संत नामदेवांचे अभंग

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


संत नामदेवांचे अभंग - जनाबाईचा निश्चय

१.
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंवें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥
२.
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥
स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥
ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
३.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ॥१॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥
आवडीनें जगजेठी । गळां घालूनियां मिठी ॥३॥
आवडीनें गुज कानीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
४.
जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण । बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा । गजर दासी जनीचा ॥४॥
५.
तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आम्हांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥
६.
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे बैकुंठीं ॥१॥
सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥
नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रूप न्याहाळीन द्दष्टीन । सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥४॥
दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥
७.
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥
झालें नामाचेनि बळकट । तेणें बैकुंठ पायवाट ॥२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अम्हांसवें खेळे ॥३॥
दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥
८.
माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा । कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरूं । जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥
९.
आम्ही पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हाणे सृष्टीवरी । एक अससी तूं बा हरी ॥३॥
१०.
मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
जिव्हे करूं नित्य नेम । सदा विठोबाचें नाम ॥२॥
नामामध्यें नामसार । जप करी निरंतर ॥३॥
म्हणे जनी नाम घेणें । नाममंत्रें शंकर होणें ॥४॥
११.
स्मरण तें हेंचि करूं । वाचे रामराम स्मरूं ॥१॥
आणिक न करूं तें काम । वाचे धरूं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ॥३॥
१२.
मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आम्हां काय उणे । दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन । करूं देवा हो आधिन ॥३॥
१३.
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर द्दढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं द्दढभाव । ह्रदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली । ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥
१४.
नित्य सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ॥१॥
वनवासी कां धाडिलें । कृपळें बा हो विठ्ठलें ॥२॥
आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥
काम क्रोध विषय झाले । हे तों मोहोनि राहिले ॥४॥
अवलोकूनि कृपा द्दष्टि । जनी म्हणे देईं भेटी ॥५॥
१५.
करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरूं संतसंग । मुखीं म्हणूं पांडुरंग ॥२॥
करूं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करूं । नाम बळकट धरूं ॥४॥
१६.
आनंदाचे डोहीं । जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीतेनें जन्मला । हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी । वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं । देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥
१७.
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥
न लगे संतति धन आणि मान । एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायी आमुचें बोलणें । तुमची तुन्ही आण सांगा हरी ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळूनि । म्हणे रासी जनी नामयाची ॥५॥
१८.
आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुम्ही ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी । तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले । ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥
१९.
मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥
हाचि माझा द्दढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥
आम्हां दासीस हें काम । मुखीं विठ्ठल हरिनाम ॥३॥
सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥
२०.
नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय । दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥
२१.
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रम्हा । बोल ठेवी कर्मा आपुलिल्या ॥२॥
शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आम्हांसी ग्रवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥
२२.
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुम्ही ॥३॥
जनी म्हणे देवा मी झालें येसवा । निघालें केशवा घर तुझें ॥४॥