॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां पूर्वी कथानुसंधान । बाबा शिरडींत गुप्त होऊन । चांदपाटलासवें पुनरागमन । जाहलें तें कथन परिसावें ॥१॥
स्वयें बाबांनीं वाहूनि जीवन । केली कैसी बाग निर्माण । गंगागीरादि संतसंमेलन । कथाविंदान पावन तें ॥२॥
पुढें कांहीं कालपर्यंत । बाबा होते जे जाहले गुप्त । मुसलमानाचे वर्हाडांत । आढळलें शिरडींत हें रत्न ॥३॥
तयाआधींच देवीदास । करूनि होते शिरडींत वास । पुढें आले जानकीदास । गोसावी शिरडीस राहावया ॥४॥
तो कैसा घडला प्रकार । कथितों आतां सविस्तर । होऊनियां अवधानपर । श्रोतां सादर परिसिजे ॥५॥
औरंगाबाद जिल्ह्यांतील । धूप खेडेगांवामधील । मुसलमान भाग्यशील । चांदपाटील नांव जया ॥६॥
सफर करितां औरंगाबादेची । घोडी एक हरवली त्याची । दोन महिने दाद न तिची । आतां कशाची आढळते ॥७॥
पाटील पूर्ण निराश झाले । घोडीलागीं बहु हळहळले । खोगीर पाठीवरी मारिलें । माघारां फिरले मार्गानें ॥८॥
औरंगाबाद मागें टाकिलें । साडेचार कोस आले । मार्गांत आंब्याचें झाड लागलें । तळीं दिसलें । तळीं दिसलें हें रत्न ॥९॥
डोईस टोपी अंगांत कफनी । खाकेस सटका तमाखू चुरूनी । तयारी केली चिलीम भरूनी । नवल ते स्थानीं वर्तलें ॥१०॥
चांदपाटील रस्त्यानें जातां । फकीर ऐकिला हांका मारितां । ये रे चिलीम पिऊनि जा पुढतां । छायेखालता बैस जरा ॥११॥
फकीर पुसे हें खोगीर कसलें । पाटील म्हणे जी घोडें हरवलें । मग तो म्हणे जा शोध ते नाले । घोडें सांपडलें तात्काळ ॥१२॥
चांदपाटील विस्मित झाला । मनीं म्हणे अवलिया भेटला । पार नाहीं ह्या कृत्याला । मानव ह्याला म्हणूं नये ॥१३॥
पुढें तो घोडी घेऊनि परतला । पाटील पूर्वस्थळीं पातला । फकीर पासीं बैसवी त्याला । चिमटा उचलिला स्वहस्तें ॥१४॥
मग तो तेथेंचि मातींत खुपसिला । आंतूनि प्रदीप्त निखारा काढिला । हातांतील चिलमीवर ठेविला । सटका घेतला उचलुनी ॥१५॥
पुढे छापी भिजवावयास । पाणी नाहीं जवळपास । सटका आपटी जमिनीस । पाणी निघावयास लागलें ॥१६॥
छापी भिजवूनियां पिळिली । मग ती चिलमीसभोंवती वेष्टिली । स्वयें प्याला तयाही पाजिली । मती गुंगली पाटलाची ॥१७॥
पडला फकीराम आग्रह । पवित्र करा हो माझें गृह । पाटिलावरी केला अनुग्रह । लीलाविग्रहधारकें या ॥१८॥
दुसरे दिवशीं गावांत गेले । पाटिलाच्या येथें उतरले । कांहीं काळ तेथेंचि राहिले । पुढें ते परतले शिरडीस ॥१९॥
हा चांदपाटील कारभारी । धूप खेडयाचा गामाधिकारी । स्वस्त्रीच्या भाच्यालागीं नोवरी । जुळली सोडरीक शिर्डीत ॥२०॥
चांदभाईच्या कुटुंबाचा । लग्नायोग्य जाहला भाचा । सुयोग शरीरसंबंधाचा । घडला शिरडीच्या वधूचा ॥२१॥
घेऊनि सवें गाडया घोडीं । वर्हाड निघालें यावया शिरडीं । मग त्या चांदभाईचे ओढी । बाबाही वर्हाडीं प्रविष्ट ॥२२॥
लगन झालें वर्हाड परतलें । बाबा एकटेचि मागें राहिले । राहिले ते राहूनि गेले । भाग्य उदेलें शिरडीचें ॥२३॥
साई अविनाश पुरातन । नाहीं हिंदू ना यवन । जात पात कुळ गोतहीन । स्वरूप जाण निजबोध ॥२४॥
‘साई साई’ म्हणती जे जन । तें तरी काय नामाभिधान । ‘या साई’ म्हणवूनि बहुमान - । पुर:सर संबोधन जें तें हें ॥२५॥
खंडोबाचे देउळापाशीं । म्हाळसापतीचिया खळियासी । आरंभीं बाबा वर्हाडानिशीं । उतरल्या दिवशीं हें पडलें ॥२६॥
आरंभीं तें भगताचें खळें । पुढें तें अमीनभाईचें झालें । वर्हाड लग्नाचें जें आलें । येथेंचि उतरलें वडातळीं ॥२७॥
गाडया सर्व सुटल्या खळ्यांत । खंडोबाचे पटांगणांत । बाबाही तेथें व्र्हाडासमेत । सर्वासमवेत उतरले ॥२८॥
हे बाल फकीर गाडींतूनि उतरले । प्रथम भगताचे द्दष्टीस जैं पडले । ‘या साई’ म्हणूनि सामोरे गेले । नाम तें पडलें तेथूनि ॥२९॥
पुढें मग तेव्हांपसून । ‘साई साई’ ऐसें म्हणून । मारूं लागले हाकही जन । नामाभिधान तें झालें ॥३०॥
मग ते तेथें चिलीम प्याले । मशिदींत वास्तव्य केलें । देवीदास - सहवासीं रमले । आनंदले शिरडींत ॥३१॥
कधीं बैठक चावडींत । कधीं देवीदासाचे संगतींत । कधीं मारुतीचे देवालयांत । स्वच्छंद रत राहावें ॥३२॥
हे देवीदास शिरडी गांवीं । होते आधींच बाबांचे पूर्वीं । पुढें आले जानकीदास गोसावी । महानुभावी शिरडींत ॥३३॥
तया जानकीदासासवें । महाराजांनीं बोलत बसावें । किंवा महाराज जेथें असावे । तेथें बसावें जानकीदासें ॥३४॥
उभयतांसी मोठें प्रेम । बैठकी होती नित्यनेम । ऐसा तयांचा समागम । सुख परम सकळिकां ॥३५॥
तैसेचि एक गंगागीर । महाप्रसिद्ध वैष्णववीर ॥ गृहस्थाश्रमी पुणतांबेकर । शिरडीस वरचेवर आगमन ॥३६॥
आरंभीं साई विहिरीवरि । उभय हस्तीं मातीच्या घाघरी । पाणी वाही हें देखोनि अंतरीं । आश्चर्य करीत गंगागीर ॥३७॥
ऐसी ही साईची द्दष्टाद्दष्ट । होतांचि बुवा वदले तैं स्पष्ट । धन्य शिरडीचें भाग्य वरिष्ठ । जोडलें श्रेष्ठ हें रत्न ॥३८॥
हा आज खांदां पाणी वाही । परी ही मूर्ति सामान्य नाहीं । होतें या भूमीचें पुण्य कांहीं । तरीच ये ठायीं पातली ॥३९॥
तैसेचि एक आणिक संत । आनंदनाथ नामें विख्यात । तयांचेंही हेंचि भाकित । कर्तृत्व अद्भुत करितील हे ॥४०॥
महाप्रसिद्ध आनंदनथ । येवलें ग्रामीं मठ स्थापीत । कांहीं शिरडीकरांसमवेत । आले ते शिरडींत एकदां ॥४१॥
अक्कलकोटकर महापुरुष । आनंदनाथ तयांचे शिष्य । म्हणाले पाहूनि साईस समक्ष । ‘हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा’ ॥४२॥
आज जरी हा उकिरडयावर । तरी हा हिरा नाहीं गार । आनंदनाथांचे हे उद्नार । बाबांचें पोरवय होतें तों ॥४३॥
ध्यानांत ठेवा हे माझे बोल । पुढें तुम्हांसी आठव येईल । भविष्य कथूनि हें पुढील । मग ते येवल्यासी परतले ॥४४॥
केश माथ्याचे सबंध राखीत । डोकें न कधीं मुंडवीत । पहिलवानासम पेहेराव करीत । तरुण वयांत हे साई ॥४५॥
रहात्यासी बाबा जेव्हां जात । झेंडू जाई जुई आणीत । निजहस्तें उखरीं खुपसीत । पाणीही घालीत नेमानें ॥४६॥
वामन तात्या तयांचे भक्त । मृत्तिकेचे घडे तत्प्रीत्यर्थ । कच्चे दोन प्रत्यहीं पुरवीत । बाबा शिंपीत निजहस्तें ॥४७॥
आडावरील कुंडीमधून । पाणी आणीत खांदां वाहून । घडे मग होतां अस्तमान । ठेवीत नेऊन निंबातळीं ॥४८॥
ठेवण्याचाच अवकाश तेथ । जागचे जागींच भंगूनि जात । उदयीक तात्या आणूनि देत । घडे तयांप्रत नूतन ॥४९॥
घडा भाजला टिकाऊ बरा । परी त्यां लागे कच्चा कोरा । आव्याचे श्रमावीण कुंभारा । आधींच विकरा घडयाचा ॥५०॥
तीन वर्षें हाचि उद्योग । उघडया जागीं उठविला बाग । तेचि स्थानीं आज हा सुयोग । वाडयाचा उपभोग जन घेती ॥५१॥
येथेंचि निंबातळीं साधकां । भाई नामें भक्तें एका । अक्कलकोटच्या स्वामीच्या पादुका । पूजाकामुकां स्थापिल्या ॥५२॥
अक्कलकोटचे स्वामीसमर्थ । होते भाईंचें उपास्यदैवत ॥ छबी पूजन नित्यनियमित । भाई करीत निष्ठेनें ॥५३॥
वाटलें अक्कलकोटीं जावें । पादुकांचें दर्शन घ्यावें । पूजाउपचार समर्पावे । मनोभावें पादुकांसी ॥५४॥
मुंबईहूनि निघावयाची । केली सर्व तयारी साची । उद्यां निघणार तो निश्चय तैसाचि । राहूनि शिरडीची वाट धरिली ॥५५॥
उद्यां जाणर तों आज स्वप्न । स्वामीसमर्थ-आज्ञापन । शिरडीस सांप्रत मम स्थान । तेथें तूं प्रस्थान करीं गा ॥५६॥
ऐशी ती आज्ञा शिरीं वंदून । भाई निघाले मुंबईहून । शिरडीस एक षण्मास राहून । आनंदसंपन्न जाहले ॥५७॥
भाई पूर्ण निष्ठावंत । स्मरणीं रहावा तो द्दष्टांत । म्हणोनि निंबातळीं तेथ । पादुका स्थापीत स्वामींच्या ॥५८॥
शके अठराशें चौतीस सालीं । श्रावण शुद्ध पर्वकाळीं । पादुका स्थापिल्या निंबातळीं । भजनमेळीं सप्रेमें ॥५९॥
दादा केळकरांच्या हस्तें । पादुका - प्रस्थापन करविलें मुहूर्तें । सशास्त्र विधिविधानांतें । केले निजहस्तें उपासनींनीं ॥६०॥
पुढील व्यवस्थेची निरवण । पूजा करी दीक्षित ब्राम्हाण । व्यवस्था पाही भक्त सगुण । ऐसें हें आख्यान पादुकांचें ॥६१॥
ऐसेचि हे संत निर्विकार । प्रत्यक्ष ईश्वरी अवतार । करावया जगदुद्धार । उपकारार्थ अवतरती ॥६२॥
पुढें कांहीं दिवस जातां । घडली आश्चर्यकारक वार्ता । श्रोतीं सादर श्रवण करितां । नवल चित्ता वाटेल ॥६३॥
तांबोळी एक मोहिद्दीन भाई । तयासवें तेढ पडूनि कांहीं । गेली झोंबी जुंपोनि पाहीं । लागली लढाई परस्पर ॥६४॥
पहिलवान दोघे कुशल । होणारापुढें न चले बल । मोहिद्दीन होऊनि प्रबळ । बाबा हतबळ जित झाले ॥६५॥
तेथूनि मग निश्चय केला । पोशाख अवघा बाबांनीं बदलला । कफनी ओढीली लंगोट लाविला । फडका गुंडाळिला माथ्यासी ॥६६॥
केलें गोणाचें वरासन । गोणाचेंचि अंथरूण । फाटकें तुटकें करोनि परिधान । त्यांतचि समाधान मानावें ॥६७॥
"गरीबी अव्वल बादशाही । अमीरीसे लाख सवाई । गरीबोंका अल्ला भाई । अक्षयीं साई वदत कीं" ॥६८॥
गंगागीरही येचि स्थिति । तालिमबाजीची अती प्रीति । एकदां खेळत असतां कुस्ती । जाहली उपरती तयांतें ॥६९॥
प्राप्त काळ घटका आली । एका सिद्धाची वाणी वदली । ‘देवसवेंचि करीत केली । तनू ही झिजविली पाहिजे’ ॥७०॥
कुस्ती खेळतां खेळतां कानीं । पडली अनुग्रहरूप ही वाणी । संसारावर ओतूनि पाणी । परमार्थभजनीं लागले ॥७१॥
पुणतांब्याचिया निकटीं । नदीच्या उभय प्रवाहापोटीं । आहे बुवांचा मठ त्या बेटीं । सेवेसाठीं शिष्यही ॥७२॥
असो पुढें साईनाथ । विचारल्याचेंचि उत्तर देत । स्वयें आपण कोणासमवेत । कधींही बोलत नसत ते ॥७३॥
दिवसा बैथक निंबाखालीं । कधीं शिवेच्या ओढयाजवळी । बाभळीची आडवी डहाळी । बैसावें साउलिये तियेच्या ॥७४॥
कधीं तेथूनि एक मैलावरी । निमगांव गांवाचिया शेजारीं । बाबा दिवसा दुपारीं तिपारीं । स्वेच्छाचारी हिंडत ॥७५॥
प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्याघरीं । निमगांव गांवाची जहागिरदारी । तेथील बाबासाहेब डेंगळ्यांवरी । प्रीति भारी बाबांची ॥७६॥
निमगांवावरी जातां फेरी । बाबानीं जावें तयांचे घरीं । अति प्रेमें तयांबरोबरी । दिवसभरी बोलावें ॥७७॥
बंधु तयांसी होते लहान । नानासाहेब नामाभिधान । तयांसी नव्हतें पुत्रसंतान । तेणें ते खिन्न मानसीं ॥७८॥
प्रथम कुटुंबासी योग मंद । म्हणूनि केला द्वितीय संबंध । तरीही चुकेना ऋणानुबंध । दैवनिर्बंध अगाध ॥७९॥
पुढें साईंचे दर्शनाला । जनसमुदाय लोटूं लागला । महिमा साईंच वाढत गेला । वार्ता नगराला पोहोंचली ॥८१॥
तेथें सरकारदरबारीं चलन । नानांचें होतें मोठें वळण । तैसेचि चिंदबर केशव म्हणून । तेही चिटणीस जाण जिल्ह्याला ॥८२॥
साईसमर्थ दर्शनपात्र । घेऊनि आपुले इष्ट मित्र । दर्शनार्थ यावें पुत्र कलत्र । धाडिलें पत्र तयांसी ॥८३॥
ऐसे एकामागून एका । शिरडीस येऊं लागले अनेक । वाढळा जैसा बाबांचा लौकिक । परिवारही देख तैसाचि ॥८४॥
नलगे जरी कोणाचा सांगात । तरी दिवसा भक्तपरिवराक्रांत । अस्तमानानंतर शिरडींत । पडक्या मशिदींत निजावें ॥८५॥
चिलीम तमाखू टमरेल । अंगांत कफनी पायघोळ । माथ्यासी फडका धवल । सटका जवळ सर्वदा ॥८६॥
तें धूत वस्त्र एक धवल । वामकर्णामागें सुढाळ । जटाजूटसम देऊनि पीळ । गुंडाळी तो शिरासी ॥८७॥
या वसनाचें आच्छादन । आठाठ दिन स्नानविहीन । पायीं जोडा ना वहाण । एक आसन गोणाचें ॥८८॥
पोत्याचा तुकडा एका । तयावरी नित्य बैठक । तक्या कसा तो नाहीं ठाऊक । आराणुक कैसेनी ॥८९॥
तोंवरी तें जीर्ण तरट । तीच त्यांची आवडती बैठक । सदा सर्वदा तैशीच निष्टांक । अष्टौ प्रहा ते जागीं ॥९०॥
तेंचि आसन वा आस्तरण । कांसे एक कौपीन परिधान । नाहीं दुजें वस्त्र प्रावरण । शीतनिवारण एक धुनी ॥९१॥
दक्षिणाभिमुख आसनस्थ । कठडयावरी वाम हस्त । समोर धुनीकडे अवलोकीत । बाबा मशिदींत बैसत ॥९२॥
अहंकार-वासनासमवेती । नानाविध वृत्तींच्या आहुती । प्रपंचप्रवृत्ति समग्र हविती । युक्तिप्रयुक्तीं धुनींत ॥९३॥
ऐसिया त्या प्रखर कुंडा । लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा । ‘अल्ला-मालीक’ सदैव तोंडा । तयाचा झेंडा अखंड ॥९४॥
मशीद तरी ती केउती । अवघी जागा दोन खण ती । त्यांतचि बसती उठती निजती । भेट देती समस्तां ॥९५॥
गादी तक्या हें तों आतां । भक्तसमुदाय मिळाला भवंता । आरंभीं तयांच्या निकट जातां । सकळांस निर्भयता नव्हतीच ॥९६॥
सन एकोणीसशें बारा । तेथूनि नवा प्रकार सारा । मशिदीचिया स्थित्यंतरा । आरंभ खरा तेथूनि ॥९७॥
ढोपर ढोपर जमिनीसी । खड्डे होते मशिदीसी । एके निशींत झाली फरसी । भावासरसी भक्तांच्या ॥९८॥
मशिदीचिया वसती-आधीं । बाबा रहात तकियामधीं । तेथेंचि कित्येक कालावधी । अबाधित रमले ते ॥९९॥
तेथेंचि चरणीं बांधोनि घुंगुर । खंजिरीचिया तालावर । नाचावें बाबांनीं अतिसुंदर । गावेंही मधुर प्रेमानें ॥१००॥
आरंभीं साई समर्थांस । दीपोत्सवाची मोठी हौस । तदर्थ स्वयें दुकानदारांस । तेल मागावयास ते जात ॥१०१॥
घेऊनियां टमरेल हातीं । वाण्यातेल्यांच्या दुकानांप्रती । स्वयें तेलाची भिक्षा मागती । आणूनि भरती पणत्यांत ॥१०२॥
पणत्या लावीत झगझगीत । देउळीं आणि मशिदींत । ऐसें कांहीं दिवसपर्यंत । सदोदित चाललें ॥१०३॥
दीपाराधनीं बहु प्रीत । दिवाळीचाही दीपोत्सव करीत । चिंध्या काढुनी वाती वळीत । दीप उजळीत मशीदीं ॥१०४॥
तेल तों रोज आणीत फुकट । वाणियां मनीं आलें कपट । सर्वांमिळूनि केला कट । पुरे कटकट ही आतां ॥१०५॥
पुढें नित्यनियमानुसारतां । बाबा तेल मागूं येतां । सर्वांनींही नाहीं म्हणतां । काय आश्चर्यता वर्तली ॥१०६॥
बाबा निमुट गेले परत । कांकडे सुकेचि ठेविले पणत्यांत । तेल नसतां हें काय करीत । वाणी पहात मौज ती ॥१०७॥
मशिदीच्या जोत्यावरील । बाबा उचलूनि घेती टमरेल । त्यांत होतें इवलेंसें तेल । कष्टें लागेल सांजवात ॥१०८॥
त्या तेलांत घातलें पाणी । स्वयें बाबा गेले पिऊनी । ऐसें तें ब्रम्हार्पण करूनी । निव्वळ पाणी घेतलें ॥१०९॥
मग तें पाणी पणत्यांत ओतुनी । सुके कांकडे पूर्ण भिजवुनी । तयांसी कांडें ओढूनि लावुनी । दीप पेटवूनि दाविले ॥११०॥
पाहूनि तें पाणी पेटे । वाणी घालिती तोंडांत बोटें । बाबांसी आपण वदलों खोटें । केलें ओखटें मनीं म्हणती ॥१११॥
तेल नसतां अणुमात्र । पणत्या जळाल्या सर्व रात्र । वाणी साईंच्या कृपेसी अपात्र । वदूं सर्वत्र लागले ॥११२॥
बाबांचा हा काय प्रताप । असत्य भाषणें झालें पाप । दिधला बाबांसी व्यर्थ संताप । हा पश्चात्ताप वाणियां ॥११३॥
बाबांच्या तें नाहीं मनीं । रागद्वेषां नातळे जनीं । शुत्र मित्र तयां ना कोणी । सर्वही प्राणी सारिखे ॥११४॥
असो आतां पूर्वानुसंधान । कुस्तींत यशस्वी मोहिद्दीन । याहूनि पुढील चरित्रमहिमान । दत्तावधान परिसिजे ॥११५॥
कुस्तीनंतर पांचवे वर्षीं । फकीर अहमदनगरनिवासी । ‘जव्हाअल्ली’ नाम जयासी । आला रहात्यासी सशिष्य ॥११६॥
पाहूनि एक उघडी बखळ । वीरभद्राचे देउळाजवळ । फकीरानें दिधला तळ । फकीर तो सबळ दैवाचा ॥११७॥
जरी नसता तो दैवाचा । तरी तयातें लाधता कैंचा । साईंसारखा शिष्य मौजेचा । डंका जयाचा सर्वत्र ॥११८॥
लोक गांवांत होते अनेक । त्यांतही होते मराठे कैक । त्यांतील भगू सदाफळ एक । जाहला सेवक तयाचा ॥११९॥
फकीर होता मोठा पढीक । कुराण शरीफ करतलामलक । स्वार्थी परमार्थी आणि भाविक । लागले अनेक तच्चरणीं ॥१२०॥
इदगा बांधावया आरंभ केला । ऐसा कांहीं काळ गेला । वीरभद्रदेव बाटविला । आरोप आला त्याजवरी ॥१२१॥
पुढें तो इदगा बंद पडला । फकीर गांवाबाहेर घालविला । तेथूनि मग तो शिरडीसी आला । मशिदींत राहिला बाबांपाशीं ॥१२२॥
फकीर मोठा मृदुभाषणी । गांव लागला तयाचे भजनीं । बाबांसही कांहीं केली करणी । घातली मोहिनी जन म्हणती ॥१२३॥
हो म्हणे तूं माझा चेला । स्वभाव बाबांचा बहु रंगेला । हूं म्हणतां फकीर संतोषला । घेऊनि निघाला बाबांसी ॥१२४॥
बाबांसारिखा शिष्य सधरू । जव्हारअल्ली जाहले गुरु । मग दोघांचा जाहला विचारू । रहिवास करूं रहात्यांत ॥१२५॥
गुरु नेणे शिष्याची कळा । शिष्य जोण गुरूच्या अवकळा । परीन केव्हांही अनादर केला । स्वधर्म राखिला शिष्याचा ॥१२६॥
गुरुमुखांतूनि बाहेर आलें । "योग्यायोग्य" नाहीं पाहिलें । वचन वरिचेवरी झेलिलें । पाणीही वाहिलें गुरुगृहीं ॥१२७॥
ऐसी चालली गुरुसेवा । शिरडीसी यावें केव्हां । ऐसें होऊं लागलें जेव्हां । काय मग तेव्हां जाहलें ॥१२८॥
ऐसें वरचेवरी होऊं लागलें । रहात्यासचि राहूं लागले । फारचि फकीरा नादीं भरले । वाटलें अंतरले शिरडीला ॥१२९॥
जनांसी वाटे जव्हारअल्ली । साईसी निजयोगबळें आकळी । साईची तोंकळा वेगळी । अभिमान जाळी हेहाचा ॥१३०॥
साईसी कोठूनि आला अभिमान । श्रोते सहज करितील अनुमान । परी हें लोकसंग्रहार्थ आचरण । अवतरणकार्य हेंच ॥१३१॥
शिरडीस्थ बाबांचे प्रेमी भक्त । बाबांचें ठायीं अति आसक्त । तयांतें बाबांपासूनि वियुक्त । राहणें अयुक्त वाटलें ॥१३२॥
साई सर्वस्वी तयांआधीन । पाहूनि ग्रामस्थ उद्विग्न मन । कैसें करावें तयां स्वाधीन । विचारीं निमग्न जाहले ॥१३३॥
जैसें कनक आणि कांति । जैसा दीप आणि दीप्ति । तैसीचि हे गुरुशिष्यस्थिति । ऐक्यप्रतीति उभयांसी ॥१३४॥
मग तें शिरडीचें भक्तमंडळ । गेलें रहात्यास त्या इदग्याजवळ । पाहूं प्रयत्न वेंचूनि प्रबळ । बाबांसह सकळ मग परतूं ॥१३५॥
बाबा तैं देती उलट बुद्धि । "फकीर आहे महाक्रोधी । लागूं नका तयाचे नादीं । तो मज कधींच न विसंबे ॥१३६॥
तुम्ही येथूनि करा पलायन । आतांच येईल गांवांतून । करील तुमचें निसंतान । परम कठीण क्रोध त्याचा ॥१३७॥
राग तयाचा मोठा कडक । येतांचि होईल लालभडक । जा जा निघून जा कीं तडक । धरा कीं सडक शिरडीची" ॥१३८॥
आतां पुढें काय कर्तव्यता । बाबा तों कथिती उलटी कथा । इतुक्यांत फकीर आला अवचिता । जाहला पुसता तयांतें ॥१३९॥
"आलांत काय पोरासाठीं । काय करीतसां तेथें गोष्टी । शिरडीस माधारा न्यावें हें पोटीं । परी या कष्टीं पडूं नका" ॥१४०॥
ऐसें जरी तो प्रथम वदला । ग्रामस्थांपुढें तोही कचरला । म्हणे मलाही घेऊनि चला । सवें मुलाला नेऊं कीं ॥१४१॥
असो फकीर आला सवें । तयासही न बाबांस सोडवे । बाबांसही न तया विसंबबे । न कळे संभवे हें कैसें ॥१४२॥
साई परब्रम्हा पुतळा । जव्हारअल्ली भ्रमाचा भोपळा । देवीदासें कसास लाविला । भोपळा फुटला शिरडींत ॥१४३॥
देवीदासाचा बांधा सुंदर । डोळे सतेज रूप मनोहर । दहा अकार वर्षांचा उमर । प्रथम शिरडीवर आला तैं ॥१४४॥
ऐसा तो अल्प वयासी । एक लंगोट मात्र कासेसी । मारुतीचे देउळासी । तीर्थवासी तो उतरला ॥१४५॥
आप्पा भिल्ल म्हाळसापती । तयाकडे जाती येती । काशीरामादिक शिधा देती । वाढली महती तयाची ॥१४६॥
वर्हाडासमवेत जैं बाबा आले । तया आधींच बारा सालें । देवीदास येऊनि पहिले । बसते जाहले शिरडींत ॥१४७॥
आप्पा भिल्ल पाटीवर शिकवी । व्यंकटेशस्तोत्र पढवी । सर्वांकरवीं मुखोद्नत म्हणवी । पाठ चालवी नेमानें ॥१४८॥
देवीदास महाज्ञानी । गुरुत्व घेतलें तात्याबांनीं । काशीनाथादिक शिष्याग्रणी । तया चरणीं लागले ॥१४९॥
तयापुढें तो फकीर आणिला । शास्त्रीय वादविवाद मांडिला । वैराग्यानें फकीर जिंकिला । हांकूनि लाविला तेथून ॥१५०॥
मग तो जो तेथूनि निसटला । वैजापुरीं जाऊनि राहिला । पुढें कित्येक वर्षांनीं आला । नमस्कारिला साईनाथ ॥१५१॥
आपण गुरु साई चेला । हा सर्व त्याचा भ्रम निरसला । बाबांनींही पूर्ववत सत्कारिला । शुद्ध जाहला पश्चात्तापें ॥१५२॥
ऐसी बाबांची अगाध लीला । निवाड होण्याचा तेव्हां झाला । परी तो गुरु आपण चेला । भाव हा आदरिला तेथवर ॥१५३॥
तयाचें गुरुपण तयाला । आपुलें चेलेपण आपणाला । हा तरी एक उपदेश एथिला । स्वयें आचरिला साईनाथें ॥१५४॥
आपण कोणाचें होऊनि राहावें । किंवा कोणास आपुलें करावें । याहूनि अन्य असणें न बरवें । तेणें न उतरवे परपार ॥१५५॥
हाचि एक ये वर्तनीं धडा । परी दुर्लभ ऐसा निधडा । होईल जयाचे मनाचा धडा । निरभिमान - गडा चढेल ॥१५६॥
येथें स्वबुद्धि-परिकल्पित । चतुराई न कामा येत । जया मनीं साधावें स्वहित । अभिमानरहित वर्तावें ॥१५७॥
जेणें देहाचा अभिमान जाळिला । तेणेंचि हा देह सार्थकीं लाविला । तो मग कोणाचाही होईल चेला । साधावयाला परमार्थ ॥१५८॥
पाहोनियां ती निर्विषय स्थिति । लहान थोर विस्मित चित्तीं । वय लहान गोजिरी मूर्ति । चोज करिती जन सारे ॥१५९॥
ज्ञानियाचा देहव्यापार । होतसे पूर्वकर्मानुसार । तया न प्रारब्ध - कर्मभार । कर्मकर्तार हो नेणे ॥१६०॥
जरी सूर्यास अंधारीं रिघाव । तरीच ज्ञानिया द्वैतभाव । स्वस्वरूपचि जया अवघें विश्व । वसता ठाव अद्वैत ॥१६१॥
हें गुरुशिष्याचें आचरित । साईनाथांचे परमभक्त । म्हाळसापतींनीं करविलें श्रुत । तैसेंचि साद्यंत कथियेलें ॥१६२॥
असो आतां हें आख्यान । पुढील चरित्र याहूनि गहन । होईल तें यथाक्रम कथन । साबधान श्रवणीं व्हा ॥१६३॥
मशीद पूर्वीं होती कैसी । कैसिया कष्टीं जाहली फरसी । साई हिंदु वा यवनवंशी । नेणवे भरंवशीं हें कवणा ॥१६४॥
धोती पोती खंडयोग । करीत भोगीत भक्तांचे भोग । हें सर्व निवेदन यथासांग । होईल चांग पुढारा ॥१६५॥
हेमाड साईस शरण । चरणप्रसाद हें कथानिरूपण । श्रवणें होईल दुरितनिवारण । पुण्यपावन ही कथा ॥१६६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाई - पुन: प्रकटीभवनं नाम पंचमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्रुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्रीसाईसच्चरित
श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.