श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


पतिताचा तात तूंचि भगवंत ।...

पतिताचा तात तूंचि भगवंत । उद्धरिसी जंत केव्हां बापा ॥१॥

पीडियेलों भारी दत्ता ह्या संसारीं । धांव बा मुरारी धांव आतां ॥२॥

तस्करें वधितां धांवलासी ताता । विलंब कां आतां करितोसी ॥३॥

प्रह्लादाचे हांकें स्तंभ तो कडाके । दितिसुत धाकें पाडियेला ॥४॥

गजेंद्र धरिला वेगें सोडविला । वेळ कां लाविला दीननाथा ॥५॥

द्रौपदीकारणें ओढितां खलानें । वस्त्ररुप होणें लोपलें कां ॥६॥

फूटलें नशीब रुठला तो शिव । धिक् धिक् कींव येई ना कीं ॥७॥

कोणा बाहूं आतां कोंण असे त्राता । कोण देई शांती परदेश्या ॥८॥

पातलोंसे द्वारीं जन्माचा मिकारी । कृपेची भाकरी देई देवा ॥९॥

ब्रीदातें सांभाळीं अगा वनमाळी । ’रंग’ प्रतिपाळीं पोरका हा ॥१०॥