श्रीसाईसच्चरित

श्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.


अध्याय ३४ वा

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
पूर्वील अध्यायीं उदीमहिमान । केलें यथातथ्य कथन । प्रकृताध्यायींही तेंच निरूपण । विवरूं गुणलक्षण पुढारा ॥१॥
तीच मागील कथेची संगती । तेंच उदीचें वैभव संप्रती श्रोतीं परिसिजे स्वस्थचित्तीं । सुखसंवित्तीप्रीत्यर्थ ॥२॥
रोग दुर्धर हाडयाव्रण । कोण्याही उपायीं होईना शमन । साईहस्तींच्या उदीचें चर्चन । करी निर्मूलन व्यथेचें ॥३॥
ऐशा या उदीच्या कथा अनेक । दिग्दर्शनार्थ कथितों एक । श्रवण करितां वाटेल कौतुक । अनुभवपूर्वक म्हणोन ॥४॥
जिल्हा नाशीक मालेगांवीं । डॉक्टर एक पदवीधर पाहीं । होती तयांचे पुतण्यास कांहीं । व्यथा जी राही न औषधें ॥५॥
स्वयें वैद्य,  स्नेही वैद्य । केले उपचार नानाविध । कुशल शस्त्रक्रियाप्रबुद्ध । थकले निर्बुद्ध जाहले ॥६॥
रोग तो होता हाडयाव्रण । रूढ अपभ्रंश हाडयावर्ण । व्याधी महादुर्धर विलक्षण । येईना गुण औषधें ॥७॥
सर्वोपचार देशी विदेशी । झालें, फिटली सर्व असोशी । करोनि पाहिलें शस्त्रक्रियेशीं । कांहींही यशस्वी होईना ॥८॥
पुतण्या तों वयानें लहान । वेदन त्या न होती सहन । कष्टें कासावीस प्राण । उद्विग्नमन आप्तेष्ट ॥९॥
जाहली उपाय - परमावधी । यत्किंचितही शमेना व्याधी । तया आप्तेष्ट - संबंधी । म्हणती आराधा दैवतें ॥१०॥
देवदैवतें कुलस्वामी । यांतून कोणीही येईआ कामीं । कानीं आलें शिरडी ग्रामीं । अवलिया नामी वसे हें ॥११॥
ते शिरडीचे संतप्रवर । साईमहाराज योगीश्वर । केवळ दर्शनें व्याधिपरिहार । करिती साचार परिसिलें ॥१२॥
हेत उपजला साईदर्शनीं । निश्चित केलें मातापितयांनीं । पाहूं हा तरी उपाय करूनी । नांव घेउनी देवाचें ॥१३॥
म्हणती तो महान अवलिया । तेणें निजहस्तें उदी लाविलिया । दुर्धर रोग जाती विलया । अनुभव घ्यावया काय वेंचे ॥१४॥
चला वंदूं तयाचे पाय । करून पाहूं शेवटचा उपाय । तेणें तरी टळो हा अपाय । तरणोपाय हा एक ॥१५॥
असो पुढें ते मातापितर । करूनियां आवराआवर । होऊनि साईदर्शना आतुर । शिरडीस सत्वर पातले ॥१६॥
येतांच बाबांचें दर्शन घेतलें । चरण वंदूनि लोटांगणीं आले । दु:ख बाळाचें निवेदन केलें । उभे ठेले सन्मुख ॥१७॥
विकळवाणी जोडूनि पाणी । विनटोनि श्रीसाईचरणीं । मुख करोनि केविलवाणी । करिती विनवणी साईंशीं ॥१८॥
व्यथापीडित हें बाळ म्हणती । दु:खन देखवे आम्हांप्रती । सुचे न काय करावें पुढती । दिसेना धडगती आम्हांतें ॥१९॥
पुत्रदु:खाच्या अवकळा पाहतां । थोर शिणलों साईसमर्था । तरी अभयकर याचिये माथा । ठेवूनि व्यथा निवारावी ॥२०॥
परिसोन आपुलें महिमान । केलें आम्हीं येथवर आगमन । अनन्यभावें आलों शरण । एवढें जीवदान द्या आम्हां ॥२१॥
तंव तो साई करुणामूर्ति । आश्वासिता होय तयांप्रती । मशिदीच्या आश्रया जे येती । तयां न दुर्गती कल्पांतीं ॥२२॥
आतां तुम्ही निश्चिंत असा । उदी घ्या त्या व्रणावर फांसा । येईल गुणा आठांचौंदिवसां । ठेवा भरवसा देवावरी ॥२३॥
मशीद नव्हे ही द्वारावती । येथें जयांचे पाय लागती । तात्काळ क्षेम आरोग्य पावती । येईल प्रतीति तुम्हांही ॥२४॥
येथें येतां आराम न पडे । हें तों कालत्रयींही न घडे । जो या मशिदीची पायरी चढे । तयाचे बेडे पार जाणा ॥२५॥
पुढें बाबांचे आज्ञेकरून । व्यथितास सन्मुख बैसवून । पायावर बाबांनीं हात फिरवून । कृपावलोकन तैं केलें ॥२६॥
व्यथा ही तों केवळ दैहिक । असेना कां ती दैविक । अथवा दुर्धर मानसिक । समूलहारक दर्शन ॥२७॥
पाहोनि श्रीसाईंचें मुख । ठायींच विरालें सकळ दु:ख । सेवन करितांचि वचनपीयूख । परम सुख रोगिया ॥२८॥
असो पुढें ते तैसेच तेथ । राहिले चार दिवसपर्यंत । गेला व्याधीस आराम पडत । विश्वासही जडत साईपदीं ॥२९॥
तदनंतर तीं तिघेंजणें । बाबांचिया पूर्ण अनुमोदनें । परतलीं आनंदनिर्भर मनें । संतुष्टपणें गांवासी ॥३०॥
हा काय लहान चमत्कार । हाडयाव्रणास पडला उतार । उदी आणि कृपेची नजर । हाच कीं उपचार अपूर्व ॥३१॥
ऐसें हेंमहापुरुषदर्शन । भाग्यें लाधतां आश्वासन । कल्याणकारक आशीर्वचन । तेणेंच निर्मूलन व्याधींचें ॥३२॥
असो कांहीं दिवस जातां । उदी व्रणावर लावितां सेवितां । घाय भरला सुकतां सुकतां । लाधला आरोग्यता तो मुलगा ॥३३॥
ऐकून मालेगांवीं हें चुलता । साईदर्शनीं उपजली उत्सुकता । मनीं म्हणे मुंबईला परततां । पुरवूं आतुरता एवढी ॥३४॥
पुढें मुंबईलागीं जैं निघती । मालेगांवीं - मनमाडावरती । घातला कोणीं विकल्प चित्तीं । निश्चय त्यागिती शिरडीचा ॥३५॥
सत्कार्याची ऐसीच रीती । आरंभीं कुत्सित जन मोडा घालिती । लोकप्रवादा बळी न पडती । अंतीं सद्नती तयांसचि ॥३६॥
मग ते संतदर्शन डावलुनी । गेले थेट मुंबईलागुनी । उरली रजा अलीबागेस राहूनी । भोगावी मनी हा संकेत ॥३७॥
ऐसा निश्चय जाहल्यावरी । तीन रात्रीं हारोहारी । ऐकिला ध्वनी निद्रेमाझारीं । ‘अजून मजवरी अविश्वास ना’ ॥३८॥
लागोपाठ ही अशरीर - वाणी । ऐकूणि डॉक्टर विस्मित मनीं । निश्चय केला शिरडी - प्रयाणीं । अन्वर्थ ध्वनी वाटला ॥३९॥
परी एकासी दूषित ज्वर । डॉक्टरांचेच तया उपचार । तयास आराम पडलियावर । निघणें सत्वर ठरविलें ॥४०॥
परी तो ज्वर मोठा प्रखर । गुणा न येती कांहीं उपचार । पडे न लवमात्रही उतार । घडे न सत्वर निर्गमन ॥४१॥
मग ते मनीं करिती निर्वाण । जरी आज यास येईल गुण । तरी मी उद्यांचन दवडितां क्षण । शिरडीस प्रयाण करीन ॥४२॥
ऐसा करितां द्दढ संकेत । प्रहरां दो प्रहरां ज्वरही उतरत । जाहला सफल तयांचा हेत । निघाले शिरडीप्रत डॉक्टर ॥४३॥
यथासंकल्प शिरडीस गेले । मनोभावें चरण वंदिले । बाबांहीं अंतरींचे अनुभव पटविले । लक्ष जडविलें निजसेवे ॥४४॥
मस्तकीं हस्त साशीर्वाद । ठेविला दिधला उदीप्रसाद । पाहूनि साईंचा महिमा अगाध । विस्मयाविद्ध जाहले ॥४५॥
राहिले तेथें चार दिवस । परतले डॉक्टर आनंदमानस । पुरे न होतां पंधरा दिवस । गेले विजापुरास बढतीवर ॥४६॥
हाडयाव्रणाचिया ओढी । आली साईदर्शन - परवडी । जडली संतचरणीं गोडी । जोडिली जोडी अक्षयी ॥४७॥
असेच एकदां डॉक्टर पिल्ले । नारू - व्यथेनें व्याकुळ झाले । एकावर एक सात झाले । बहुत कष्टले जीवाला ॥४८॥
साईबाबांचें भारी प्रेम । ‘भाऊ’ आवडतें टोपणनाम । भाऊचें नित्य कुशल क्षेम । पुसावें परम आवडीनें ॥४९॥
मशिदीमाजी सांजसकाळ । कठडयासन्निध भाऊचें स्थळ । भाऊपाशीं बहुत काळ । गोष्टींचा सुकाळ परस्परां ॥५०॥
भाऊ पाहिजे चिलीम ओढितां । भाऊ पाहिजे विडी फुंकितां । भाऊ पाहिजे न्याय निवडितां । जवळ नसतां करमेना ॥५१॥
असो ऐसी तयांची कथा । दु:सह होऊनि नारूची व्यथा । भाऊंनीं अंथरूण धरिलें विकलता । दु:खोद्वेगता दुर्धर ॥५२॥
ऐसा तो प्रसंग दारुण । मुखीं ‘साई’ नामस्मरण । पुरे यातना बरें तें मरण । पातले शरण साईंतें ॥५३॥
पाठविती बाबांस सांगून । कंटाळलों हें दु:ख भोगून । काय हे किती आंगाला व्रण । नाहीं मज त्राण सोसावया ॥५४॥
शुद्धाचरणें वर्ततों । कां मजला हे दु:खावस्था । दुष्कर्माच्या वाटे न जातां । कां मम माथां पाप हें ॥५५॥
मरणप्राय नारूच्या वेदना । बाबा न आतां सोसवती आपणां । याहून आतां येऊं द्या मरणा । भोगीन यातना पुढारा ॥५६॥
भोगिल्यावीण नाहीं गती । आणिक जन्म घेऊं लागती । परी प्रारब्धभोग कधींही न चुकती । मीही मंदमती हें जाणें ॥५७॥
सुखें घेईन दहा जन्म । तेथें हें भोगीन माझें कर्म । कराया प्रकृत जन्माचा उपरम । एवढा हा धर्म मज वाढा ॥५८॥
पुरे आतां या जन्माचें जिणें । सोडवा मज जीवेंप्राणें । नको आतां हें कष्ट सोसणें । हेंच मागणें मागतों ॥५९॥
परिसून प्रार्थना सिद्धरणा । दया उपजली अंत:करणा । डॉक्टर पिल्ल्यांचिया समाधाना । वर्षलें करुणामृत तें सेवा ॥६०॥
मग भक्तकामकल्पद्रुम । पाःउनि द:खावस्था ती परम । करावयालागीं तिचा उपशम । काय उपक्रम मांडिला ॥६१॥
निरोप आणिला दीक्षितांनीं । बाबांनीं तें वृत्त परिसुनी । म्हणाले सांग तयास जाऊनी । ''निर्भय मनीं राहीं तूं'' ॥६२॥
आणिक तयास पाठविती सांगूं । ''किमर्थ दहा जन्मांचा पांगू । अवघ्या दहा दिवसांचा भोगू । भोगूं विभागून परस्पर ॥६३॥
मोक्ष स्वार्थ वा परमार्थ । द्यावया मी असतां समर्थ । हाच का तुझा पुरुषार्थ । मरणानर्थ मागसी ॥६४॥
आणवा तयास उचलूनी । भोग हा साहूं कीं तो भोगुनी । जावेंन ऐसें गांगरूनि । आणावा मारूनि पाठीवर'' ॥६५॥
असो डॉक्टर ऐसिये स्थितीं । आणिले तात्काल मशिदीप्रती । पाठीचा तक्या काढुनी हातीं । दिधला तयाप्रती बाबांनीं ॥६६॥
ठेविला आपुले सव्यभागीं । फकीर बाबा  बैसत ते जागीं । म्हणाले टेंकून पड ये उगी । चिंता वाउगी करूं नको ॥६७॥
करीं स्वस्थ लांब पाय । जेणें तुजला आराम होय । संचित संपेना भोगिल्याशिवाय । खरा उपाय तो हाचि ॥६८॥
इष्टानिष्ट सुखदु:ख । संचितानुसार अमृत वा विख । हें प्रवाहपतित द्वंद्व देख । धरीं न हरिख वा शोक ॥६९॥
जें जें येईल तें तें साहें । अल्ला मालीक वाली आहे । सदा तयाच्या चिंतनीं राहें । काळजी वाहे तो सारी ॥७०॥
चित्त - वित्त - काया - वाणी - । सहित रिघावें तयाचे चरणीं । असतां निरंतर तयाचे स्मरणीं । दिसेल करणी तयाची ॥७१॥
तंव ते वदती पिल्ले डॉक्टर । पट्टी बांधिती नारूवर । नानासाहेब चांदोरकर । परी न उतार कांहींच ॥७२॥
बाबा म्हणती ''नाना पागल । पट्टी सोड तूं मरशील आतां काऊ येऊन टोंचील । मग तूं होशील चांगला'' ॥७३॥
असो ऐशा वार्ता चालतां । अब्दुल आला तात्काळ वरता । पणत्यांत तेल घालायवयाकरितां । काय अवचिता तैं घडलें ॥७४॥
मशीद आधीं ती सांकड । भक्तांची होत बहुत भीड । त्यांतचि पिल्ले यांची गडबड । वावरूं अवघडला अब्दुल ॥७५॥
अब्दुला निजकार्यीं दक्ष । पणत्यांकडे तयाचें लक्ष । तेणें पिल्ल्यांकडे जाहलें दुर्लक्ष । प्रकार विलक्षण घडला तैं ॥७६॥
अब्दुल्ला तरी करील काय । होणारापुढें नाहीं उपाय । पिल्ल्यांनीं लांबविला होता जो पाय । चुकून पाय पडला वरी ॥७७॥
आधींच पाय होता सुजला । तेथेंच अब्दुलचा पाय पडला । मग पिल्ल्यांनीं जो ठणाणा केला । अति कळवळला जीव तैं ॥७८॥
मारिली एकदांचि किंकाळी । मस्तकीं जाऊनि भिनलि कळी । विनवीत बाबांस बद्धांजुळी । करुणासमेळीं तें परिसा ॥७९॥
नारू फुटून वाहूं लागती । पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्तीं । एकीकडे आक्रोश करिति । गाऊं अनुसरती दुसरीकडे ॥८०॥

'' करम कर मेरे हाल परतू करीम । तेरा नाम रहिमान है और रहीम । तूंही दोनों आलमला सुलतान है । जहांमें नुमाया तेरी शान है । फना होनेवाला है सब कारोबारा । रडे नूर तेरा सदा आशकार । तूं आसिकका सदा मदतगार है ।''

राहून राहून उठतसे कळ । जीव कळवळला पडले विकळ । साईबाबांचा हा खेळ । झाली अटकळ सर्वांची ॥८१॥
बाबा वदती ''पहा भाऊ । लागला बरें आतां गाऊं'' । पिल्ले तयांस पुसती तो काऊ । अजून खाऊं येणार का ॥८२॥
तेव्हां बाबा वदती ''तूं जाईं । स्वस्थ वाडयांत पडून राहीं । आतां काऊ फिरून नाहीं । येणार पाहीं टोंचावरया ॥८३॥
तोच नाहीं का येऊन गेला । तोच तो ज्यानें पाय दिधला । तोच तो काऊ टोंचून पळाला । नारू तळाला घातला'' ॥८४॥
कैंचा काऊ आणि काउळा । होणार वृत्तान्त समक्ष घडविला । काक अब्दुल्लारूपें प्रकटला । केलें बोला अन्वर्थ ॥८५॥
बोल नव्हे तो ब्रम्हालेख । कर्मावरीही मारील मेख । अल्पावकाशेंच भाऊस देख । लागलें सुख वाटावया ॥८६॥
उदीलेपन उदीसेवन । हेंच औषध हेंच अनुपान । जाहलें समूळ रोगनिरसन । उगवला जों दिन दहावा ॥८७॥
निघाले सजीव सप्त जंतु । जखमांमाजील बारीक तंतु । वेदना दुर्धर जाहल्या शांतु । दु:खासी अंतु जाहला ॥८८॥
जाणोनि ऐशिया चमत्कारा । पिल्ले साश्चर्य जाहले अंतरा । नेत्र स्रवले प्रेमधारा । पाहोनि उदाराचरित तें ॥८९॥
बाबांचिया चरणसंपुटीं । पिल्ले तेथेंच घालिती मिठी । बाष्पावरोध जाहला कंठीं । फुटे न ओष्टीं कीं वाचा ॥९०॥
सांगून आणीक एक अनुभव । करूं हा संपूर्ण उदीप्रभाव । जया मनीं जैसा भाव । हाच गौरव ग्रंथाचा ॥९१॥
एकदां माधवराव ज्येष्ठा । बापाजी तयांचा बंधु कनिष्ठ । कैसें तयांवरी येतां अरिष्ट । उदीनें अभीष्ट पावले ॥९२॥
ऐसा या उदीचा प्रभाव । किती वानावा म्यां नवलाव । ग्रंथिज्वरादि रोग सर्व । औषध अपूर्व नाहीं दुजें ॥९३॥
असतां साऊळ विहिरीवर । कुटुंबासी आला ज्वर । ग्रंथी उद्भवल्या जांघेवर । मनीं घाबरला बापाजी ॥९४॥
पाहून कुटुंब अति हैराण । तैसाच रात्रीचा समय भयाणा । जाहला बापाजी भ्रांतमन । गळालें अवसान तयाचें ॥९५॥
धांव ठोविली रातोरात । सकंप भयभीत शिरडीस येत । जाहला कथिता समस्त वृत्त । निजबंधूप्रत तेधवां ॥९६॥
म्हणती आल्या दोन गांठी । ज्वरसंतप्त झालीसे कष्टी । चला पहा कीं आपुल्या दिठीं । दिसे न गोठी मज बरवी ॥९७॥
बापाजी बोलतां केविलवाणी । माधवरावजी दचकले मनीं । गेलें पळोनि तोंडचें पाणी । मन ठिकाणीं पडेना ॥९८॥
माधवराव मोठे विवेकी । ग्रंथी म्हणतां भरली धडकी । ग्रंथिज्वराची तडकाफडकी । आहेच ठावुकी अवघियां ॥९९॥
प्रसंग बरवा वा बिकटा । कार्य असो इष्टानिष्ट । आधीं साईंस पुसावी वाट । परिपाठा हा धोपट शिरडींत ॥१००॥
मग ते जैसें जैसें कथिती । आचरावें तैसे स्थितीं । तेच भक्तसंकट निवारिती । वर्णावे किती अनुभव ॥१०१॥
असो या नित्यपाठानुसार । माधवरावही करिती विचार । आधीं बाबांस केलें हें सादर । साष्टांग नमस्कारपूर्वक ॥१०२॥
म्हणती जय जय साईनाथा । दया करावी आम्हां अनाथां । हें संकट काय ओढवलें आतां । नसती चिंता उद्भवली ॥१०३॥
तुजवांचून कवणा आना । आम्ही जाऊं कराया याचना । दूर करीं त्या पोरीच्या यातना । आशीर्वचना देईं गा ॥१०४॥
करीं एवढें संकटहरण । आम्हां कैवारी कोण तुजविण । करीं या दुर्धर ज्वराचें शमन । ब्रीदसंरक्षण करीं गा ॥१०५॥
पुसती अनुज्ञा जावयास । बाबा वदती तंव तयास । ''नको जाऊं अपरात्रीस । उदी दे तियेस पाठवुनी ॥१०६॥
कशाच्या ग्रंथी कशाचा ताप । आपुला अल्ला मालिक बाप । बरें होईल आपोआप । होईल सुखरूप निर्घोर ॥१०७॥
मात्र तूं सकाळीं सूर्योदयीं । साऊळ विहिरीस जाऊन येईं । आतांच नको जाण्याची घाई । स्वस्थ राहीं तूं येथें ॥१०८॥
उदयीकही जाऊन यावें । नलगे निरर्थक कुचंबावें । उदी लावितां सेवितां भावें । किमर्थ भ्यावें आपण'' ॥१०९॥
परिसतां हें बापाजी भ्याला । तयाचा मोठा हिरमोड झाला । माधवराव जाणती औषधीपाला । परी न समयाला उपयोग ॥११०॥
एक साईकृपेविण । औषधींस नाहीं गुण । हें एक वर्म ही एक खूण । माधवराव पूर्ण जाणती ॥१११॥
आज्ञा बाबांची वंदून । उदी दिधली पाठवून । राहिले माधवराव स्वस्थमन । परतला उद्विग्न बापाजी ॥११२॥
पाण्यांत उदी कालवून । पोटांत पाजिली अंगा लावून । घाम सुटला डवडवून । निद्रा लागून राहिली ॥११३॥
सूर्योदय जाहल्यावरी । कुटुंबास वाटली हुषारी । नाहीं ज्वर नागांठी विषारी । बापाजी करी आश्चर्य ॥११४॥
इकडे माधवराव जे उठले । शौच मुखमार्जन आटपलें । साऊळ विहिरीस जावया निघाले । दर्शना आले मशीदीं ॥११५॥
घेतलें बाबांचें दर्शन । घातलें पायीं लोटांगण । उदीसमवेत आशीर्वचन । मिळतांच तेथून निघाले ॥११६॥
मशिदीची पायरी उतरतां । बाबा तयांस ऐकिलें आज्ञापितां । ''शामा उठाउठी ये मागुता । विलंब लागतां कामा नये'' ॥११७॥
असेल कीं भावजयी विव्हाळ । कैसी साहील दों ग्रंथींची जळजळ । पडली असेल करीत तळमळ । वाटेनें  हळहळ दीरास ॥११८॥
करिती बाबा कांहीं इषारा । कां ये सत्वर म्हणती माघारा । तेणें शामा होय घाबरा । चाले झरझर मार्गानें ॥११९॥
घाई घाई साऊळ विहीर । गांठेपर्यंत नव्हता धीर । पाऊल ठेवितां उंबरठयावर । चमत्कारले अंतरीं ॥१२०॥
जियेस गतरात्रीं ग्रंथिज्वर । चहा ठेवितां पाही चुलीवर । माधवराव विस्मितांतर । जाहले स्थित्यंतर पाहुनी ॥१२१॥
तंव ते बापाजीस पुसत । ही तों नित्यव्यवसायरत । बापाजी म्हणे ही सर्व करामत । उदीची निश्चित बाबांच्या ॥१२२॥
म्हणे मीं येतांच उदी पाजिली । चोळून चोळून सर्वांगा चर्चिली । तात्काळ घर्मांचित तनू झाली । निद्रा लागली स्वस्थपणें ॥१२३॥
पुढें जंव सूर्योदय होत । उठूनि बैसली खडखडीत । ग्रंथी विराल्या ज्वरासहित । हें सर्व चरित्र साईंचें ॥१२४॥
शामा पाहूनि ऐसी स्थिति । तात्काळ आठवली साईंची उक्ति । ''उठाउठीं येईं तूं मागुतीं'' । साश्चर्य चित्तीं जाहला ॥१२५॥
जाण्या आधींच कार्य संपलें । चहा घेऊन माधवराव परतले । मशिदींत जाऊन पहिले । चरण वंदिले बाबांचे ॥१२६॥
म्हणती देवा काय हा खेळ । तूंचि उडविसी मनाची खळबळ । बसल्या जागीं उठविशी वावटळ । मागुती निश्चळ तूंचि करिसी ॥१२७॥
बाबा तयास प्रत्युत्तर देती । ''पहा कर्माची गहन गहन गती । मी करीं ना करवीं कांहींही निश्चिती । कर्तृत्व मारिती मजमाथां ॥१२८॥
कर्में जीं जीं अद्दष्टें घडत । मी तों तेथील साक्षीभूत । कर्ता करविता तो एक अनंत । मी यादगार । बंदा मी लाचार अल्लाचा ॥१३०॥
सांडूनियां अहंकार । मानूनि तयाचे आभार । तयावरी जो घालील भार । बेडा तो पार होईल'' ॥१३१॥
असाच एका इराणीयाचा । अनुभव ऐका महत्त्वाचा । तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा । बसतसे तासा - तासास ॥१३२॥
तासागणिक आंकडी येई । पडे धनुकली होऊनि ठायीं । अत्यवस्थ बेशुद्ध होई । उपाय कांहीं चालेना ॥१३३॥
पुढें तयाचा एक मित्र । वर्णी तयास उदीचें चरित्र । म्हणे ऐसें रामबाण विचित्र । औषध अन्यत्र असेना ॥१३४॥
जावें अविलंबें पारल्यास । उदी मागावी दीक्षितांस । असे तयांचे संग्रहास । अति उल्हासता देतील ॥१३५॥
ती उदी मग रोज थोडी । साईस्मरण श्रद्धाआवडीं । पाजितां ही जाईल आंकडी । सौख्यपरवडी लाधाल ॥१३६॥
ऐसें ऐकूनि मग तो पारशी । उदी मागून दीक्षितांपाशीं । मुलीस पाजितां नित्यनेमेंसीं । आरोग्य तिजसी लाधलें ॥१३७॥
तासातासां जी होतसे घाबरी । तत्काळ उदीनें जाहली बरी । जाऊं लागले मध्यंतरीं । लहरी - लहरींत सात तास ॥१३८॥
तासातासानें येणारी लहर । पडतां सातां तासांचें अंतर । कांहीं काळ क्रमिलियानंतर । परिहार समग्र जाहला ॥१३९॥
हर्द्यानजीक एका गांवांत । रहातसे एक वृद्ध गृहस्थ । मूतखडयाच्या व्याधीनें ग्रस्त । जाहला त्रस्त अतिशय ॥१४०॥
हा रोग शस्त्रक्रियेवीण । अन्यथा नाहीं याचें निवारण । म्हणूनि शस्त्रक्रियाप्रवीण । पहा तरी कोण जन वदती ॥१४१॥
रोगी परम चिंतातुर । कर्तव्यार्थीं न सुचे विचार । मरणोन्मुख कृश शरीर । दु:ख अनिवार सोसेना ॥१४२॥
शस्त्रप्रयोगा लागे धैर्य । रोगिया अंतरीं नाहीं स्थैर्य । सुदैवें तयाचें नष्टचर्य । संपलें आश्चर्य तें परिसा ॥१४३॥
येरीकडे हा ऐसा प्रकार । तोंच त्या ग्रामींचे इनामदार । साईबाबांचे भक्त थोर । आले गांवावर समजलें ॥१४४॥
तयांपाशीं बाबांची विभूती । नित्य राही हें सर्व जाणती । रोगार्ताचे आप्तेष्ट येती । उदी प्रार्थिती तयांतें ॥१४५॥
इनामदारांनीं उदी दिधली । मुलानें बापाअस पाण्यांत पाजिली । पांचही मिनिटें नसतील लोटालीं । तोंच कीं वर्तली नवलपरी ॥१४६॥
उदीप्रसाद अंगीं जों भिनला । मूतखडा ठायींचा ढळला । मूत्रद्वारें बाहेर निसटला । आराम पडला तात्काळ ॥१४७॥
मुंबापुरीचे एक गृहस्थ । होते जातीचे प्रभु कायस्थ । होतां प्रसूतिसमय प्राप्त । स्त्री अत्यवस्थ सर्वद ॥१४८॥
मग कितीही उपाय करा । गुण न एकाही उपचारा । बाईचा जीव होतसे घाबरा । ऐसा बिचारा त्रासला ॥१४९॥
‘श्रीराममारुती’ नामें विख्यात । होते एक साईंचे भक्त । तयांच्या विचारें हे गृहस्थ । जावया शिरडीप्रत निघाले ॥१५०॥
प्रसूतीचा येतां समय । महत् संकटीं पडत उभय । जाहला एकदां मनाचा निश्चय । पावूं निर्भय शिरडींत ॥१५१॥
होणार होईना कां निदानीं । होवो तें बाबांचे संनिधानीं । ऐसा संकल्प द्दढ करोनी । शिरडीस येउनी राहिले ॥१५२॥
ऐसाही उभयतां कित्येक मास । करितीं जाहलीं शिरडींत वास । पूजा अर्चा साईसहवास । आनंद उभयांस जाहला ॥१५३॥
ऐसा क्रमितां कांहीं काळ । प्रसूतिसमय आला जवळ । काळजी उद्भवली प्रबळ । संकट टळणार कैसें हें ॥१५४॥
ऐसें म्हणतां म्हणतां म्हणतां आला । प्रसूतीचा दिवस पातला । गर्भद्वाराचा मार्ग अडला । सर्वांस पडला विचार ॥१५५॥
बाईस होऊं लागल्या यातना । काय करावें कांहीं सुचेना । मुखें चालली बाबांची प्रार्थना । त्यावीण कवणा करुणा ये ॥१५६॥
धांवूनि आल्या शेजारणी । घालूनि बाबांना गार्‍हाणीं । एकीनें प्याल्यांत ओतूनि पाणी । उदी कालवूनि पाजिली ॥१५७॥
पांच मिनिटें गेलीं न गेलीं । तोंच बाईची सुटका झाली । गर्भस्थिति निर्जीव दिसली । गर्भींच मुकली चैतन्या ॥१५८॥
असो गर्भाची कर्मगति । होईल पुढारा गर्भप्राप्ति । बाई पावली भयनिर्मुक्ति । लाधली संस्थिति सौख्याची ॥१५९॥
वेदनाविरहित गर्भ स्रवली । हातीं पायीं सुखें सुटली । महच्चिंतेची वेळ टळली । ऋणी झाली जन्माची ॥१६०॥
पुढील अध्याय याहूनि गोड । परिसतां पुरले श्रोत्यांचें कोड । निरसूनि चिकित्सकपणाची खोड । भक्तीची जोड लाधेल ॥१६१॥
आम्हां निराकाराची उपासना । आम्ही देणार नाहीं दक्षिणा । आम्ही वांकविणार नाहीं माना । तरीच दर्शना येऊं कीं ॥१६२॥
ऐसा जयांचा कृतनिश्चय । तेही पाहतांच साईंचे पाय । दक्षिणेसहित साष्टांग काय । वाहती हा काय चमक्तार ॥१६३॥
उदीचाही अपूर्व महिमा । नेवासकरांचा भक्तिप्रेमा । कैसें दुग्ध पाजूनि भुजंगमा । गृहस्थधर्मा संरक्षिलें ॥१६४॥
ऐसाइसिया कथा उत्तम । परिसतां उपजेल भक्तप्रेम । संसारदु:खा होईल उपशम । याहूनि परमसुख काय ॥१६५॥
म्हणोनि हेमाड करी विनंती । साईचरणीं करोनि प्रणती । प्रेम द्या जी श्रोतयांप्रती । निज सच्चिरितीं रमावया ॥१६६॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । उदीमहिमा नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥


॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥