श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - अध्याय पांचवा

श्रीगणेशायनम: ॥ नरसिंह म्हणे बापा ।
श्रवणेंद्रिय तुमचिये कृपा बैभव पावलें मोजितां मापा । पार नाहीं हो सर्वथा ॥१॥
वाङ्मार्धुर्यें मन चेइलें । तेंविं अन्त: करण तोषलें ॥
आतां निरूपी वर्तलें । आनंदमूर्ति - चरित्र ॥२॥
बापू दिनकर म्हणे ऐका । गुरुकृपेचा योग देखा ॥
गौण जरी सर्व लोका । मान्य होय बहुता परी ॥३॥
कृष्णा - पुलिनांत बाहें नगर । तेथें कोणी एक द्विजवर ॥
रामलिंग - सेवा अहोरात्र । पूजन भजन करीतसे ॥४॥
श्रीकृष्णेचें आराधन । लघुरुद्राभिषेक शिवार्चन ॥
प्रत्यहीं दृढ नेम करून । उटज करोनि वसतसे ॥५॥
अंतरीं शुद्ध संकल्प । करोन द्दढ मंत्रघ्यान जप ॥
चार याम आनंदरूप । ध्यानस्थ बैसे कृष्णातटीं ॥६॥
सायंकाळीं नैवेद्य । पात्न करोनिया सिद्ध ॥
कृष्णार्पणासी सानंद । प्रवाहामाजीं संचरे ॥७॥
जळीं अर्पण होते क्षणीं । प्रत्यक्ष होऊनि कृष्णावेणी ॥
सव्यहस्त काढोनी । नैवेद्य ग्नहण करीतसे ॥८॥
प्रत्यहीं ऐसा चमत्कार । होत असतां क्षितीवर ॥
आख्या प्रगटोन नारीनर । दर्शना येती आवडीं ॥९॥
सिद्ध होतां सन्मान । सांगावें नलगे हें कारण ॥
गंगा - कृपें तो ब्राम्हण । मान्य झाला बहुतापरीं ॥१०॥
ऐकोन ऐसा वृत्तांत । दर्शनाचा अंतरीं हेत ॥
आनंदमूर्तीही उद्युक्त । होते झाले सुश्रद्धें ॥११॥
करवीरीं श्रीशंकर भारती । मठीं पौषांत पुण्यतिथी ॥
प्रतिवर्षीं आनंदमूर्ती । जावें हा नेम तयांचा ॥१२॥
बहे क्षेत्रास आधीं जावें । भक्तीनें तपस्वि - दर्शन घ्यावें ॥
या हेतू आनंदमूर्ती स्वभावें । कृष्णा - तटाकीं पातले ॥१३॥
कृष्णातीरीं अरण्यंत । मठी करोन तपस्वी राहत ॥
अती आवडीं त्या स्थळांत । आनंदमूर्ती पावले ॥१४॥
त्यासमयीं तो मुनी । गुंफा कपाटें द्दढ लाऊनी ॥
जपास बैसलासे ध्यानीं । मौन - धारणा धरियेली ॥१५॥
अश्विनीरूढ आनंदमूर्ती । वेगें उतरोन निकट जाती ॥
आश्रमवासियां प्रती पुसती । तपस्वी कोठें आहेत ॥१६॥
येरीं कथिलें यथार्थ । तपस्वी आहेत ध्यानस्थ ॥
कारण सांगावें आमुतें । अंतरीं त्वरित श्रुत करूं ॥१७॥
आनंदमूर्ती म्हणे स्वामी । दर्शना उत्कंठित असों आम्ही ॥
श्रुत करणें गुंफाधामीं । जाणें पुढें शीघ्र असे ॥१८॥
येरीं उटज - द्वार उघडून । कर्णीं कथिलें वर्तमान ॥
तथापि अनादर करून । सत्कार कांहीं न केला ॥१९॥
तपोहानीस कारण । रजोगुण दुष्ट अभिमान ॥
तपसिद्धी योगें करून । पुढिला मानी तृणतुच्छ ॥२०॥
आनंदमूर्ती तये वेळां । येऊनि आश्रमवासियां जवळा ॥
पुसिलें दर्शनाची वेळा । असे कीं नसे सांगावी ॥२१॥
कोणी कांहीं प्रत्युत्तर । नेदूनि केला अनादर ॥
अद्वेष्टा निर्द्वंद्व साचार । आनंदमूर्ती सत्वाथिला ॥२२॥
आधीं सर्वाभूतीं नम्र: । मग त्या मठीस नमस्कार ॥
साष्टांग करोनि पांचवार । अश्वारूढ मग झाले ॥२३॥
मग करवीरातें गेले । मागें कांहीं नवल जाहलें ॥
अवधान देऊन वहिलें । चरितामृत सेविजे ॥२४॥
कृष्णातटीं अनुष्ठानीं । तपस्वी ब्राम्हाण सायान्हीं ॥
प्रत्यहीं नेमाचे परी ते दिनीं । नैवेद्य नेला कृष्णेस ॥२५॥
नैवेद्य - अर्पणाचे समयीं । हात बाहेर न निघे कांहीं ॥
बहु वेळ ब्राम्हाण तो पाही । मार्ग परतला सचिंतमन ॥
निराहारें तो ब्राम्हाण । निद्रा करी त्या दिनीं ॥२७॥
दृष्टांतीं कृष्ण वेणी ते दिनीं । गोचर झाली येऊनी ॥
वेताटी करीं घेऊनि । ताडण केलें यथेष्ट ॥२८॥
निष्ठुर वचनें धि:कारिलें । देऊळ पाडोन आवार रचिलें ॥
कापडी यात्रास्थ लुटिले । अन्नछत्र घातलें त्या द्रव्यें ॥२९॥
प्रासाद देवालय पाडोन । पोवळी घातल्या काय पुण्य ॥
गुरुभक्ता अनादरून । प्रतिष्ठा आपुली मिरविसी ॥३०॥
श्रद्धायुक्त तव दर्शना । आनंदमूर्ति आले या स्थाना ॥
दर्शन न होतां जाणा । अनादरें तयां दवडिलें ॥३१॥
हस्त गोचर होतो म्हणून । गर्वें श्लाघ्यता मानोन ॥
सत्पुरुषाचा अवमान । करितां केंवी साहिजेल ॥३२॥
आजि कर दृष्टी न पडे । हें मानून सांकडें ॥
उपोषणाचा कोणाकडे । भार घालूं पाहसी ॥३३॥
अहा मूर्खा काय केलें । ज्योतिर्लिंग पायीं लोटलें ॥
कीं चिंतामणितें गोफणिलें । हतभाग्या दुर्हृदा ॥३४॥
आनंदमूर्ती परम साधू । शुद्ध सात्विक अभेदु ॥
उपमे शुक कीं प्रल्हादु । ‘तुल्यप्रियाप्रिय जो’ ॥३५॥
गंगादि पुण्य नद्या आम्ही । साकाररूप त्याचिये धामीं ॥
सेवा करितों मनोधर्मीं । ऐसी योग्यता तयाची ॥३६॥
त्याचा अपमान केंविं साहों । तया एकवीस जन्म पहा हो ॥
योगाभ्यासें जन्म - निर्वाहो । होत आला आजवरी ॥३७॥
या शब्दें विप्र खोंचला । जागृत अवस्थेवरी आला ॥
पश्चाताप बहुत जाहला । त्राहे त्नाहे म्हणोनी ॥३८॥
शिष्यवर्गीं समाचार । झाला तो कथिला सविस्तर ॥
सत्यप्रत्ययी तो विप्र । चित्तीं अति व्याकुळ ॥३९॥
अहा वेळ वोखटी आली । दैवें सुरभी प्राप्त झाली ॥
ओढाळ म्हणोनि पिटविली । रागें ताडोन दूरवरी ॥४०॥
मग तो ब्राम्हाण प्राप:काळीं । स्नान करोन कृष्णाजळीं ॥
करवीरमागें तये वेळीं । नमस्कारीत निघाला ॥४१॥
भूमीस साष्टांग प्रणिपात । घालीत करवीरपंथें जात ॥
त्याचे शिष्यवर्गें त्वरित । आनंदमूर्तींसी जाणविलें ॥४२॥
ऐकोन धावले मूर्ति आनंद । परुद्वेगाचा अंतरीं खेद ॥
निर्मत्सर निर्द्वंद्व । अत्यंत दु:खें दु:खित ॥४३॥
मन्निमित्त ब्राम्हाणा श्रम । केंवी घडवी माझा राम ॥
दु:खें पोळलें अंतर्याम । पंथीं धावले अतित्वरें ॥४४॥
दुसरे देनीं पडल्या गांठीं । प्रेमालिंगनें झाल्या भेटी ॥
सबाहय अभ्यंतरीं मिठी । एकसरें पडियेली ॥४५॥
आपुले स्थळा तो ब्राम्हण । सह आंनदमू्र्ती येऊन ॥
श्रीकृष्णेंत करोनि स्नान । पूजाजपनेम सारिला ॥४६॥
वेगें करवोनि पाक - निष्पत्ती । आसनीं बैसवोन आनंदमूर्ती ॥
संतपूजा यथानिगुती । केली सर्व उपचारें ॥४७॥
नैवेद्य घेऊनि कृष्णेप्रती । निघाले सवें आनंदमूर्ती ॥
प्रार्थून कृष्णाभागीरथी । षोडशोपचारें पूजिली ॥४८॥
नैवेद्य नेतांच प्रवाहांत । गंगेंतून निघाले दोन हस्त ॥
सुबद्ध कंकण चुडेयुक्त । दैदीप्यमान प्रगटलें ॥४९॥
आनंदमूर्तींनीं देखिले । अंतरीं अतिविस्मित झाले ॥
निष्ठा पाहून संतोषले । म्हणती धन्य तपस्वी ॥५०॥
नैवेद्य देऊनि ते अवसरीं । तुष्टला विप्रोत्तम अंतरीं ॥
आनंदमूर्तींस बरोबरी । घेऊनि गेला गुंफेंत ॥५१॥
पंक्तीस भोजन सारिलें । त्रयोदशगुणी विडे दीधले ॥
वचनीं प्रिय गौरविलें । राहविले त्रिरात्र ॥५२॥
करोन विप्राचें समाधान । आनंदमूर्ती निघाले तेथून ॥
सांगली क्षेत्रास येऊन । विश्रामले चिरकाळ ॥५३॥
ब्राम्हाण वार्ता साक्षात्कार । आनंदमूर्तींचाही प्रकार ॥
ऐकोन बहुत नारीनर । विस्मय करिती अंतरीं ॥५४॥
ऐसा गुरु - उपासक - महिमा । वर्णितां कधीं न पवे सीमा ॥
धर्म अर्थ मोक्ष कामा । प्राप्त करी ही कथा ॥५५॥
भाद्रपदीं उत्सवानिमित्त । आनंदमूर्ती देशावरांत ॥
किल्ले पन्हाळा येथें । गेले होते स्वैच्छा ॥५६॥
रामचंद्रपत अमात्य । दरखदार मूर्धन्य तेथ ॥
परमसुज्ञ सद्भक्त । त्याचे गृहीं राहिले ॥५७॥
मृदंगखोड तत्संग्रहीं । एक अत्युत्तम असे पाही ॥
असज्ज म्हणोनी कोणी कांहीं । वादन न करोनी पाहिलें ॥५८॥
आतां येथें याचा उपयोग । नसे यास्तव हा मृदंग ॥
आनंदमूर्तीस देऊन सांग । कीर्तनीं रंग भरवावा ॥५९॥
या हेतू तो पखवाज । स्वामीस दिधला कीर्तनव्याज ॥
मठीं नेऊनी घालिजे साज । तेथें उपयोगी हा असे ॥६०॥
अवश्य म्हणोनी आनंदमूर्ती । मृंदग आणिला सांगलीप्रती ॥
उत्तम सजवावा असें चित्तीं । बहुधा आलें स्वामींच्या ॥६१॥
भिवा गुरव अमणापूरचा । वार्षिकी मृदंगी श्रीचे मठींचा ॥
तया हातीं मृदंगाचा । साज करविला पसंत ॥६२॥
भाद्रपद शुद्ध पाडवा । प्रारंभ झाला उत्सवा ॥
मृदंग सहित गुरव भिवा । कीर्तनीं उभा ठाकला ॥६३॥
सुगर वादनकर्ता महा । उंच स्वर लागला टाहा ॥
घोडीवर ठेवून पाहा । वाजविला अर्धरार्त्रीं ॥६४॥
ध्रुपद प्रबंध तिलाणा । कंपस्वर गीत तनाना ॥
मृदंगमोहरे उठती नाना । कालुझिल्ल ज्या परी ॥६५॥
निवांत रात्रीं कीर्तनीं । मृदंगाचा उठतां ध्वनी ॥
सुवाद्य नाद हा कर्णीं । गेला क्रोशत्रयावरी ॥६६॥
दिलेलखान दुराचारी । यवन मिरजेचा अधिकारी ॥
रात्रीं शयन बंगल्यावरी । नाद कर्णीं झोंबला ॥६७॥
जैसा कालू चौघडयांत । तैसा ध्वनी निर्मल उठत ॥
महंमद दिलील मनीं खोचत । परचक्र दहशत घेउनी ॥६८॥
वेगें उठवोनी परिवार । चौदिशे धाडिले हेर ॥
वाद्यपदार्थ सत्वर । सांगली मार्गें धावती सत्वर ॥
वाद्यध्वनीचा सुमार । धरोन आले श्रीमठा ॥७०॥
चौघडया ऐसा आवाज । वाजतो कीर्तनीं हा पखवाज ॥
ठायीं पाडून म्हणती काज । दुजें नाहीं यापुढें ॥७१॥
मध्यरात्र अंधार गडद । कीर्तनीं संचरोनि ते अविंध ॥
म्हणती कायसा गजर विशद । आम्हांप्रती सांगणें ॥७२॥
हें कृत्य करविणार कोण । ठायीं पाडावा यजमान ॥
पुसतां बोलले कोणी जन । आनंदमूर्ती जाणा ते ॥७३॥
आनंदमूर्तीही आनंदांत । बैसले होते श्रवणातें ॥
यवनीं नेऊनि तयातें । कठिण हस्तें वोढिलें ॥७४॥
हाहा:कार जाहला तेथें । कोण कोठील हें नकळे मातें ॥
निष्ठुर तदा स्वामीतें । मिरजेस न्यावया सिद्ध झाले ॥७५॥
मिरजेस जातां उताबेळ । मठीं निरोपिती श्रीदयाळ ।
कीर्तन - रंग हा प्रांजळ । स्वस्थपणें चालविणें ॥७६॥
उदयीक श्रींचा मुख्य दिन । करविजे सांग संपादा ॥७७॥
आम्ही निक्षेपें उदयीक येतों । आतां तरी श्रीइच्छें जातों ॥
ऐसें बोलोन मग तो । पंथ धरिला मिरजेचा ॥७८॥
कोणी तदनुगत निघाले । तयांतें स्वामींनीं वर्जिले ॥
तैसेच रात्रामयीं गेले । मिरजगांबीं तातडी ॥७९॥
यवन मुख्य दिलेलखान । हेर सांगती वर्तमान ॥
याचिया धामीं कीर्तन - । मध्यें पखवाज वाजला ॥८०॥
तो ध्वनी ऐकून स्पष्ट । मर्जी झाली क्रोधाविष्ट ॥
ऐसा बंडकर्ता धीट । कोण तो आणा शीघ्रगती ॥८१॥
त्यावरोन आनंमूर्ती । धरोन आणले शीघ्रगती ॥
आतां शिक्षा यथानिगुती । आज्ञेवरुनी करिजेल ॥८२॥
हें ऐकोन दिलेलखान । आनंदमूर्तींस समोर आणवून ॥
निष्ठुर शद्वें जरब देऊन । बोलला तेंचि वदतसे ॥८३॥
भिक्षुकवृत्ती वागवितां । नानापरी बंड करितां ॥
अवाई घालोनि भेडसावितां । कोणाचा हुकूम वदा हो ॥८४॥
स्वामींनीं यथार्थ कथिलें । मत्सर आचार आम्हां नकळे ॥
बहुतापरी निरोपिलें । परि तें न माने तयातें ॥८५॥
आज्ञापिलें स्वदूतांसी । खोलींत नेवोन कोंडावें यांसी ॥
पहारा मजबूत खोलीपाशीं । कुलूप घालोन खडे रहा ॥८६॥
बुरुज - खोलींत तये वेळे । श्रीआनंदमूर्तीसी घार्तेल ॥
कुलूप ठोकोन हात दीधले । महंमद दिलीलखाना जवळिक ॥८७॥
दुसरे दिनीं प्रात:काळीं । शहरांतील विप्रमंडळी ॥
वृत्त ऐकोन यवना जवळीं । मुत्सद्दीही पातले ॥८८॥
रदबदली करिती यवनास । आनंदमूर्ती थोर सत्पुरुष ॥
यांचा अपराध कांहीं नसे । त्यांसी दंड कासया ॥८९॥
आजि त्यांचिये गुरूंची । पुण्यतिथी प्रतिवर्षाची ॥
अप्रतिष्ठा न कीजे तयांची । मुक्तता शीघ्र करावी ॥९०॥
येरें तिळमात्र न मानोन । बोलतसे जरब देऊन ॥
कीर्तन न करीं आजपासोन । ऐसा जामीन देइजे ॥९१॥
स्वारीखर्च कोठें पहावा । हा त्याजकडोन घ्यावा ॥
हें न होता मुक्त व्हावा । ऐसें न होय कालत्रयीं ॥९२॥
रदबदली करितां सर्व थकले । रविबिंब अस्तमाना गेलें ॥
रात्र होतां नवल वर्तलें । तें परिसावें अदभुत ॥९३॥
स्नान नसे मग पानही नसे । दुर्घट ओढवलें ऐसें ॥
आजि श्रींचा मुख्य दिवस । रामा संकटहर्ता तूं ॥९४॥
ऐसें चिंतुनी आनंदमूर्ती । नावेक जों ध्यान करिती ॥
इतुक्यांत दयाळू गुरूमूर्ती । विप्रवषें पातले ॥९५॥
हांक मारून तथास । म्हणती चला सांगलीस ॥
उत्सव समारंभ होत सुरस । साधुसंत मिळाले ॥९६॥
तुमची वाट सर्व पाहती । उत्कंठित झाले भेटीप्रती ॥
यालागी त्वरित गती । चला वहिले मजसवें ॥९७॥
येरें पुसिलें तयालागीं । घेतली काय परवानगी ॥
तयावीण तुमचे संगीं । येणें केंवि घडेल ॥९८॥
अपरात्रीची वेळ । किल्ले दरवाजे महामूर सकळ ॥
खोलींत बाहेर आर्गळा । कुलुपें कपाटें दृढ केलीं ॥९९॥
स्वामी बोलिले कैंची अटक । दरवाजे मोकळे असती देख ॥
निद्रापन्न सकळ लोक । किल्ली ना कुलुपें द्वारांसी ॥१००॥
व्यवधान नसे कांहीं । सत्वर निघोन बाहेर येई ॥
हें परिसोन लवलाही । खोलीबाहेर निघाले ॥१०१॥
श्रीगुरुकृपा झालिया पूर्ण । दुर्लभ तें सुलभ होय जाण ॥
वसुदेव - देवकी लागून । ऐसा प्रसंग वोढवला ॥१०२॥
मुक्तकर्ता श्रीरघुनाथ । रक्षण करी अनंत हस्तें ॥
दों करांचा मानव तेथें । काय निग्रह करूं शके ॥१०३॥
क्षेमरूप आनंदयोगी । श्रीगुरुसवें सांगली लागीं ॥
येऊनि पोंचतां कीर्तनरंगीं । ब्रम्हानंद वोसरला ॥१०४॥
फिरोन पाहतां तो ब्राम्हाण ॥ न दिसे झाला अदृश्यमान ॥
सर्वीं निश्चय केला जाण । सर्वही कर्ते स्वामीच ॥१०५॥
तयांवीण ऐसें कार्य । कोण करूं शके पाहे ॥
सर्वही म्हणती त्राहे त्राहे । सकंट - हरणा श्रीरामा ॥१०६॥
आनंदमूर्ती आनंदरूप । स्नानसंध्या सारोन जप ॥
पंक्तीं घेऊनि संत अमूप । भोजन - प्रसाद संपादिला ॥१०७॥
रात्रौ कीर्तनाचा गजर । तिसरे दिनीं उठोन सत्वर ॥
गोपाळकाला यथा प्रकार । लळितप्रसाद संपादिला ॥१०८॥
इकडे किल्यांत दिलेलखान । चित्तीं विचार करी जाण ॥
दोन दिवस ब्राम्हाण । खोलींत कोंडोन ठेविला ॥१०९॥
त्याची अवस्था काय झाली । नकळे उघडोन पहावी खोली ॥
सत्वर कुलुपें काढविलीं । समक्ष उभें राहून ॥११०॥
ब्राम्हण दृष्टीं न पडतां । परम आश्चर्य वातलें चित्ता ॥
बातमी लावोनी तत्वता । गुप्त हेर पाठविले ॥१११॥
त्यांहीं कथिलें वर्तमान । आनंदमूर्ती स्वगृहीं जाण ॥
परमोत्साहें कीर्तन । समारंभ करिताती ॥११२॥
यवनें केला अति विस्मय । म्हणे जहालें कैसें काय ॥
ऐशा अटकेंतून कोणी पाहे । काढोन नेला ब्राम्हाण ॥११३॥
संतचरित्र न गमे कांहीं । उगाचि विस्मय करोनी राही ॥
सुखरूप आनंदमूर्ती पाही । परमानंद वोसंडे ॥११४॥
चरित्र हें वर्णन करितां । ब्रम्हानंद होतसे चित्ता ॥
गोपाळात्मज विनवी संतां । पुढें अवधान देइजे ॥१५॥
आनंदचरितामृतग्रंथ । बापानंदविरचित ॥
स्नेहे परिसोत साधूसंत । पंचमोध्याय रसाळ हा ॥११६॥


॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु. ॥