आनंदलहरी

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


मंगलाचरण

श्रीगणेशाय नमः

। ॐ नमो सच्चिदानंदघना । ॐ नमो सकळ सुखांचिया निधाना । ॐ नमो परात्पर निर्गुणा । जगज्जीवना मूळबीजा ॥१॥

ॐ नमो सकळ व्यापका । आनंदा आनंद तुझेनि देखा । सकळातें तूंचि प्रतिपाळिता । तो तूं लोकां प्रतक्ष ॥२॥

ॐ नमो अव्यक्त परब्रह्मा । सर्व सुखांचिया धामा । ॐ नमो भक्तांच्या कल्पद्रुमा । तुज उपमा आनु नाहीं ॥३॥

ॐ नमो आदिपुरुषा आदिदेवता । ॐ नमो उत्पत्ति प्रळय रहिता । पाहतां तूं सकळांचा नियंता । सकळभूतां सत्ता तुझी ॥४॥

ॐ नमो ज्ञानसागरा । ॐ नमो त्रैमूर्ती अवतारा । ॐ नमो मोक्षाचिया निजधरा । विश्वंभरा तुज नमो ॥५॥

तुझें निजरुप पाहतां दृष्टीं । निजानंद न समाये दृष्टी । तुटल्या जन्ममरणाच्याः गांठी । निर्भय पोटीं मी जालों ॥६॥

बंधमुक्तीची अटाअटी । संचरली होती माझ्या पोटीं । होतां तुझी कृपादृष्टी । उठाउठी पळाली ॥७॥

तुझें निजरुप पाहतां कांहीं । बद्धमुक्त दोन्ही नाहीं । व्यापक तूं सर्वां देहीं । आनंदडोहीं जेवी तरंग ॥८॥

बंधमुक्तीची कहाणी । ऐकिली होती जेवीं स्वप्नी । जागृतीमाजी येउनी । साच मानी कोण तीतें ॥९॥