श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


गुरुगुण गावे जरी तुजला सौ...

गुरुगुण गावे जरी तुजला सौख्य असावें ॥ध्रु०॥

काम क्रोध षड्रिपु मर्दावे ! क्षमा शांति सन्मित्र वरावे ॥

सदा संतपदकंज घरावे । तरीच जगावें ॥जरी०॥१॥

यमनियमादीं सादर व्हावें । शीलपालनीं दक्ष असावें ॥

पर उपकारी आधीं मरावें । बहुश्रुत व्हावें ॥जरी०॥२॥

परगुणकथनीं प्रेम असावें । निजकथनीं त्वां मौन धरावें ॥

दोषेक्षण अवधें सोडावें । समदृग व्हावें ॥जरी०॥३॥

पाद तीर्थयात्रें झिजवावें । श्रवण हरिकथाश्रवणीं भावें ॥

गुरुगुणगानीं मुख रत व्हावें । नम्र असावें ॥जरी०॥४॥

कीर्तीनें जग सर्व भरावें । सहज कर्य तें नित्य करावें ॥

’रङ्ग’ वासनामूळ नसावें । स्थिरमति व्हावें ॥जरी०॥५॥