गांधारीने सर्व प्रमुख कौरव-वीरांसाठी शोक व्यक्त केला. शेवटी पुत्रशोकाने तिचे धैर्य गळाले व तिने धरणीवर अंग टकले. भावनावेगात तिने कृष्णाला शाप दिला. ती म्हणाली - 'कृष्णा, तू युद्धात जाणूनबुजून कौरवांची हता होऊ दिली. हे थांबवणे शक्य असूनही तू ते केले नाही. तेव्हा तुझे यादवही असेच निधन पावतील व तुझाही वनात अंत होईल.' हे शब्द ऐकताच सर्व निराश झाले. पुढे कौरव पांडव वीरांची उत्तरक्रिया गंगातीरी करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. वीरांचे योग्य रीतीने दहन करून त्यांना तिलांजली दिली. कर्णाला तिलांजली पांडवांकडून मिळणार नाही कारण त्याचे नाते पांडवांना माहीत नाही, असे कुंतीने जाणले. म्हणून तिने कर्णाचे जन्मरहस्य गंगातिरी युधिष्ठिराला सांगितले. ज्येष्ठ भ्राता आपल्यामुळे रणात ठार झाला. आपण त्याचा वध केला यामुळे धर्माला फार दुःख झाले. तिने इतकी वर्ष हे का गुपित ठेवले हे त्याला कळेना. आपल्या मातेचा त्याला फार राग आला. कर्णाच्या स्त्रियांना त्याने बोलावून घेतले. त्यांच्या उपस्थितीत कर्णाची उत्तरक्रिया केली. पण मातेवरच्या रागामुळे त्याने सबंध स्त्रीजातीला शाप दिला की यापुढे कुठलीच गोष्ट स्त्रियांना गुप्त ठेवता येणार नाही.
धर्माचा शोक
कशाला गुपित असे ठेविले
रणी मी भ्रात्या त्या मारिले ॥धृ॥
स्पर्शु कसे पावन सिंहासन
हात पातकी माझे दारुण
ज्येष्ठ मला तो कुंतीनंदन
तयाचे राज्य असे हे खरे ॥१॥
वचन दिले त्याने तुज शिबिरी
"जीवित सोडिन पांडव चारी
धनंजयाशी लढिन मी परी..."
वचन हे त्याने केले खरे ॥२॥
अवमानाचे घाव सोसले
क्षत्र असोनी सूत ठरविले
तेज तयाचे कुणा न कळले
आज तो बंधू हे जाणले ॥३॥
महाप्रतापी श्रेष्ठ धनुर्धर
कवचकुंडले दिव्य तनूवर
शूर रथींचा रथी खरोखर
रथाचे चाक कसे ग्रासले? ॥४॥
शौर्याचा तो होता पुतळा
तेरा वर्षे झोप न मजला,
म्हणति वीर वैकर्तन पडला
वृत्त हे अशक्य मज वाटले ॥५॥
रहस्य तू लपविले कसे ते
जन्मभरी का जपले माते
उदकसमयि मज आज सांगते
मनाचे सौख्य सदा हरपले ॥६॥
पुत्र, बंधुजन सगळे गेले
शतपट त्याहुन आज उमाळे
कर्णवधाचे मनी वाटले
कुणी गे डोळे हे बांधले ॥७॥
त्याच्या बाणे कापे धरणी
सहू शकेना वीर गे रणी
धनंजयाविण दुसरा कोणी
कसे तू अग्नीला लपविले? ॥८॥
घडले ते तुजमुळे अमंगल
शाप स्त्रियांना ये ओठावर
"त्यांच्यापाशी कधी न राहिल
यापुढे गुपित असे कोठले" ॥९॥
कर्णकटू ते शब्द ऐकती
चारी पांडव अश्रु ढाळिती
भार्यासह अतिदुःखित होती
कुंतिला शोक मुळी नावरे ॥१०॥