श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


विदेशी विद्येच्या नादीं ल...

विदेशी विद्येच्या नादीं लागियेलों । स्वार्थास मूकलों धांव आतां ॥१॥

निंदियेले संत सज्जन महंत । भवसुखजंत तारीं देवा ॥२॥

देवहीन रंक वाढलों मी शंख । अविद्येचा पंक क्षाळीं वेगीं ॥३॥

नीचाहुनी नीच परी तव दास । करीं ना उदास गुरुराया ॥४॥

मातेनें लाथेनें ताडितां हो वत्स । जलें विण मत्स्य केवीं राहे ॥५॥

पडेल देऊळ पूजकाचे वरी । तरी कैसी परी होय जगीं ॥६॥

येईं रे येईं तूं अनाथांच्या नाथा । सद्‌गुरुसमर्था पाव आतां ॥७॥

तळमळे ’रंग’ करीं भवभंग । दाखवीं श्रीरंग पाय तुझे ॥८॥