श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - पद २

श्रीरघुनाथ स्वामीचें
भोळी रुद्राबाई बैसली त्रिपुरपुर - शिखरीं हो ॥धृ०॥
पद्मासन मांडुनी श्रृंगीं बाहुनि सप्त स्वरीं हो । अनुहात ध्वनी गर्जती अबरी हो ॥भोळी०॥१॥
गंगाजळ मस्तकीं जटा बांधुनिया कूसरी हो । शोभति कानीं मुद्रा चंद्र ठेउनि मौलावरी हो ॥
पंचानन पद्माक्षी अंबा विषम - नेत्न - धारी हो । रुंडमाळा गळा सर्प चुळ्बुळती शरीरीं हो ॥भोळी०॥२॥
भस्मांकित शरीरीं त्र्यंबक धनुष्य घेउनि करीं हो । त्रिशूळ डमरु. चर्म - वसन गज चर्माचें धारी हो ॥
आशीविष - प्राशिनी अंबा नीलग्रीव गौरी हो । क्षुद्रघंटिका कटितटीं अंकीं हेमागिरी कुमरी हो ॥भोळी०॥३॥
त्रिपुर - मर्दन बाळी मन्मथ लीलामात्नें जाळीं हो । अंधक - मस्तक फाळी बहुकाळी कपाळी हो ॥
उदार निर्जरपाळी दुसरी नाहीं भूमंडळीं हो । देव टाळी नाचति ब्रम्हादि सकळीं हो ॥भोळी०॥४॥
चरणीं ब्रीदावळी चरण सप्तही पाताळीं हो । द्वारीं गण गंधर्व पूजा करिती सर्वहि काळीं हो ॥
कलिमल - नाशन नाम वदति ब्रम्हादि सकळी हो । सकळा घटिं पटिं पूर्ण बाळी भोळी तूं वेल्हाळी हो ॥भोळी०॥५॥
कृशानु रेत तुझा मोठा नवलाव सुंदरी हो । भूतांचे स्वामिनी विचरसि भूतांचे अंतरीं हो ॥
बाम्हांतरिं व्यापुनि अससी नलिनी - पत्रापरी हो । अकळे न कळशी कुणा अपरंपरा परी हो ॥भोळी०॥६॥
अतर्क्य तर्काची किती छाया तसवराची हो । निद्रा उन्मनीची किती पाल्हाळिण पवनाची हो ॥
लहरी आनंदाची किती शांती उदबोधाची हो ॥भोळी०॥७॥
हर्षे अंबा कैशी मूर्तीं अमृताची जैसी हो । अमरा अमर वल्ली भिल्ली भूषण पुण्यराशी हो ॥
कलिमल बव्हल नाशी तारक मंत्रातें उपदेशी हो । भवभय भंजन नाशी काशीपुर - पट्टनिवाशी हो ॥भोळी०॥८॥
करुनी वेणीस्नान येती तुझिया गोंधळासी हो । माघ कृष्ण - पक्षीं पुण्यतिथी चतुर्दशी हो ॥
रात्रीं जागृत राहुनि अपरापूजा अर्पिति ते दिवशीं हो । हरहर नामें उदोऽबोलति चरणापाशीं हो ॥भोळी०॥९॥
सन्निध सुरगण दाट अजगर हार घालुनि कंठीं हो । व्याघ्राजिन कटितटीं तेजें सत्रावी गोरटी हो ॥
परात्पर मोठी ध्येय - ध्यानाची धूराटी हो । ध्येय - ध्यान - ध्याता जेथें नाहीं नाहीं ही त्रिपुटी हो  । ऐशी सदगुरु कृपें रामें ऐक्यें दिली भेटी हो ॥भोळी०॥१०॥