गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


दुर्योधनाचे अंतिम शब्द

दुर्योधनाचा पाडाव झाल्यावर भीमाने त्याच्या मस्तकाला लाथाडले. ते धर्मराजाला मुळीच आवडले नाही. बलरामानेही मांडयांवर वार केल्याबद्दल आक्षेप घेतला. तो क्रोधाने भीमावर चालून गेला. कृष्णाने त्याला सांगितले की मैत्रेय ऋषीचा दुर्योधनास शाप होता व भीमानेही ’मी तुझ्या मांडया गदेने चूर करीन’ अशी प्रतिज्ञा घेतली होती. ती प्रतिज्ञा त्याने पूर्ण केली. कृष्णाने बलरामाचे कसेबसे सांत्वन केले. दुर्योधन राजा युद्धात पतन पावल्यामुळे सृंजय, पांचाल व पांडव यांना खूप आनंद झाला. त्यांनी जल्लोष केला. अनेकांनी हे दुष्कर कर्म करुन दाखवल्याबद्दल भीमाचे अभिनंदन केले. युधिष्ठिराने भीमाला दोन शब्द ऐकवून दुर्योधनाजवळ जाऊन म्हटले-----"हे सर्व पूर्वसंचितामुळे घडले आहे. तुझ्या अपराधामुळे ही हानी झाली व आम्हाला युद्ध करणे भाग झाले. तू शोक करु नको. तुला वीराचे मरण आले आहे !" पण कृष्णाने त्याला काही दूषणे देताच दुर्योधनाला राग आला व त्याने कृष्णावर खरमरीत टीका केली. ’मोठाले योद्धे----भीष्म, कर्ण व द्रोण यांना तू अधर्माने मारलेस व माझ्याशीही अधर्मयुद्ध केले. म्हणून पांडवांचा विजय झाला. युद्धनियमांचा भंग करुन तुम्ही लढला व आमचा घात केला.’

दुर्योधनाचे अंतिम शब्द

कृष्णा हे नीचकर्म तुज न शोभले

नियमांचा भंग करुन वीर मारिले ॥धृ॥

धर्माचा घोष तुझा ऐकला सदा

कृतीमधे शाठय परी दिसे सर्वदा

कुटिलपणे रण जिंकुन काय मिळविले ? ॥१॥

भीष्मद्रोणकर्णासम ना जगी कुणी

देवांना ते अजिंक्य केशवा रणी

कपटाचे डाव रचुन त्यास नमविले ॥२॥

भीमाशी लढलो मी प्राणपणाने

केले मी त्या जर्जर ह्याच गदेने

बळ त्याच्या बाहुंचे क्षीण भासले ॥३॥

दोघांचे गदाघात तीव्र जाहले

भीमाने पुनः पुन्हा तुजसि पाहिले

’ऊरुवर करि प्रहार’ तूच सुचविले ॥४॥

सूर्य नभी पृथ्वीवर भीष्म ते तसे

स्वेच्छेने मरण्याचा त्यास वर असे

वंद्य अशा त्यांनाही तूच फसविले ॥५॥

पूर्वी जो स्त्री होता त्या शिखण्डिला

करुन पुढे पार्थाने टाकिले शरा

शस्त्रहीन शांतनवा तूच मारिले ॥६॥

नामसाम्य बघुन तूच गजा मारिले

रणि गेला द्रौणि असे गुरुंस कळविले

वृत्त सत्य मानुन त्या शस्त्र त्यागिले ॥७॥

नेत्र मिटुन द्रोण उभे स्वस्थ त्या रथी

द्रुपदपुत्र वध करण्या येइ दुर्मती

त्या समयी त्या दुष्टा तू न अडविले ॥८॥

भूमीतुन काढि चक्र, शस्त्र ठेवुनी

कर्णाचा घात करी पार्थ त्याक्षणी

धर्मयुद्ध यात तुझे सांग कोठले ? ॥९॥

नियम धरुन करिते जर युद्ध माधवा

वीरमरण येते रे पाच पांडवा

धर्मयुद्ध केले मी, स्वर्ग मज मिळे ॥१०॥