श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - अभंग

सद्‌गुरु श्रीराम जे दिनीं भेटला । श्रम पै तुटला संसारींचा ॥१॥
संसारींचा श्रम अनादि पै होता । चरणदर्शन होतां भस्म केला ॥२॥
प्रथम दर्शन नमस्कार होतां । मूर्ति पै पाहतां श्रम गेला ॥३॥
अनादि संसार नाहीं ऐसा केला । ब्रम्हानंदें ठेला ब्रम्हानंदीं ॥४॥
अनधिकारी झालों विषयीं लंपट । उद्धरी चोखट कृपामात्रें ॥५॥
समर्थाची करणी रंका उद्धरण । दीनासि स्थापन संनिधानीं ॥६॥
गांवरस होता गंगा वरी आली । तैसी परी झाली अनधिकारी ॥७॥
चिरगूट पै होतें निशाणीं लाविलें । संरक्षण पडिलें राजयासी ॥८॥
विषाचा कल्लोळ शंकरें धरिला । अंगिकार केला आवडीनें ॥९॥
तैसें मज केलें विषयीं लंपटा । संतांच्या चोहटा बैसवीलें ॥१०॥
प्रथम दर्शन धन्यग्रामीं झालें । देखतांचि गेलें संशयजाल ॥११॥
सखा आपा नामा याचे बागेमध्यें । मन तें निमग्न पादपद्मीं ॥१२॥
देहाचा अभिमान शरीरीं पै होता । जाणिवेचा ताठा लोकमान्य ॥१३॥
भिक्षुक पै देह चावट शोधक । विद्या वयें उन्मत्त सप्तदशीं ॥१४॥
सप्तदश वर्षीं अंगिकार केला । आनंद तारिला पादपद्मीं ॥१५॥
पादरजस्नानें पावन पै केले । यत्नें सहय केले अपराध ॥१६॥
सद्‌गुरु श्रीराम प्रसन्न हौनी । निरंजन लिंबोणी गंगास्नान ॥१७॥
तेथें पै नेवोनी उत्साहभुवनीं । स्वामी संतोषोनी दया केली ॥१८॥
पद्महस्त माथा स्वामींनीं ठेविला । तेचि समयीं केला गुणतील ॥१९॥
गुणातीत सुखमय मज केलें । संबोधितां गेलें मायाजाळ ॥२०॥
मायाजाळ मग नाहीं ऐसें केलें । ब्रम्हासुखीं ठेलें आपेंआप ॥२१॥
आपेंआप ऐस स्वानंदभुवनीं । विपरीत त्यजोनी नामरूप ॥२२॥
ऐसा आशीर्वाद देवोनी ठेविलें । मज बैसवीलें संतांपाशीं ॥२३॥
बाळराजा होतों पदरीं पडलों । वडिलीं दवडिलों अनावडीं ॥२४॥
परमार्थी जाहलों प्रपंचीं मूकलीं । देहजना वीटलों कृपायुक्त ॥२५॥
संसारीं उदास हौनी वर्तत । गृहिणी - गृहांत पराङमुख ॥२६॥
देखोनी निराश्रय अंगिकार केला । कृपेनें पाळिला रात्रंदिवस ॥२७॥
माझा अभिमान त्रैलोक्यीं रक्षिला । त्यानें पूर्ण केला कृपामात्रें ॥२८॥
कोणे एके क्रिये उणेंचि पडेनां । यश समस्त दीना रक्षियलें ॥२९॥
संसाराचा वारा म्यां नाहीं देखिला । समर्थाच्या उदरा पूर्ण आलों ॥३०॥
देशकाल नेणे युगाचे पै धर्म । साम्राज्य - संभ्रम नित्य वसा ॥३१॥
चिंता मज कांहीं संसाराची नाहीं । चरित्रें पै पाही पदोपदीं ॥३२॥
अनेक चरित्रें लोकां दाखविलीं । गुढी उभारिली रामराज्य ॥३३॥
अनाथ दीनाचा अन्नसत्रमेळा । पुरवितो सोहळा याचकाचा ॥३४॥
राया रंका सुख अदभुत देवोनी । उत्साह भुवनीं करवीतसे ॥३५॥
कर्ता कोणी नाहीं आपणची कर्ता । जढमूढ समस्तां पाळीतसे ॥३६॥
जें जें वेळीं जैसें पाहिजेसें होतें । पुरवितसे तें तें स्वामी माझा ॥३७॥
धनधान्य सर्व जे वेळा पाहिजे । आणोनी पुरविजे सर्वस्वेंसी ॥३८॥
आनंदमूर्तीसी माझा मीच आहे । ऐसी कृपा बाहे अभयेंसी ॥३९॥
पुत्र मित्र बंधु सुखाचे शेजारी । अंगराखी झाले कार्यरूपी ॥४०॥
कार्यरूपा वर्तती आपुलिया स्वार्था । एवढा रथा चालविता स्वामी माझा ॥४१॥
अंध पंगु बधिर व्रात्य पोटा आलों । समर्थं पाळिलों स्वसामर्थ्यें ॥४२॥
लौकिकीं मिरविला नामधारक केला । संजीवनमेळा जीवन ज्याचें ॥४३॥
कोणाची पै नांवें किती पै वर्णावीं । काशी रामेश्वरी प्रीतीपूर्वीं ॥४४॥
गुरुरूपी अवतार होती थोरथोर । अहर्निसीं विचार सर्वकाळ ॥४५॥
तेचि माझी चिंता सर्वकाळ कर्ते । श्रीगुरु समर्थं देवरूपें ॥४६॥
रंका दिव्यरूप करोनी ठेविलें । आनंदमूर्ति केलें आनंदरूप ॥४७॥