गीत महाभारत

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे. गीत महाभारत हे सरल काव्य असून, तो मराठीतील असामान्य प्रयोग आहे.


थोर स्त्रिया

पांचाली गांधारी माद्री सत्यवती कुंती ।

महाभारती थोर स्त्रियांचे भाग्य पतीहाती ॥धृ॥

गांधारी : गांधारीने तप आचरिले

शतपुत्रांच्या वरा मिळविले

दुःखदायि दुर्वर्तन त्यांचे, निधन बघे अंती ॥१॥
धर्माचरणी पतिव्रता ती

अंध पतीची झाली काठी

नेत्र असोनी नेत्रहीन ती जगली तिमिरी सती ॥२॥

कुंती : पट्टराणिपद भूषवि कुंती

शापित होई परी निजपती

वनी कंठले दिवस व्रतातच, गेला परि नृपती ॥३॥

कर्णासाठी मन तळमळले

जतुगृहातुन प्राण वाचले

वनातल्या पुत्रांची चिंता होति सदा चित्ती ॥४॥

माद्री : पतिशापाने दुःखित माद्री

पतीमागुनी वनात गेली

तिच्याच बाहुत कुरुराजाची प्राणज्योत विझली ॥५॥

आत्मदोष मानून साध्विने

देह चितेवर ठेविला तिने

हाति पृथेच्या पुत्र सोपवुन गेली पतिसंगती ॥६॥

सत्यवती : कौमार्यातच झाली माता

गंधवती दाशाची दुहिता

भीष्मत्यागे मिळे राजकुळ, मिळे शंतनू पती ॥७॥

गेले सुत दोघेहि अकाली

पांडुनिधन बघुनी ती खचली

व्यासासंगे जाइ तपास्तव, वनात सत्यवती ॥८॥

द्रौपदी : अग्निशिखेसम जी सम्राज्ञी

सभेत आणली दासी म्हणुनी

विटंबनेतही न्याय मागते शोकाकुल द्रौपदी ॥९॥

परिचर्या करि विराटागृही

निर्घृण वध पुत्रांचा पाही

पार करी नग आपत्तींचे, धैर्याची मूर्ती ॥१०॥