गणेश पूजा विधी 2

खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे.


प्रार्थना व क्षमाप्रार्थना

प्रार्थना: 'हे गणराया! आपण विघ्नांवर विजय मिळविणारे आहात. देवांचे प्रिय आहात.' हे विनायका! आपण ज्ञानसंपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार. 'हे देवा! आपण नेहमी माझ्या कार्यात येणार्‍या विघ्नांचा सर्वनाश करा.'

क्षमा प्रार्थना-
पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.

मंत्र: 'हे प्रभू! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.' 'हे प्रभू! मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर. मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न रहाल अशी अपेक्षा करतो.

प्रणाम किंवा पूजा समर्पण

विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. (प्रथम साष्टांग प्रणाम करा, त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडून द्या)

मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महागणपती संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही त्याचा अधिकार आहे.
ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती: