श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - अध्याय सोळावा

श्रीगणेशायनम: ॥ आनंदचरित महादाख्यान ॥ बापानंद आनंदघन ॥
वक्तृत्ववृष्टी करून । नृसिंह - कर्णक्षेत्र निवविलें ॥१॥
मागें निर्याण प्रकरण । संपलें श्रीदयेंकरून ॥
पुढें सुरस अनुसंधान । कळसाध्याय कथिजेला ॥२॥
श्रीचे शव - दहनस्थानीं । समाधि वृंदावन बांधोनी ॥
पादुका - प्रतिष्ठापनालागोनी । आरंभ केला सुपुत्रें ॥३॥
क्षेत्राक्षेत्रा लागून पत्रें । लिहोन धाडिलीं पवित्रें ॥
श्रेष्ठ ब्राम्हाण सत्पात्र । आणावया लागोनी ॥४॥
भिलवडी आणि नरसिंहपुर । सांगली आणि अष्टें नगर ॥
कराड क्षेत्र आणि करवीर । क्षेत्रींचे विप्र आणविले ॥५॥
निरंजनस्वामी कृपावंत । राहणार कर्‍हाड क्षेत्नांत ॥
तेही विप्र - समुदाया समवेत । पातले पत्रावरूनी ॥६॥
विप्रमंडळी सहवर्तमान । पोंचले जेथें वृंदावन ॥
सहज स्वामी निरंजन । भाषण केलें संगियां ॥७॥
आनंदमूर्तींनीं कधींही । आपुले आधीं आम्हांस पाहीं ॥
नमस्कार करूं दिधला नाहीं । नमस्कारितों आज आम्हीं ॥८॥
ऐसें बोलोन नमस्कार । घालणार तोंचि अगोदर ॥
जड वृंदावन नमस्कार । करितें झालें निरंजना ॥९॥
ऐसें गमलें सर्व त्रांस । इमारत पडते काय भूमीस ॥
इतुकेमाजि जैसें तैसें । उभें राहिलें पूर्ववत ॥१०॥
एकही चिरा न ढळतां । अवक्र वृंदावन उभें राहतां ॥
आश्चर्योत्कर्ष सर्वां चित्तां । झाला तेव्हां अपार ॥११॥
निरंजनस्वामी बोलले । वृंदावन श्रीमूर्तीं जाहले ॥
आमुचे नमस्कारार्थ लवले । वृंदावनस्थ ते साधु ॥१२॥
ब्रम्हावृंदासहवर्तमान । मंत्रोक्त केलें प्रतिष्ठापन ॥
संतर्पण समीचीन । झालें सांगोपांग तें ॥१३॥
सभावनादि सत्कार । करून घातले नमस्कार ॥
बोळवण यथाप्रकार । सर्वत्रांची पैं केली ॥१४॥
मग आपआपुले पैं स्थळा । गेला विप्र आणि सज्जनमेळा ॥
सद्वंग - प्रेमा आगळा । चढाओढी चुणावे ॥१५॥
ऐसें स्वामींचें निर्याण । कथिलें मुळापासोन ॥
एतद्‌विषयीं आशंकोन । प्रश्न करील जरी कोणी ॥१६॥
सांगलीहून शव आणिलें । स्वर्गस्थ दुंदुभी ते वेळे ॥
वाजिन्नले ऐसें लिहिलें । डोल झाला वृंदावनीं ॥१७॥
दुजे दिवशीं गीता - श्लोक । साधु - परित्राणार्थ एका ॥
वृंदावनस्थ रघुनायक । बोलले वृंदावनीं तें ॥१८॥
श्रीचें शरीर सर्वांसी । गोचर झालें तृतीय दिवशीं ॥
प्रमाण इतुक्या गोष्टींसी । काय ऐसें म्हणाल ॥१९॥
चिंतामणभट ज्योतिषी ।" कलेढोणचे मिराशी ॥
होते निर्याण - समयासी । शिष्यवर्ग स्वामींचे ॥२०॥
तेणें वाचोन स्वयें । आशंका सर्व निवटेल ॥२१॥
कृष्णानंद आनंदघन । श्रींचे ज्येष्ठ नंदन ॥
तेणें स्वांगें केलें कवन । श्रींचें निर्याण - प्रकरणीं ॥२२॥
आरती लिहिली तेथें भावें । लेहून दर्शविलें सर्वें ॥
तेंचि सज्जनीं वांचून पाहावें । तेणें शंशय निरसेल ॥२३॥
वडिलां वडिलां मुखीं कथा । आली असे श्रोत्र - पथा ॥
तेचि बखर मति यथा । लेहुनिया ठेविली ॥२४॥
आनंदमूर्तींचीं चरित्रें । स्थळोस्थळीं केलीं चित्नें ॥
श्रीसदगुरु - कृपामात्रें । तितुकीं कोणास विदित ? ॥२५॥
श्रोत्रानेत्रा गोचर झालीं । परंपरेनें श्रवण केलीं ॥
तेचि बखर असे लिहिली । ब्रम्हानाळीं सद्वंशीं ॥२६॥
श्रीमूर्ती जीवें असते काळीं । बोलले एकदोन वेळीं ॥
वृंदावना सन्मुख जवळीं । वृंदावन दुजें न करावें ॥२७॥
पुढें अंतकाळ जाहला । सत्पुत्न - चित्तीं हेतू गमला ॥
वृंदावन श्रीमूर्तीला । पादुकारूप स्थापावें ॥२८॥
कृष्णानंदें श्रीस्त्रामींसी । विनवणी करून सायासी ॥
आज्ञा घेवोन वृंदावनासी । काम लाविलें सत्पुत्रें ॥२९॥
काष्ठ खडावा पायांत । घालीत होते श्रीरघुनाथ ॥
यास्तव पुढें वंशांत । काष्ठ - खडावा घालूं नये ॥३०॥
ऐसी आज्ञा श्रीआनंदें । केली असे प्रसिद्ध ॥
तदनुसार वंशज बुद । खडावा कोणी न घालिती ॥३१॥
असो ऐशी निर्मळ कथा । बापू दिनकर होऊनि वक्त ॥
निरोपिली माणिक - सुता । नरसिंह भटाकारणें ॥३२॥
विस्मयाविष्ट नरसिंह जोशी । विनंती केली बाप्पाजीसी ॥
येवढी बखर आम्हांसी । लिहूनियां देइजे ॥३३॥
मग बोलले दिनकर - तनय । मठामाजि बखर आहे ॥
तिची प्रत लिहून स्वयें । पोंचवीन आपणांतें ॥३४॥
त्यावर दिवस कितीएक गेले । तें तैसेंच राहिलें ॥
बाप्पानंद समाप्त जाहले । स्वल्पकाळोंचि तेथोनी ॥३५॥
नृसिंह जोशियाचा पौत्र । रघुनाथ नामक सुपात्र ॥
उद्योग करोन स्वतंत्र । बखर आणिली निजांगें ॥३६॥
प्रथम येवोनी तिशिंगीसी । भेटला गोपाळ - तनयासी ॥
बखर दाविली तयासी । पहा म्हणोन सांगितलें ॥३७॥
येरें बखर पाहोन । चित्तास झालें समाधान ॥
ग्रंथ रचावा म्हणोन । हेतू अंतरीं उपजला ॥३८॥
मग मंगळाचरणापासोन । परंपरे सहवर्तमान ॥
रघुनाथाचें आगमन । भेटी आनंदमूर्तींची ॥३९॥
तया पासोन निर्याण । पर्यंत केलें निरूपण ॥
ग्रंथ जाहला येथोन । कळसाध्याय सोळावा ॥४०॥
गोपाळात्मज कवि चकोर । इच्छीत श्रीगुरु - चरण - चंद्र ॥
स्वामी माझे गुण - समुद्र । प्रेमभरतें भरविती ॥४१।
मी संतांचा लडिवाळ । मतिमंद सर्वागळा ॥
कृपावंत संत लळा । चालविती तो थोकडा ॥४२॥
प्रथम अध्याय गहन । परंपरा कथिली जाण ॥
तीर्थयात्रा रघुनंदन । केली हे कथा वर्णिली ॥४३॥
भेट अप्पाजीपताची । आणि रघुनाथस्वामींची ॥
होऊन गंगा सौरस्याची । भरोन गेली दोहों थडी ॥४४॥
हाचि भाव प्रथमाचा । आतां द्वितीय अध्यायाचा ॥
मुख्य पाया ग्रंथाचा । तोही निवडोन दावितों ॥४५॥
श्रीआनंद - रघुनाथ - मिळणी । होऊनि वसगडया जावोनी ॥
ब्रम्हाग्रहातें उद्धरोनी । वस्ती तेथेंच पै केली ॥४६॥
आतां तृतीयाध्यायीं कथा । निरूपण झालें श्रीची सत्ता ॥
वसगडे ग्रामीं असतां । नवल एक वर्तलें ॥४७॥
श्रीरघुनाथ - आसनशिळा । तिजवर मारुती उमटला ॥
श्रीराम कौतुक अवलीळा । दाखविते झाले जगातें ॥४८॥
पुढें संकेश्वरालागी । तपास गेले रघुनाथ वेगीं ॥
पत्ता न लागतां आनंदयोगी । आहाळोन झाले व्याकुळ ॥४९॥
भेटी केली तेथेंचि गुरुवें । श्रीनें संवोखलें बरवें ॥
आनंदमूर्ती ऐसें नांव । ठेवियेलें दयाळें ॥५०॥
वंध्या स्त्रियेसी पुत्रदान । दीधलें श्रीरघुनंदनें ॥
पुढें वसगडेस येऊन । पोंचले श्रीरघुनाथ ॥५१॥
समाप्त जाहले वसगडे नगरीं । संस्कार केला कृष्य्णातीरीं ॥
ब्रम्हानाळा शेजारीं । इतुका भाव तृतीयाचा ॥५२॥
चतुर्थाध्यायीं वृंदावन । बांधोन केलें प्रतिष्ठापन ॥
डोल होतां सर्वजन । विस्मयाविष्ट जाहले ॥५३॥
प्रतिवर्षीं पुण्यतिथी - नेम । पुढें जयराम - समागम ॥
वड्गांवीं पुरुषोत्तम । नवल चरित्र दाविती ॥५४॥
चर्मुपान पुस्तक । करोनी जनां दाविलें देख ॥
इतुका भाग करोनी लेख । चतुर्थाध्याय संपविला ॥५५॥
पंचमाध्यायीं निरूपण । कृष्णातीरीं ब्राम्हाण ॥
राहिला उटज करून । साक्षात्कार दाविला तया ॥५६॥
मृदंग आणिला पन्हाळ्याहून । भिवा गुरवासी अधिकारी करून ॥
सांगलींत उत्सव कीर्तन । होतां यवना जाणवलें ॥५७॥
मिरज किल्लेंत नेऊन । कैद केलें श्रीगुरूलागून ॥
तयातें श्रीरघुनंदन । ठकवोन श्रीमूर्ती सोडविली ॥५८॥
सहावे अध्यायीं दिलेलखान । मिरजेस श्रीमूर्ती नेऊन ॥
केलें कापटय विंदान । भ्रष्ट करावें या हेतू ॥५९॥
त्यास दाविला चमत्कार । मिळालें इनाम अग्रहार ॥
महारुद्रपंत बहेकर । सनाथ केलें मग त्यांतें ॥६०॥
सप्तमीं चोरांसी दर्शन । दिधलें धनुर्धररूपानें ॥
द्रव्य आणिलें पन्हाळेहून । ऋणमुक्त जाले श्रीमूर्तीं ॥६१॥
आठव्यांत कथिली महायात्रा । सौख्य दिधलें सावकारा ॥
समंध नेला गंगातीरा । उद्धार केला तयाचा ॥६२॥
नवमांत नागठाणेंत । चमत्कार दाविला ब्राम्हाणीतें ॥
शहर हैदरावादेंत । केशवस्वामीस भेटले ॥६३॥
दशमाध्यायीं कथा गहन । मिरजेस नेले दिलेलखानें ॥
चमत्कार त्या दाऊन । मिजजेस राममठ स्थापिला ॥६४॥
रंगनाथ गोपाळस्वामीस । आधीं नमस्कारासरिसे ॥
वाफ्यांत पडोनि साधूंस । चमत्कार कांहीं दाविला ॥६५॥
अकराव्यांत सुरस कथा । मृताश्च जीववोन रंगनाथा ॥
संतोष देवोन सर्व संतां । गौरविलें बहुसाल ॥६६॥
भागानगरींत म्हातारी । केशवस्वामीस आपुले घरीं ॥
भोजना नेलें ते अवसरीं । विपरीत केलें कौतुक ॥६७॥
बाराव्यांत श्रीरंग । गोपाळस्वामीचिया संगें ॥
सडे सांगलींत जळमार्गें । भिलवडी पासोन रात्री आले ॥६८॥
प्रतिनिधीचें प्रकरण । अध्याय बाराव्यांत जाण ॥
यवन सरदार लुटोन । आले परत ब्रम्हानाळा ॥६९॥
तेराव्यांत रघुनंदन । पंतासी दिधलें दर्शन ॥
सनद दिधली करोन । ब्रम्हानाळ ग्रामाची ॥७०॥
चौदाव्यांत अपंक्त विप्र । उद्धरोन केला पवित्र ॥
विप्र मंडळींस चमत्कार । पाप पुरुष दाविला ॥७१॥
पंधरा सोळांत निर्याण । कथन केलें ग्रंथ पूर्ण ॥
झाला श्रीरघुनाथार्पण । कायावाचामनेंसी ॥७२॥
सोळा अध्याय ग्रंथ ।  कीं षोडशोपचारसहित ॥
पूजोनिया रघुनाथ । कृतकृत्य मी झालों ॥७३॥
कीं ग्रंथरूप पौर्णिमा । षोडश कळेचा चंद्रमा ॥
उदय पावोन रघूत्तमा । आल्हाद देऊं इच्छित ॥७४॥
श्रीप्रसादें हा ग्रंथ । पठण करी जो नित्य नित्य ॥
निर्व्यलीक होऊनि चित्त । येणें श्रीमूर्ती संतोषे ॥७५॥
संतति आणि संपत्ती । प्रवृद्ध त्याचिये गृहीं होती ॥
शेवटीं ब्रम्हा - पदवी - प्राप्ती । होईल श्रीचे कृपेनें ॥७६॥
ऐसा मूळ बखरींत । लिहून ठेविला इत्यर्थ ॥
सद्वंशाचा वचनार्थ । अन्यथा होऊं केवी शके ॥७७॥
मुख्य पाहिजे विश्वास । कामा नये अविश्वास ॥
महाराज विश्वासी नरास । कृपा करिती निश्चयें ॥७८॥
गोपाळात्मज हो पोसणा । श्रीसंतवळाडी जाणा ॥
गंगाराम श्रीगुरुराणा । कृपा करिती सुदिन तो ॥७९॥
इतिश्री चरितामृत ग्रंथ । सोळा अध्याय पूर्ण येथ ॥
कृपावंत तुम्ही संत । मना आणोन पहावा ॥८०॥
शके सतराशें एकाहत्तरीं । सौम्यनाम संवत्सरीं ॥
शुक्ल पंचमी इंदुवारीं । आषाढांत ग्रंथ संपविला ॥८१॥


॥ इति श्रीआनंदचरितामृतं संपूर्णमस्तु ॥