संपण्याची वाट पहात होती. कर्णाने जपजाप्य संपताच मागे वळून पाहिले. राजमाता कुंतीला पहाताच तो चकित झाला. कृष्णाची भेट आधी झाल्याने त्याला ही आपली खरी जन्मदात्री माता आहे, हे माहीत होते. त्याने म्हटले----’मी राधेय कर्ण तुला वंदन करतो.’ त्या संवादात कुंतीने आपल्या भावना व्यक्‍त केल्या. त्याचे जन्मरहस्य सांगितले. आपण माता असून सूर्य तुझा पिता आहे हेही सांगितले. ’तू पांडव हे आपले बंधू आहेत हे जाणत नसल्याने, मोहाने कौरवांची संगती धरली आहेस. त्यांना सोडून तू पांडव पक्षात ये, पाच पांडवात तू ज्येष्ठ म्हणून खरोखर शोभशील.’

कुंती-कर्ण-संवाद

ऐकता रणाचे लागुन राही चिंता

भेटण्या तुला रे तळमळते ही माता ॥धृ॥

तुज जन्म दिला मी आहे तू कौंतेय

तू नाहिस कर्णा सूत, नाहि राधेय

कानीन पुत्र तू माझा, तू क्षत्रीय

रवि तुझा पिता जो प्रकाश देई जगता ॥१॥

आगळे तेज ते होते बालमुखाला

अन्‌ कवच-कुंडले होती उपजत तुजला

जपण्यास पित्याच्या कीर्ती चारित्र्याला,

ह्या क्रूर करांनी दूर सारिले तुजला ॥२॥

मातेची ममता कधी कमी ना होते

बंधू हे पांडव तुझे, जाण हे नाते

मज तुमच्यामधले वितुष्ट ना हे रुचते

अर्जून नसे रे रिपू, तुझा तो भ्राता ॥३॥

हे सत्य तुला मी आज सांगते कर्णा

हे गुपित आजवर ज्ञात नसे रे कोणा

तू अज्ञानातुन देशी साथ कुरुंना

हे योग्य नसे तू व्हावे त्यांचा त्राता ॥४॥

तू सोड संगती गांधारीपुत्रांची

जाणती सर्वही लोभी वृत्ती त्यांची

तू भिन्न वृत्तीचा, ओढ तुला सत्याची

तुज काय सांगणे, शास्त्राम्चा तू ज्ञाता ॥५॥

तू दूर राहिला हीच आपुली नियती

तू श्रेष्ठ धनुर्धर झालासी तू नृपती;

नच राहिल दोघा असाध्य काही जगती

तू धनंजयासह एक खरोखर होता ॥६॥

तू ज्येष्ठ तयांचा त्यांना येउन मीळ

धर्माचे वैभव तुझ्या हाती सांभाळ

ते आनंदाने तुला मान देतील

पाहु दे कौरवा पार्थांसह हा भ्राता ॥७॥

तू दान दिले रे दोन्ही या हातांनी

पूजितो भास्करा, वेदशास्त्र तू जाणी

नयनांना दिसला हेच भाग्य मी मानी

तू याचक म्हणुनी आज मान ही माता ॥८॥