श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - अध्याय चवथा

श्रीगणेशायनम: ॥ श्रीरामचरण देखतां दृष्टीं । हर्ष कोंदला सकळ सृष्टीं ।
त्रितापक्लेशें जो कष्टी । तो संतोषी या स्थळीं ॥१॥
सद‍वंद्य कृष्णातीर । वेदासंगम महाथोर ॥
तेथील स्नानें पातकी नर । पुनीत होय निश्चयें ॥२॥
दोष हरती तीर्थ - पानें । सदन्न - मिष्टान्न - भोजनें ॥
रात्रौ जागरण - हरिकीर्तनें । धीमंतें काळ घालवावा ॥३॥
नरसिंह म्हणें दिनकर - सुता । पुढें रसाळ चालवी कथा ॥
क्षुधित चरितामृत ग्रंथा । पारणें करी ये समयीं ॥४॥
बापाजी म्हणें स्वस्थमनें । ऐका न करोन व्यवधान ॥
ब्रम्हानाळ क्षेत्रीं गुणनिधान । आनंदमूर्ती सेवा करी ॥५॥
वसगडें ग्रामीं वस्तीस रहावें । प्रत्यहीं संगम - स्नानास जावें ॥
श्रीगुरूस पूजोन परतोन यावें । वसगडें ग्रामीं सायान्हीं ॥६॥
ऐसे कांहीं दिवस गेले । सांप्रदायिक शिष्य भले ॥
सर्वीं मिळोन योजिलें । वृंदावन श्रींचें बांधावें ॥७॥
कारखाना गवंडी आणोन । शिळा गच्यादि सिद्धता करोन ॥
बांधविलें वृंदावन । मुंडथरा पर्यंत ॥८॥
मुंडथराचा कळस । गवंडी जुळविती सायास ॥
गुरूइच्छे मुंडथरास । विक्षेप कांहीं हों सरे ॥९॥
वक्र होऊन जाती चिरे । अवक्र न बसे मुंडथर ॥
आनंदमूर्तीस समाचार । शरुत केला गवंडियें ॥१०॥
कळस बैसविते वेळे । गमतें वृंदावन डोले ॥
बहुत आम्ही यत्न केले । शेवटीं झाले निरर्थक ॥११॥
आनंदमूर्ती श्रीगुरुजवळ । येऊनि पदीं ठेविलें भाळ ॥
विनीत प्रार्थी श्रीदयाळ । इमारत सिद्धी नेइअजे ॥१२॥
स्वामींनीं चरित्र कांहीं एक । करणें जरी आहे लौकिक ॥
इमारत सिद्धी नेवोनि सम्यक । स्वेच्छा तैसें करावें ॥१३॥
ऐसी विनंती नानापरी । आनंदमूर्ती तेव्हां करी ॥
निर्धार एक अहोरात्रीं  । निश्चक केला श्रीपाशीं ॥१४॥
आज्ञा करीत श्रीगुरू माय । अनंता तुझें चित्तीं आहे ॥
तैसेंच करी लवलाहें । विक्षेप न होय यावरी ॥१५॥
आज्ञा होतां दुसरे दिनीं । गवंडीयें कळस धरवोनि ॥
चिरे बैसविले अर्धक्षणीं । मुंडथरास तेधवा ॥१६॥
आनंदमूर्तींनीं यावरी । भिक्षा करून ग्रामांतरीं ॥
मिळविली बहुत सामुग्री । उद्यापनाची तेधवां ॥१७॥
तीन दिवस राहून तेथ । उत्सर्ग विधी यथोचित ॥
समारंभें संतर्पणान्त । संपादिले आवडी ॥१८॥
कीर्तन गजर वेदघोष । संतविप्र करिती विशेष ॥
ब्रम्हानंदाचा उत्कर्ष । वृंदावन डोलूं लागलें ॥१९॥
सुकृत जनें देखिलें दृष्टीं । विस्मय करी सकल सृष्टी ॥
आश्चर्य वर्तलें ऐशा गोष्टी । मागें पुढें नायकों ॥२०॥
ईश्वरचरित्र अघटित । दुस्तर प्रस्तर कैसे डोलत ॥
श्रीरामें तारिलें जळावरुत । तैसेंच हें कृत्य श्रीगुरूचें ॥२१॥
पुन्हां वसगडेस येऊनी । नित्य श्रीनिकट जाऊनी ॥
पूजा नैवैद्य करूनी । येती पूर्व स्थळासी ॥२२॥
कांहीं दिवस याच रीती । भक्ती करीत आनंदमूर्ती ॥
बहुत जन भावें भजती । प्रेमा अपार वाढला ॥२३॥
जै दिनीं संतर्पण । अथवा वेदघोष हरिकीर्तन ॥
तये दिनीं स्वानंदें करून । डोल व्हावा वृंदावनीं ॥२४॥
चमत्कार ऐसा होतां । आश्चर्योकर्ष समस्तां ॥
प्रेमानंदीं दिवस जातां । वर्ष एक वर्तलें ॥२५॥
पुण्यतिथीचा दिवस । प्राप्त होतां अनायास ॥
ग्रामस्थ सर्व साहित्यास । साहय झाले सुश्रद्धें ॥२६॥
पुण्यतिथी वसगडेस । भाद्रपद शुद्ध द्वितीयेस ॥
ब्राम्हण भोजन वेदघोष । मंत्न पुष्पें श्रीगुरुसी ॥२७॥
रात्रौ कीर्तनाचा गजर । लळितादि उत्साह थोर ॥
संतभोजन करोनि समग्र । साधु मंडळी गौरविली ॥२८॥
पुढें राज्यक्रांतीकरून । देशांत झालें उल्बण ॥
थोर शहर स्थळ पाहून । वस्तीस गेले जन तेथें ॥२९॥
तेव्हां आनंदमूर्ती स्वामी । कुटुंबासवें सांगली ग्रामीं ॥
एका ब्राम्हणाचे धामीं । पडवीस वस्ती राहिले ॥३०॥
सांगली क्षेत्र उत्तमोत्तम । विप्र मंडळींचा विपुल स्तोमा ॥
मिरज किल्ले संनिध ग्राम । जाणोनि रमलें मन तेथें ॥३१॥
पूजा नैवेद्या लागूनी । नित्य जावें वृंदावनीं ॥
अतिश्रि आलिया माध्यान्हीं । विमुखता नसेचि ॥३२॥
नित्य भोजनीं मुक्तद्वार । क्षुधित विप्रांचा सत्कार ॥
अन्नोदकें द्विजजन फार । संतोषातें पावती ॥३३॥
ऐसें करोनि दृढतर व्रत । राहते झाले सांगलींत ॥
आली वर्षाची पुण्यतीथ । नभस्य शुक्ल द्वितीयेस ॥३४॥
देशपर्यटण करोनी जाणा । केली साहित्य योजना ॥
प्रतिपदेस पूजोन वृंदावना । उत्साह आरंभिला ते दिनीं ॥३५॥
द्वितीयेस मुख्य दिन । जयराम स्वामी गुणनिधान ॥
पातले वडगांवाहून । सवें स्तोम संतांचा ॥३६॥
चाफळाहूनि श्रीरामदास । आले शीघ्र उत्सवास ॥
साधु संत आसमास । अपार येती उत्सवा ॥३७॥
रामदासांचे ऐकोन बोला । तृतीयेस केला गोपाळ - काला ॥
कीर्तन समारंभ केला । स्वयें रामदास स्वामींनीं ॥३८॥
शुद्ध चतुर्थीचे दिवशीं । संत आले उत्सवासी ॥
मंगळस्नान करवोनी त्यांसी । संतभोजन करविलें ॥३९॥
प्रतिवर्षीं उत्सव गजर । कीर्ती व्यापिलें दिगंतर ॥
संस्थानी साधूंसि धाडोनि पत्र । आणिती उत्सव निमित्त ॥४०॥
श्रीरामदास चाफळकर । जयराम वडगांवीं राहणार ॥
निरंजन वास्तव्य कराड क्षेत्र । रंगनाथ स्वामी निगडीचे ॥४१॥
खेरीज साधू अमित येती । उत्साहीं कीर्तन गजर करिती ॥
लळित प्रसाद घेऊनी जाती । निज स्थाना स्वैच्छें ॥४२॥
आसमंतांत ग्रामस्थांनीं । यावें उत्सवा लागोनी ॥
कैसें जावें रिक्तपाणी । सामुग्री कांहीं आणिती ॥४३॥
कोणी यावनाळ पिष्ट करोन । गोधूम कोणी शाल्योदन ॥
तुरी चणक डाळ करोन । प्रियंगु तंडुलादि आणिती ॥४४॥
ज्यास अनुकूल पडेल जैसें । घेऊनि येति प्रतिपदेस ॥
‘फळ पाडवा’ म्हणोन दिवस । फळें करती ते दिनीं ॥४५॥
तीच चाल अद्यापवरी । चालत आहे ब्रम्हानाळ क्षेत्रीं ॥
सिंहावलोकनें पवित्री । मागील कथा परिसिजे ॥४६॥
जयरामस्वामी गुणागर । आपणापाशीं आणवोनी थोर ॥
लाभ मानिला गुरू साचार । रघुनाथ तो जयराम ॥४७॥
काया वाचा मन । जयराम स्वामीस झाले शरण ॥
विपरीत भावना अणुप्रमाण । नसे भजनीं अंतर ॥४८॥
सुखसंपन्न जयराम पाही । राहिले आनंदमूर्तींचे गृहीं ॥
क्षुद्रकामें जीं सर्वही । निजांगें सर्व संपादिती ॥४९॥
कोणी साधु हो यजमान । येती मठा लागून ॥
तयांचे शुश्रुषे कारण । गृही सखू एकटी ॥५०॥
त्यांचीं धोतरें धुवावयासी । सखू जातां नदीसी ॥
जयराम चालले पाठीसी । विमलांतरीं कळवळोनी ॥५१॥
जातां वाटेस झडकरी । मोट घेतली आपुले शिरीं ॥
जावोन कृष्णा नदीचे तीरीं । धुणें धुतलें निजांगें ॥५२॥
मोट घेवोन साधवें । दरवाज्या पर्यंत जावें ॥
नंतर सखूबाईस द्यावें । लौकिकीं कळेल हा हेतू ॥५३॥
संत चरित्र अतिप्रगल्भ । अज्ञजना नुमगे सुलभ ॥
धन्य ते मूर्ती स्वयंभ । उर्ध्वरतो दत्तमुनी ॥५४॥
आनंदमूर्तीस वृत्तांत कळला । कंठ गहिंवेंर भरोन आला ॥
नीच कार्यार्थ अंगीकारिला । जड मी माझिये गृहांत ॥५५॥
ऐसें न कीजे गुरूवर्या । साष्टांग नमितों तुमचे पायां ॥
दुष्ट मी सेवा घ्यावया । योग्य कैसा श्रीगुरो ॥५६॥
जयराम बोलिले हर्षोत्तरीं । सखूबाई मम कुमरी ॥
तिजला पडेल जें भारी । तें मी स्वांगें करीन ॥५७॥
कोणी आग्रह केलियाही । सहसा ऐकावयाचा नाहीं ॥
कन्या माझी सखूबाई । जामाता तूं आनंदा ॥५८॥
ऐसें स्पष्ट ऐकोन । आग्रह दिला सोडून ॥
जामाताधिकार तैं पासोन । वडगांव मठीं चालविला ॥५९॥
तेथील सांप्रदायिक पंगती । शालकपणें विनोद करिती ॥
धन्य जयराम आनंदमूर्ती । महिमान काय वर्णावें ॥६०॥
स्वमठीं जातां जयराम । आनंदास नेती समागमें ॥
ब्रम्हासुख निरुपम । त्यामाजीं निमग्न सदैव ॥६१॥
श्रीरगुनाथ - वियोगें बहुत । आनंदमूर्ती अतिदु:खित ॥
जयरामस्वामि - समागमांत । चित्तीं समाधान पावले ॥६२॥
स्वामींचें चर्मी पायतन । सोवळ्यांत सुबक वेष्टन ॥
घालोन गवाळ्यांत बांधून । प्रत्यहीं पूजन त्याचें करी ॥६३॥
कोणी पुसिलें स्वभावें । तयातेम साक्षेपें सांगावें ॥
श्रीमद्भगवद्नीतेचें नांव । संकोच न करितां मानसीं ॥६४॥
निषिद्ध चर्मी उपान । सोवळ्यांत पाळी विद्वज्जन ॥
हें लोकविरुद्ध जाणोन । गौप्य पूजन करी तसे ॥६५॥
कोणे दिवसीं वडगावीं । पाकसिद्धी जाहली ॥६६॥
स्वामींस नमस्कारिलें । तंव स्वामियें आज्ञापिलें ॥
स्नान सत्वर करोनि वहिलें । आन्हिक वेगें संपादा ॥६७॥
मठीं उदकाचें प्रतिकूळ । यास्तव वापीस स्नाना गेले ॥
गवाळें काढोन बाहेर ठेविलें । वदले कोणी सोडूं नये ॥६८॥
ऐसें सांगोन त्वरितगती । गमन केलें स्नानाप्रती ॥
परंतु शंका असे चित्तीं । गवाळें कोणी पाहतील अवचित ॥
उपहास होईल जगांत । काय कैसें करावें ॥७०॥
हा संशय होता मनीं । कर्मसंयोगें गृहस्थ कोणी ॥
स्नान केलें वेगेंकरोनी । स्वामी पाशीं पातला ॥७१॥
म्हणे गीता पाठनेम । पुस्तक नाहीं समागमें ॥
मठांतील गीता सहस्रनाम । वाचावयासी देइजे ॥७२॥
एक तरि अध्याय वाचल्याविणें । भोजन मज नाहीं करणें ॥
मग स्वामियें आणि दुजा जनें । सहजवृत्ती निरोपिलें ॥७३॥
हें गवाळें आनंदमूर्तींचें । सोडोन पुस्त्क घ्यावें तुम्हीच ॥
अध्याय वाचोनि सत्वरच । बांधोन येथ ठेविजे ॥७४॥
आनंदमूर्तीचें गवाळें । सोडून पुस्तकाचें गांठोळें ॥
काढोन अध्याय शीघ्र काळें । वाचोनिया ठेविजे ॥७५॥
येरें तैसेंच केलें । गवाळें सोडून पाहिलें ॥
तों दिव्य पुस्तक वेष्टिलें । दिव्य वस्त्रें करोनिया ॥७६॥
वस्त्नांतून वस्त्रें निघती । आंत पाहिली दिव्य पोथी ॥
सुवाच्य अक्षरांची पंक्ती । तिळतुल्य अशुद्ध नाढले ॥७७॥
परम आनंदें वाचणार  । विस्मय करी वारंवार ॥
म्हणे पुस्तक बहु सुंदर । धन्य लेखक सुज्ञाता ॥७८॥
अघटित - घटना - पटु श्रीरघुनाथ । काय हे अशक्य त्यातें ॥
महेंद्र - पद भणंगातें । अर्ध क्षणांत देणार ॥७९॥
तया काय हे अगाधु । क्षणांत करिती बिंदूचा सिंधू ॥
भक्तजन जाणिती निर्द्वंद्वु । उपानह पुस्तक जाहलें ॥८०॥
एक अध्याय वाचोन त्वरित । दाविलें पुस्तक मंडळींत ॥
स्वामीनें पाहिलें पुरतें । पुस्तक सुवाच्य या हेतू ॥८१॥
मग पोथी गुंडाळोन । ठेविली गवाळयांत बांधोन ॥
इतुक्यांत स्नान करोन । आनंदमूर्तीही पातले ॥८२॥
गवाळें पाहतां आपुली । खूण व्यस्त दिसोन आली ॥
स्वामींलागी पृच्छा केली । गवाळें कोणी सोडलें ॥८३॥
स्वामी वदले यथार्थ । एक गृहस्थ हा नेमस्थ ॥
गीता वाचावयालागी सत्य । पोथी घेतली ममाज्ञें ॥८४॥
वाचोन ठेविली जैसी तैसी । क्रोध न आणावा मानसीं ॥
सर्वही बोलिले तयांसी । पुस्तक कोठें संपादिलें ॥८५॥
अक्षर बहु रसाळ सुंदर । अशुद्ध नसे तिळमात्र ॥
या शद्बें आनंद - अंतर । खोंचलें स्वकृत्य आठवोन ॥८६॥
पाहोत चर्मी पायतन । उपरोध भाषें मम हेळण ॥
करितात ऐसें समजोन । संकोचित झाले अंतरीं ॥८७॥
शास्त्रार्थ सांगे आनंदमूर्ती । ‘चर्मतैलेन शुध्यति’ ॥
स्वाम्यंघ्रि - स्पशें चर्माप्रती । शुद्धता झाली निश्चयें ॥८८॥
ऐसें बोलता सकळ जन । म्हणती कायसें शास्त्रवचन ॥
प्रत्यक्ष पुस्तक असोन । चर्मवार्ता कां बोलतां ॥८९॥
ऐसें बोलून नावेक । स्तब्ध राहिले सर्व लोक ॥
आनंदमूर्ती गवाळें देख । सोडोनिया पाहिलें ॥९०॥
सुवाच्या गीता मात्र दिसे । पूजापदार्थ काठ नसे ॥
विस्मय करोनी निज मानसें । गौप्य रडूं लागले ॥९१॥
हें वृत्त जयराम स्वामींस । सांगती जावोनि सायास ॥
आनंदमूर्ती बहु उदास । काय निमित्त रडताती ॥९२॥
स्वामींनीं आणितां ध्याना । समजों आल्या सर्व खुणा ॥
आनंदमूर्तीस श्रीगुरुराणा । बोलता झाला आवडीं ॥९३॥
तुम्ही उदासीन तें गुहय । मज सर्व समजताहे ॥
पुस्तक पाहिजे तरी सिद्ध आहे । स्वस्थ चित्तें अवधारा ॥९४॥
पाहिजे जरी पूज्य पदार्थ । आताच सिद्ध होईल त्वरित ॥
मुख्य शुद्ध भावार्थ । गुरुकृपेसी कारण ॥९५॥
आनंदमूर्ती जोडूनि पाणी । श्रीजयरामास वदे वाणी ॥
स्वामींनीं ऐकोन विनवणी । मनोरथ पूर्ण करावा ॥९६॥
प्रयत्नें गीता पुस्तक मिळे । पूजापदार्थ सदुर्मिळ ॥
जेथें विश्रामलें अंघ्रिकमळ । स्वामी श्रीरघुनाथाचें ॥९७॥
त्या पादरक्षा निजडोळां । केव्हां देखेन दयाळा ॥
येरू म्हणे याचिये बोला । पुस्तक सोडून पाहे बा ॥९८॥
येरू पाहे गवाळें सोडून । तों आंत गुरूचें पादत्राण ॥
अगाध घटना देखून । चमत्कारिला निजमनीं ॥९९॥
स्वामी करी तें काय न होय । ऐसें वर्तले नवजाय ॥
असाध्य जरी साध्य होय । येथें संशय न धरावा ॥१००॥
देखोनिया आश्चर्य । सर्व करिती विस्मय ॥
धन्य निष्ठा श्रीगुरुराय । गुरुभक्तांत अवतंस ॥१०१॥
तेंच उपान अद्यापवरी । द्दढबंधनीं ब्रम्हानाळ क्षेत्रीं ॥
संरिक्षलें बहुतापरी । सद्वंशज आवडी ॥१०२॥
कीर्तीनें भरलें दिगंतर । आनंदमूर्तीसी म्हणती धन्य नर ॥
भक्तीस लागले लोक अपार । निर्व्यलीक हौनी ॥१०३॥
आनंद - चरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ॥
स्नेहें परिसोत श्रोते संत । चतुर्थोध्याय रसाळ हा ॥१०४॥


॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥