श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


जाग रे राजसा सच्चिद्‌घन ह...

जाग रे राजसा सच्चिद्‌घन हंसा । परम पुरुषा जाग वेगीं ॥१॥

कर्में बांधियेलें मोहें व्यापियेलें । तेणें तळमळे झोंपीं जीव ॥२॥

श्रुतिबंदिजन गाती मधुस्वन । तत्त्वमसि भान ऊठ वेगीं ॥३॥

झोंपेचें हें सोंग टाकुनी सवेग । ऊठ बा निःसंग पहांट झाली ॥४॥

अरुण उदेला अंधकार गेला । असुरांचा मेळा लोपला तो ॥५॥

द्विज उभे ठेले पाय वंदियेले । स्नानासी आणिलें प्रेमजल ॥६॥

चक्रवाकपिल्लीं जीवशिवमेळीं । एकरस झालीं ब्रह्मानंदीं ॥७॥

हंस ऊठियेला सोहंभाव ठेला । कोहं मावळला ’रंग’ तम ॥८॥