( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )
धरी आपुला हा छंद । मुरलि वाजवितो मंद ।
गीत गातो गोविंद । पाहुं चला गे बाई ॥ध्रु०॥
पांवा वाजवी गोपळ । गळां शोभे वनमाळ ।
कोटि तरणी तेजाळ । कृष्ण देवकीचा बाळ ।
वेगी दावा हो ॥१॥
करीन स्वामीचे काज । न धरी लौकिक लाज ।
देह विटंबीन आज । पाहुं चला यदुराज ॥२॥
सांडुनि शरिराचा रंग । चित्ता जाला असे भंग ।
धरा कृष्णजीचा संग । पाहुं चला श्रीरंग ॥३॥
रामदासाची आस । जीव जाला उदास ।
धरुं मी कवणाची कांस । सहजी सहज प्रकाश ।
प्रकाशला हो बाई ॥४॥