अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १ ला

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.


श्लोक २१ ते ३०

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

अर्जुन उवाच

सेनयोरुयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ‍ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् ‍ रणसमुद्यमे ॥२२॥

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥

म्हणे सर्वातून । कोणाशीं झुंजावे । लागे हें पहावें । म्हणोनियां ॥२७७॥

दोन्ही सैन्यामाजीं । नेवोनि त्वरित । देवा माझा रथ । उभा करीं ॥२७८॥

जोंवरी हे सर्व । वीर धीट धीट । क्षणभरी नीट । न्याहाळीन ॥२७९॥

बहु उतावीळ । दुष्ट हे कौरव । झुंजायाची हांव । बाळगिती ॥२८०॥

नाहीं रणीं धैर्य । नाहीं पराक्रम । आवडे संग्राम । परी ह्यांतें ॥२८१॥

रायालागीं ऐसा । सांगोनि वृत्तांत । संजय तो तेथ । काय बोले ॥२८२॥

संजय उवाच ---

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ‍ ॥२४॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ‍ ।

उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरुनिति ॥२५॥

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पिता महान ।

आचार्यान्मातुलान्भातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥

श्वशुरन्सुहृदश्वैव सेनयोरुभयोरपि ।

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ‍ ॥२७॥

कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ‍ ।

म्हणे राया ऐकें । ऐशा परी पार्थे । सांगतां श्रीकांतें । काय केलें ॥२८३॥

चालविला रथ । हांकवोनि वाजी । दोन्हीं सैन्यामाजीं । उभा केला ॥२८४॥

भीष्म -द्रोणादिक । जेथें आप्तजन । आणि भूप -गण । पुढें उभा ॥२८५॥

थांबवोनि रथ । तेथें धनुर्धर । पाहे दळभार । उत्कंठेनें ॥२८६॥

मग म्हणे देवा । येथें पाहें पाहें । गोत्र -गुरु ना हे । सकळ हि ॥२८७॥

ऐकोनि हे बोल । कृष्णदेवराय । पावोनि विस्मय । क्षणभरी ॥२८८॥

मनीं म्हणे येथें । पार्थ धनुर्धारी । ऐसें काय करी । कोण जाणे ! ॥२८९॥

परि कांहीं तरी । दिसे विलक्षण । सहजें लक्षून । भवितव्य ॥२९०॥

कृष्ण तो सर्वज्ञ । प्रभु हृदयस्थ । उगा राहे स्वस्थ । तिये काळीं ॥२९१॥

तों चि पार्थें तेथें । देखिले सकळ । गुरु बंधु मातुल । आजे काके ॥२९२॥

आप्त इष्ट मित्र । देखिले कुमार । सर्व परिवार । आपुला चि ॥२९३॥

मुलें नातू सखे । आणिक सोयरे । देखिले सासरे । स्नेहीजन ॥२९४॥

संरक्षिलें होतें । जयां विपत्तींत । किंवा उपकृत । केलें ज्यांसी ॥२९५॥

असो ऐसे सर्व । वडील धाकुले । तेथें सज्ज झाले । झुंजावया ॥२९६॥

दोहीं दळीं ऐसें । आपुलें चि गोत । देखोनियां तेथ । तिये वेळीं ॥२९७॥

पार्थाचिया मनीं । झाली गजबज । करुणा सहज । उपजली ॥२९८॥

तेणें अपमानें । देखा वीर -वृत्ति । गेली तयाप्रति । सोडोनियां ॥२९९॥

कुलीन सुरुप । सद्‌गुणी ललना । तेजें साहती ना । सवतीतें ॥३००॥

रंगला नूतनीं । जैसा कामीजन । जाय विसरोन । निजपत्नी ॥३०१॥

न पाहे योग्यता । घेतां तिचा छंद । होय मति -मंद । वेडावला ॥३०२॥

तपोबळें किंवा । प्राप्त होतां ऋद्धि । भ्रंशोनियां बुद्धि । तापसाची ॥३०३॥

मग तया तैसी । नाठवे विरक्ति । तैसी झाली स्थिति । अर्जुनाची ॥३०४॥

तयाचें हृदय । कारुण्यें ग्रासिलें । म्हणोनि लोपलें । पौरुष तें ॥३०५॥

मांत्रिकासी जैसें । झपाटितें भूत । जरी चुकी होत । मंत्रोच्चारीं ॥३०६॥

तैसा महामोहें । ग्रासिला तो वीर । म्हणोनियां धीर । गेला त्याचा ॥३०७॥

देखां चंद्रकला । स्पर्शतां क्षणांत । मणि चंद्रकांत । द्रवे जैसा ॥३०८॥

तैसें अतिस्नेहें । द्रवतां हृदय । खिन्न धनंजय । काय बोले ॥३०९॥

अर्जुन उवाच

दृष्टेवमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ‍ ॥२८॥

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।

वेपथुश्व शरीरे मे रोमहर्षश्व जायते ॥२९॥

गाण्डीवं स्त्रंसतें हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।

न च शक्रोम्यवस्थातुं भ्रमतीव न मे मनः ॥३०॥

म्हणे ऐकें देवा । पाहिला मेळावा । दिसे हा आघवा । गोत्रवर्ग ॥३१०॥

कराया संग्राम । सर्व हे उद्युक्त । परी तें उचित । नव्हे आम्हां ॥३११॥

काय नेणों कैसें । गेलें अवसान । माझें मज भान । नुरे आतां ॥३१२॥

ह्यांसवें लढावें । नको हा विचार । मन बुद्धि स्थिर । ठायीं नोहे ॥३१३॥

देखें देहीं कंप । जिह्रा झाली जड । तोंडासी कोरड । पडे माझ्या ॥३१४॥

थरारे सर्वाग । जणूं घेई पेट । विकलता येत । गात्रांलागीं ॥३१५॥

पाहें ढिला होतां । गाण्डेवाचा हात । ठरें ना तें तेथ । पडे खालीं ॥३१६॥

कळे ना तें केव्हां । गळोनियां गेलें । हृदय व्यापिलें । मोहें ऐसें ॥३१७॥

होतें वज्राहून । विशेषें दारुण । दुर्धर कठिण । पार्थ -चित्त ॥३१८॥

परी तयाहून । माया दुर्निवार । देखा कैसे थोर । नवल हें ! ॥३१९॥

जेणें युद्धामाजीं । शंकरासी हार । आणिली साचार । तो हा वीर ॥३२०॥

निवात -कवच । दैत्य केले ठार । क्षणीं तो जर्जर । झाला मोहें ॥३२१॥

भलतैसें काष्ठ । शुष्क कठिणांग । भेदीतसे भृंग । लीलेनें चि ॥३२२॥

परी कोंडे जेव्हां । कोंवळ्या कळींत । गुंतोनियां तींत । पडे जैसा ॥३२३॥

म्हणे चिरुं कैसी । पद्माची पाकळी । तेथें देई बळी । प्राणाचा हि ॥३२४॥

तैसा स्नेह -बंध । अति हळुवार । म्हणोनि साचार । तोडवे ना ॥३२५॥

आदिपुरुषाची । अगम्य ही माया । नये आकळाया । ब्रह्यातें हि ॥३२६॥

त्या चि मायायोगें । भुले धनंजय । रायासी संजय । सांगतसे ॥३२७॥

ऐकें राजा रणीं । ऐसा तो अर्जुन । देखोनि -स्व -जन । सकळ हि ॥३२८॥

युद्धाचा आवेश । विसरला तेथ । कैसें नेणों चित्त । पाझरलें ॥३२९॥

मग म्हणे कृष्णा । नये राहूं येथें । ऐसें मनीं येतें । वारंवार ॥३३०॥

सकळ स्व -जन । मारावे हे ठार । मज हा विचार । साहवे ना ॥३३१॥

मन माझें फार । होतसे व्याकुळ । सुटे आतां तोल । वाचेचा हि ॥३३२॥