श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


संत ओळखावे शीतळ स्वभावें ...

संत ओळखावे शीतळ स्वभावें । तनु मन भावें सेवा कीजे ॥१॥

मृदु नवनीत कठिण पर्वत । प्रसंग उदित होई जैसा ॥२॥

मुखीं रामनाम अन्य नसे काम । पाहतां विश्राम वाटे जीवा ॥३॥

पर उपकारें झिजविती देह । ब्रह्मांडीं निःस्नेह वर्तताती ॥४॥

आप पर नाहीं निःसंग सदाही । रागद्वेष कांहीं नसे जेथें ॥५॥

दया तोचि धर्म दान तेंचि कर्म । तितिक्षेचें वर्म मूर्तिमंत ॥६॥

पतित उद्धार हाचि कुलाचार । ’रंग’ मिथ्याचार लेश नसे ॥७॥