श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.