श्रीमत् सद्गुरु स्वामी जय जय गणराया ।
आपण अवतरला जगि जड जिव ताराया ।। ध्रु. ।।
ब्रह्म सनातन जे का तें तूं साक्षात।
स्थावरजंगमि भरला तुम्हि ओतप्रोत।
तव लीलेचा लागे कवणा नच अंत।।
तुज वानाया नुरले शब्दहि भाषेत ।।1।।
वरिवरि वेडेपण ते धारण जरि केले।
परि सत्सवरुपा आपुल्या भक्तां दाखविले।।
निर्जल गर्दाडसी जल ते आणविले।
विहंग नभीचे काननि आज्ञेत वागविले ।।2।।
दांभिक गोसाव्यातें प्रत्यय दावून।
ज्ञानिपणाचा त्याचा हरिला अभिमान।।
ओंकरेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन।।
नर्मदेने भक्तां करवियले रक्षण ।।3।।
अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा ।।
दुस्तरशा भवसागरि तरण्या दे हाता।।
वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता।
दासगणूच्या ठेवा वरद करा माथा ।।4।।