श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १०६ ते ११०

मेखलावान्‌ मन्दगति: मतिमत्‌-कमलेक्षण: ।
महाबल: महावीर्य: महाप्राण: महामना: ॥१०६॥
५८५) मेखलावान्‌---कटिप्रदेशावर कमरपट्टा धारण करणारा.
५८६) मन्दगति---काहीच प्राप्तव्य नसल्याने, घाई नसल्याने हळुवार, डौलबाज चालणारा, प्रेमह्नभक्ति-निष्ट नसल्यामुळे ज्यांना ज्ञान-कर्मामध्ये गती नाही त्यांना गती देणारा.
५८७) मतिमत्‌कमलेक्षण---बुद्धीची चमक असणारे कमलनेत्र असणारा.
५८८) महाबल---सर्वशक्तिमान्‌.
५८९) महावीर्य---महापराक्रमी.
५९०) महाप्राण---महान्‌ प्राणशक्तिसंपन्न.
५९१) महामना---मनस्वी. मोठे मन असणारा.
यज्ञ: यज्ञपति: यज्ञगोप्ता यज्ञफलप्रद: ।
यशस्कर: योगगग्य: याज्ञिक: याजकप्रिय: ॥१०७॥
५९२) यज्ञ---यज्ञस्वरूप.
५९३) यज्ञपति---यज्ञांचा पालनकर्ता.
५९४) यज्ञगोप्त---यज्ञांचा संरक्षक.
५९५) यज्ञफलप्रद---यज्ञाचे फळ देणारा.
५९६) यशस्कर---यश देणारा.
५८७) योगगम्य---योगाने आकलन होणारा.
५९८) याज्ञिक---यज्ञ करणार्‍या ऋत्विजस्वरूप असणारा.
५९९) याजकप्रिय---यज्ञ करणार्‍यांना प्रिय असणारा.
रस: रसप्रिय: रस्य: रञ्जक: रावणार्चित: ।
रक्षोरक्षाकर: रत्नगर्भ: राज्यसुखप्रद: ॥१०८॥
६००) रस---आनंदस्वरूप.
६०१) रसप्रिय---गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे षड्‌रस प्रिय असणारा किंवा शृंगार-वीर-करुण-अद्‌भुत-हास्य-रौद्र-भयानक-बीभत्स-शान्त हे वाङमयीन रस आवडणारा.
६०२) रस्य---ज्याच्या नामस्मरणात रसमयता आहे असा. रूक्षता नसलेला.
६०३) रञ्जक---मनोरञ्जक.
६०४) रावणार्चित---रावणाने पूजा केलेला. शंकराकडून आत्मलिंग मिळविल्यानंतर अनिष्टापासून देवतांना वाचाविण्यासाठी गुराखी रूपात आलेल्या गणराजाची रावणाने विनंतिरूपात अर्चना केली. गोकर्ण-महाबळेश्वराची कथा येथे अभिप्रेत.
६०५) रक्षोरक्षाकर---राक्षसांना भस्मसात्‌ करणारा.
६०६) रत्नगर्भ---उदरात रत्ने असणारा.
६०७) राज्यसुखप्रद---राज्यसुख प्रदान करणारा.
लक्ष्यं लक्ष्यप्रद: लक्ष्य: लयस्थ: लङ्डुकप्रिय: ।
लानप्रिय: लास्यपर: लाभकृत्‌-लोकविश्रुत: ॥१०९॥
६०८) लक्ष्यं---प्रणवरूपी धनुष्यद्वारा चित्तरूपी बाणाने वेधण्यास योग्य असे ब्रह्म.
६०९) लक्ष्यप्रद---निर्विघ्नतापूर्वक लक्ष्याची प्राप्ती करून देणारा.
६१०) लक्ष्य---‘तत्त्वमसि’ इ. महावाक्यांतील पदांचा बोध करणार्‍या लक्षणाशक्तीने व्यक्त असणारा. नमुचीपुत्र तारकासुराने उग्र तप करून ब्रह्मदेवला प्रसन्न करून घेतले होते. ब्रह्मदेवाने त्याला अमरत्वाचा वर बहाल केला होता. पण शिवाचा थोरला पुत्र याला अपवाद राहील असे ब्रह्मदेवाने त्यास तेव्हा सांगितले होते. तारकासुराने त्यामुळे सर्वत्र उच्छाद मांडला होता, देवही त्याच्या उन्मत्तपणाने भयभीत झाले होते. शिवपुत्राने. तारकासुराचा वध करण्यासाठी अजून शिवांचा विवाहही झालेला नव्हता त्यामुळे सर्व देव चिंतित झाले.
चिंतित झालेले देव कैलासावर गेले पण तिथे शिव समाधिस्थ झालेले होते. देवांनी मदनाच्या साहाय्याने सृष्टिसौंदर्य, सुंदर वातावरण, सुंदर सुगंध निर्माण करवून शिवाचा समाधिभंग केला. क्रुद्ध शिवांनी तिसरा नेत्र उघडून मदनाचे भस्म केले. परंतु मदनाने त्याअगोदरच शिवांच्या मनात कामजागृती केली होती. तेवढयात पार्वती भिल्लीणीच्या रूपात शिवासमोर य़ेऊन बहारदार नृत्य करून नाचू लागली. गाऊ लागली. तिचे ते अप्रतिम सौंदर्य पाहून शिव बेचैन झाले. हिमालयाने आपली कन्या पार्वती हिचेबरोबर शिवांचा विवाह लावून दिला.
एकदा पार्वती आणि शिव एकांतात असताना अग्निदेव ब्राह्मणरूपात दारी येऊन भिक्षा मागू लागला तेवढयात शिवाचे वीर्य तीनदा  स्खलित झाले ते पार्वतीने ओंजळीत पकडले आणि तेच ब्राह्मणाच्या हातात ठेवले. त्यामुळे अग्नीचा दाह झाला. ती शक्ती त्याने गंगेत (शिवपत्नी) सोडून दिली. गंगेवर सहा कृत्तिका पाणी प्यायला आल्याने ते वीर्य त्यांच्या पोटात गेले. त्यांना दिवस गेले. ही गोष्ट कोणाला कळू नये म्हणून एका शरवनात त्यांनी उदरातील गर्भ काढून ठेवले. त्यातून सहा मुखे असलेले बालक निर्माण झाले. नारदांकडून पार्वतीला समजल्याबरोबर तिने ते षडाननरूपी बालक कैलासावर आणले.
शिवशक्तीच्या त्रिवार स्कंदनातून (रेतस्खलन) त्याची उत्पत्ती म्हणून त्याचे नाव स्कंद असे पडले. सहा कृत्तिका त्याच्या माता ठरल्या म्हणून तो षण्मातुर ठरला. शरवनात जन्म झाल्यामुळे शरजन्मा आणि अलौकिक पराक्रमामुळे शिवांनी त्याला आपला सेनापती नेमला म्हणून तो महासेन ठरला शिवांचा तो प्रथमपुत्र ठरला म्हणून देव आनंदित झाले. तारकासुराचा वध आता दूर नाही याबद्दल सर्वांना खात्री पटली.
तारकासुराची आणि स्कंदाची घनघोर लढाई जुंपली. तारकासुराचे सैन्य बळी पडले पण तारकासुर मात्र जिवंतच राहिला तेव्हा स्कंदाने पित्याला याविषयी विचारले तेव्हा शिवाने घृष्णेश्वराकडे बोट दाखवून स्कंदाला म्हटले - “अरे बाळा, युद्धावर जाताना तू आम्हा दोघांना वंदन करून गेलास पण ॐ काराची पूजा न करताच गेलास त्यामुळे तुला युद्धात यश आले नाही. आता ती चूक दुरुस्त कर. घृष्णेश्वरी जाऊन ॐ कार गणेशाची आराधना कर. त्याची कृपा संपादन कर म्हणजे तुला युद्धात यश येईल.”
पार्वतीच्या सांगण्यानुसार तो घृष्णेश्वरी गेला. अन्नपाणी वर्ज्य करून विघ्नहर्त्या विनायकाच्या तपाची एक लक्ष अनुष्ठाने केली. ॐ कार गणेश त्याला प्रसन्न झाले. त्यांनी स्कंदापाशी असलेल्या एका बाणावरून हात फिरविला व आपले वाहन मयूर स्कंदाला दिले व ते अंतर्धान पावले.
स्कंदाने तेथे एका गणेशमूर्तीची यथासांग प्रतिष्ठापना केली. एक लक्ष अनुष्ठनामुळे गणेश प्रसन्न झाले म्हणून ‘लक्षविनायक’ नावाने त्यांचा जयघोष केला व रणांगणावर तारकासुराचा वध केला. घृष्णेश्वराच्या मंदिराजवळ स्कंदाने प्रतिष्ठापित केलेली ही मूर्ती आहे. औरंगाबाद शहरापासून घृष्णेश्वर हे क्षेत्र चोवीस कि.मी. वर आहे.
६११) लयस्थ---प्रलयकालातही स्थित राहणारा. चित्तलय स्थितीत विद्यमान.
६१२) लड्डुकप्रिय---लाडवांच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा. लड्डुकाची पाककृती खालील श्लोकात दिली आहे.
लड्डुका: वर्तुलाकारा: प्रियालतिलखसखसै: ।
रचिता: शर्करापक्वा: तत्‌प्रिय: लड्डकप्रिय: ॥
चारोळी अथवा खोबरे, तीळ आणि खसखस साखरेच्या पाकात घालून केलेले लाडू ज्याला आवडतात तो लड्डुकप्रिय.
६१३) लानप्रिय---लान म्हणजे गजशाला. गजशालांवर प्रेम असणारा. म्हणजे अतिवैभवसंपन्न.
६१४) लास्यपर---लास्य म्हणजे हावभावयुक्त नृत्य. नृत्य आवडणारा किंवा विलासयुक्त परमधामात असणारा.
६१५) लाभकृल्लोकविश्रुत---लाभ करून देणार्‍यांमध्ये सर्वश्रेष्ठ लाभदाता म्हणून प्रसिद्ध.
वरेण्य: वह्निवदन: वन्द्य: वेदान्तगोचर: ।
विकर्ता विश्वतश्चक्षु: विधाता विश्वतोमुख: ॥११०॥
६१६) वरेण्य---सर्वश्रेष्ठ. श्रीगणेशाची उत्कट भक्ती करून गणेशरूप झालेला वरेण्यराजा.
६१७) वह्निवदन---अग्नी हेच ज्याचे मुख आहे. हविर्द्रव्याने दिलेल्या आहुतीने तृप्त होणारा.
६१८) वन्द्य---वन्दनीय.
६१९) वेदान्तगोचर---उपनिषदांतून जाणला जाणारा.
६२०) विकर्ता---काम, क्रोध, लोभ, मोह, मद, तत्सर या षडविकारांचा प्रवर्तक. विशेष गोष्ट करणारा.
६२१) विश्वतश्चक्षु---सर्वत्र नजर असणारा. विश्वाच्या चक्षूंनी विश्वातील प्राणिमात्रांचे व्यापार पाहणारा. त्यांच्यावर नजर ठेवणारा.
६२२) विधाता---सृष्टिनिर्माता. धारण करणारा.
६२३) विश्वतोमुख---विश्वव्यापी, विश्वरूप. सगळीकडे मुखे असणारा.