गणेश चतुर्थी व्रत

गणेश चतुर्थी व्रत


श्रीगणेशव्रतांची माहिती

जीवनात, सर्वक्षेत्रांत भाग्योदय होण्यासाठी भाविक लोक वेगवेगळीं व्रतें करतात. व्रतांत थोडेतरी देहकष्ट होतातच. म्हणूनच व्रत म्हणजे तप असें मानण्यात येते. कारण 'तप' या शब्दाचा अर्थ कष्ट सहन करणें, शारीरिक व मानसिक क्लेश सहन करून निर्धारपूर्वक प्रयत्‍न करणे असा आहे. गणेश हे 'मूळारंभ आरंभ' असें श्रेष्ठ दैवत असून, वेगवेगळ्या अवतारानुसार त्याच्या मुख्य तीन जयंत्या मानतात.

(१) वैशाखीपौर्णिमा, (२) भाद्रपद शुक्ल चतुर्थी (३) माघ शुक्ल चतुर्थी. गणेशव्रतें अनेक असलीं, तरी काही प्रचलित व्रतांची उपयुक्त माहिती येथें थोडक्यात देत आहे.

(१) गणेश पार्थिवपूजा व्रत : हे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत करतात. काळ्या चिकणमातीच्या मूर्तीची रोज पूजा करून ऋषीपंचमीचे दिवशी मूर्तीचे विसर्जन करतात.
(२) एकवीस दिवसांचे व्रत : श्रावण शुद्ध चतुर्थीपासून श्रावण वद्य दशमीपर्यंत हे व्रत करतात. पूजेसाठी फुलें, दुर्वा, मोदक वगैरे वस्तू एकवीस असाव्या लागतात.
(३) तीळचतुर्थी व्रत : माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी दिवस भर उपोषण करून गणपती पूजन करतात. गणपतीच्या मंत्राचा जप करतात. सफेत तिळांच्या २१ लाडवांचा नैवेद्य दाखवतात. रात्रीं पारणें (भोजन) करतात.
(४) दुर्वागणपती व्रत : विनायक चतुर्थी जेव्हां रविवारी येईल तेव्हा या व्रताला प्रारंभ करून त्या दिवसापासून सतत सहा महिने हें व्रत करतात. प्रत्येक दिवशी पूजा करून ६ नमस्कार, ६ प्रदक्षिणा, ६ दुर्वा व ६ मोदक किवा लाडू अर्पण करतात. त्या मुदतींत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला पूजा करून २१ नमस्कार व २१ प्रदक्षिणा करून २१ मोदकांचा नैवेद्य दाखवतात.
(५) वट गणेश व्रत : हे व्रत कार्तिक शुद्ध चतुर्थीपासून माघ शुद्ध चतुर्थीपर्यंत करतात. प्रत्येक दिवशीं वडाच्या झाडाखाली गणपतीची पूजा व जप करतात.
(६) सत्य विनायक पूजा व्रत : मिलिंदमाधवकृत 'श्रीसत्यविनायक व्रतकथा' (ताडदेव प्रकाशन ) या पोथींत या व्रताची संपूर्ण माहिती व कथा दिलेली आहे. ती घेऊन व्रत करावें.
(७) विनायकी चतुर्थी : प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला हे व्रत करतात. रात्री चंद्रदर्शन घेतल्यावर उपवास सोडतात.
(८) महासिद्धिविनायक चतुर्थी व्रत : (गणेश चतुर्थी ) भाद्रपद शुद्ध चतुर्थी. हे व्रत सर्वांना ठाऊकच आहे. या दिवशी घरोघर गणेश उत्सव साजरा करतात. आपला हा एक मोठा सण व आनंदाचा दिवस आहे.
(९) संकष्टी व अंगारकी चतुर्थी : 'संकष्ट चतुर्थी' [अंगारकी संकष्ट चतुर्थी] व्रतकथा (ताडदेव प्रकाशन) या पोथींत या व्रताची संपूर्ण माहिती दिली आहे. गणेश भक्तांनी ही पोथी संकष्टीच्या दिवशी अवश्य वाचावी. अंगारकी चतुर्थीचे व्रत शीघ्रफलदायक आहे.