श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


श्रीगुरुठायी सर्व अर्पोणि विश्वास । करावा अभ्यास गुरु निकट ॥१॥

मात्र जंव नाहीं विषयी अभिरुची । करावा तंवची अभ्यास हा ॥२॥

नव्हतां ऐसें तरी वीस पंचवीस । निकृष्ट ते तीस मर्यादा हे ॥३॥

केलियाहि साधे चाळीस तोंवरी । साधे मगही परी येवोनि जन्मा ॥४॥

सारोनिया आधीं साधनें संपुर्ण । रचावें सासन गुरुकृपें ॥५॥

नित्यनिशीं एकांती द्वादश वर्षे वरी । अद्वय श्रीहरी प्रगटेल ॥६॥

कोटी सुदर्शनें अनंत रवी दीप्ती । देही निर्वाळिती तेज प्रमा ॥७॥

अमित चंद्र सुर्य उन्मनीचे तेज । तुंचि तु सहज होशी तेणें ॥८॥

सुखाचा सागर आनंदाचा कंद । सर्वत्र गोविंद होशील तु ॥९॥

नसे या पर तें ब्रह्मांडी आणिक । निर्वाणिंचे सुख मोठें आहे ॥१०॥

घाले संत यांचि गुरुकृपा ज्ञानें । लामतां जें होणें आपेआप ॥११॥

देहीचा निजदेव लक्षाव प्रत्यक्ष । ज्ञान अपरोक्ष तें हें ऐसें ॥१२॥

ऐशा आत्मज्ञानें व्हावें ब्रह्मा । वर्णिती निगम शास्त्रें संत ॥१३॥

ज्ञानवीण कळा तेचि अवकळा । नलभे सोहळा ब्रह्मीची तो ॥१४॥

एक गुरुकृपाज्ञानचि तारक । नसेनि आणिक त्रिभुवनीं ॥१५॥

याचि लागीं तेहि गुरुसी शरण । प्रत्यक्ष राम कृष्ण हरि हर ॥१६॥

न करितां विचार शरण योगी यांसी । व्हावें कवणांसी पुसी नये ॥१७॥

होका मायाबाप गुरु देव पती । ऐकों नये येती आड जरी ॥१८॥

येती आड जाती नेमें तें पतनी । कुळेंसि अक्षय दोन्हीं बेचाळीस ॥१९॥

माता पिता पती जरी गुरु थोर । नाही अधिकार वर्जावया ॥२०॥

अथवा तयां मयें नव्हतां शरण । निश्चयें पतन घडे तयं ॥२१॥

यालागी रिघावें योगियां शरण । न लावितां क्षणः साधावें तें ॥२२॥

जरी नोहे साध्य पुर्ण जन्में याचि । गुरुदासां साधेचि जन्मोनिया ॥२३॥

वायां गेले ऐसें नाही आयकिल । शरण रिघाले योगीयाचे ॥२४॥

अनन्य जे भावें योगियांचे झाले । निश्चये उद्धरिले तेव्हांचि ते ॥२५॥

येर व्यर्थ कानी सांगती अक्षरु । म्हणतां तया गुरु महादोष ॥२६॥

तोचि गुरु नेत्रीं दावी देही देव । कृपा अनुभव साक्षात्कार ॥२७॥

म्हणे जनार्दन पहावा अंतर्द्दष्टी । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥२८॥