जनीं ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू ।
तनू मनू तो पवनू एकचि पाहतां दिसे॥१॥
त्रैलोक्यीं पाहतां बाळें ऐसें तो पाहतां नसे ।
अतूळ तूळना नाहीं मारुती वातनंदनू ॥२॥
चळे तें चंचळें बाळ मोवाळ साजिरे ।
चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरें ॥३॥
हात कीं पाय कीं सांगों नखें बोटें परोपरी ।
दृष्टीचें देखणें मोठें लांगुळ लळलळीतसे ॥४॥
खडी खारी दडे तैसा पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहतां मोठें झेंपावे रविमंडळा ॥५॥
बाळानें गिळिला बाळू स्वभावें खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळें देखिलें धरणीवरी ॥६॥
पूर्वेसि देखतां तेथें उडालें पावलें बळें ।
पाहिलें देंखिलें हातीं गिळिलें जाळिलें बहू ॥७॥
थुंकोनि टाकितां तेथें युद्ध जालें परोपरी ।
उपरी ताडिला तेणें एक नामचि पावला ॥८॥
हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरूवरी ।
मागुता प्रगटे धांवे झेंपावे गगनोदरी ॥९॥
पळही राहिना कोठें बळेंचि चालितो झडा ।
कडाडां मोडती झाडें वाड वाडें उलंडती ॥१०॥
पवनासारिखा धांवे वावरे विवरें बहू ।
अपूर्व बाळलीला हे रामदास्य करी पुढें ॥११॥