अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ४ था

स्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध, नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला.


श्लोक २१ ते ३०

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।

शरीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ‍ ॥२१॥

यदृच्छालाभसंतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।

समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥२२॥

देह -अहंभाव । सोडोनि संपूर्ण । आशा ओंवाळून । टाकोनियां ॥१८८॥

चढत्या वाढत्या । आवडीनें कैसा । ब्रह्मसुख -रसा -। स्वाद घेई ॥१८९॥

म्हणोनि प्रसंगें । जें जें होय प्राप्त । तेणें चि संतुष्ट । राहे सदा ॥१९०॥

जयाचिया चित्तीं । आपपरभाव । नसे सर्वथैव । धनुर्धरा ॥१९१॥

ऐके तें तें स्वयें । होवोनियां राहे । आणि जें जें पाहे । तें हि तो चि ॥१९२॥

चाले पायीं मुखें । बोले तें आपण । सर्व क्रिया जाण । तो चि झाला ॥१९३॥

होतां आत्मरुप । विश्व चि संपूर्ण । कर्म तें कवण । बाधे तया ॥१९४॥

झाला निर्मत्सर । स्वभावें तो पाहें । शब्दें सांगावेम हें । लागे काय ? ॥१९५॥

म्हणोनियां पार्था । सर्वथा तो मुक्त । कर्मी कर्मातीत । ओळखावा ॥१९६॥

असोनि सगुण । होय गुणातीत । संशय तो येथ । नसे कांहीं ॥१९७॥

गतसङ्‌गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थिचेतसः ।

यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥

देहधारी तरी । दिसे तो निर्गुण । चैतन्यासमान । धनंजया ॥१९८॥

ब्रह्मस्वरुपाचा । लावोनियां कस । पाहतां तयास । भला चोख ॥१९९॥

ऐसा मुक्त परी । कौतुकें तो देख । करी यज्ञादिक । कर्मे जरी ॥२००॥

तरी तीं निःशेष । तयाच्या चि ठायीं । लीन होती पाहीं । स्वभावें चि ॥२०१॥

अकाळींचे मेघ । वर्षल्यावांचोन । सहजें विरोन । जाती जैसे ॥२०२॥

तैसीं यथाविधि । आचरे समस्त । सर्वथा विहित । कर्मे जरी ॥२०३॥

तरी तीं अर्जुना । पावती ऐक्यातें । नाहीं दुजे तेथें । म्हणोनियां ॥२०४॥

ब्रह्मर्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ‍ ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥२४॥

यज्ञीं मी याज्ञिक । हवन हें एक । भोक्ता तो आणिक । दुजा कोणी ॥२०५॥

ऐसा बुद्धिलागीं । नाहीं भेदभाव । हविर्मत्र सर्व । तो चि झाला ॥२०६॥

ऐसें जें जें सर्व । यज्ञ -अनुष्ठान । पाहे तो संपूर्ण । ब्रह्मरुप ॥२०७॥

तयाचें तें कर्म । ब्रह्मरुप होतां । करोनि अकर्ता । सर्वथा तो ॥२०८॥

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।

ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्रति ॥२५॥

विवेकतारुण्य । ज्यांसी प्राप्त झालें । ज्यांनीं लग्न केलें । विरक्तीशीं ॥२०९॥

मग जीवब्रह्म -। ऐक्य -योगान्गीची । उपासना साची । आरंभिली ॥२१०॥

रात्रंदिन यज्ञ -। कर्मी जे निमग्न । सोऽहं हंसः खूण । गुरु -वाक्य ॥२११॥

त्या चि हुताशनीं । मनासह ज्यांनीं । आहुति देवोनि । अविद्येची ॥२१२॥

योगरुप अग्नि -। होत्र स्वीकारिलें । याज्ञिक ते भल ए। धनंजया ॥२१३॥

दैवयज्ञ ऐसें । यज्ञासी ह्या नाम । आत्मसुख -काम। पुरवी जो ॥२१४॥

आतां अवधारीं । सांगेन आणिक । जे का उपासक । ब्रह्माग्नीचे ॥२१५॥

स्वयें ब्रह्मरुप । होवोनि आपण । सर्व ब्रह्मार्पण । करिती ते ॥२१६॥

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्रति ।

शब्दादीन्विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुह्रति ॥२६॥

संयमाग्निहोत्री । आणिक ते एक । मूळबंधादिक । त्रिभंधांनीं ॥२१७॥

संयमाग्निमाजीं । करिती हवन । सर्व हि पावन । इंद्रियांचें ॥२१८॥

वैराग्याचा सूर्य । उगवतां कोणी । कुंडे तीं रचोनि । संयमाचीं ॥२१९॥

तेथें इंद्रियाग्नि । करितां प्रकट । ज्वाळा निघे नीट । विरक्तीची ॥२२०॥

तों चि विकारांचे । पेटलें सर्पण । पांची कुंडांतून । इंद्रियांच्या ॥२२१॥

आशारुपी धूर । निघोनियां जातां । अग्नि प्रज्वाळतां । तयामाजीं ॥२२२॥

मग ते कौशल्यें । विधियुक्त देती । बहुत आहुती । विषयांच्या ॥२२३॥

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।

आत्मसंयमयोगाग्नौ जुह्रति ज्ञानदीपिते ॥२७॥

ऐशापरी कोणी । अंतरींचे दोष । क्षाळिले निःशेष । गुडाकेशा ॥२२४॥

तेचिं अवधारीं । कोणी आणिकांनीं । घेवोनि अरणी ’ । हृदयाची ॥२२५॥

तेथें विवेकाचा । मंथा ’ बळकट । बांधियेला नीट । शांतिपणें ॥२२६॥

धीरवृत्तीनें तो । धरोनि दाबून । केलें घुसळण । गुरु -वाक्यें ॥२२७॥

समरसें ऐसें । करितां मंथन । सफळ साधन । झडकरी ॥२२८॥

साधना ती होतां । ह्यापरी संपूर्ण । झालें उज्जीवन । ज्ञानाग्नीचें ॥२२९॥

ऋद्धि -सिद्धींचा जो । मोहरुपी धूर । आधीं गेला पार । निवर्तोनि ॥२३०॥

मग ज्ञानाग्नीचा । स्फुल्लिंग बारीक । दिसूं लागे देख । तेजोमय ॥२३१॥

यमनियमांनी । निर्दोष जें मन । शुष्क पेटवण । तें चि झालें ॥२३२॥

ऐसें आयतें च । लाभतां जळण । मग ज्वाळा पूर्ण । प्रकटली ॥२३३॥

त्या चि ज्वाळेमाजीं । होमिल्पा विविधा । समृद्ध समिधा । वासनांच्या ॥२३४॥

अहं -ममत्वाचें । ओतोनियां घृत । होतां चि प्रदीप्त । ज्ञानाग्नि तो ॥२३५॥

इंद्रियकर्माच्या । आहुती तयांत । देती तें दीक्षित । सोऽहं -मंत्रें ॥२३६॥

प्राण -कर्मरुप । स्त्रुवे ’च्या सहित । देतां ज्ञानाग्नींत । पूर्णाहुति ॥२३७॥

ऐक्यबोधरुप । अवमृथस्नान ’ । तेथें घडे जाण । सहजें चि ॥२३८॥

संयमाग्निमाजीं । इंद्रिय -कर्माचें । हवन तें साचें । होतां मग ॥२३९॥

आत्मसुखरुपी । उरे हुतशेष । तो चि पुरोडाश ’ । भक्षिती ते ॥२४०॥

कोणी ऐशा रीती । करोनि यजन । पावले निर्वाण । त्रिभुवनीं ॥२४१॥

यज्ञक्रिया ऐशा । जरी भिन्न भिन्न । प्राप्य वस्तु जाण । एक चि ती ॥२४२॥

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथाऽपरे ।

स्वाध्यायज्ञानज्ञाश्व यतयः संशितव्रताः ॥२८॥

एका ‘द्रव्ययज्ञ ’ । ऐसी देती संज्ञा । नाम एका यज्ञा । ‘तपोयज्ञ ’ ॥२४३॥

‘ योगयज्ञ " ऐसा । बोलिला आणिक । ‘ वाग्यज्ञ ’ हें देख । नांव एका ॥२४४॥

तेथ शब्दानें चि । शब्दाचें हवन । होतें उच्चारुन । वेदमंत्र ॥२४५॥

जेथ ज्ञानद्वारा । आकळे तें ब्रह्म । तया यज्ञा नाम । ‘ज्ञानयज्ञ ’ ॥२४६॥

सकळ हे यज्ञ । अत्यंत कठिण । ह्यांचे अनुष्ठान । दुर्घट कीं ॥२४७॥

परी जितेंद्रिय । आले जे संसारीं । ते चि अधिकारी । जाण येथें ॥२४८॥

यज्ञ -अनुष्ठानीं । प्रवीण ते भले । योग -बळें झाले । सुसंपन्न ॥२४९॥

म्हणोनियां जीव -। बुद्धीचें हवन । करिती ते जाण । आत्मरुपीं ॥२५०॥

अपाने जुह्यति प्राणं प्राणेऽपानं तथाऽपरे ।

प्राणापानगती रुद्‌ध्वा प्राणायामपरायणा ॥२९॥

कोणी प्राणद्रव्यें । करिती हवन । अभ्यासें अपान -। अग्निमाजीं ॥२५१॥

कोणी एक प्राणीं । अपान अर्पिती । कोणी निरोधिती । दोहींतें हि ॥२५२॥

ऐसें अग्निहोत्र । जे का स्वीकारिती । तयांसी बोलती । प्राणायामी ॥२५३॥

अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्रति ।

सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥३०॥

सर्व आहारांचा । करोनि संयम । हठयोगक्रम । स्वीकारोनि ॥२५४॥

कोणी प्राणाग्नींत । प्राणाच चि जाण । करिती हवन । उत्कंठेनें ॥२५५॥

ऐसे यज्ञकर्ते । मोक्षेच्छु सकळ । यज्ञें मनोमळ । प्रक्षाळिती ॥२५६॥

अविद्या संपूर्ण । जळोनियां जातां । उरे स्वभावतां निजवस्तु ॥२५७॥

तेथें नुरे अग्नि । नुरे यज्ञकर्ता । अनुभवा येतां । ऐक्यभाव ॥२५८॥

जेथें यज्ञकर्ता । होतो पूर्णकाम । सरे यज्ञकर्म । आपोआप ॥२५९॥

जेथोनि माघारें । फिरे क्रियाजात । विचार हि जेथ । प्रवेशे ना ॥२६०॥

जेथें तर्काचा हि । पोहोंचे ना हात । होई ना जें लिप्त । द्वैत -दोषें ॥२६१॥