संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


काय करुं कळा युक्ति या कु...

काय करुं कळा युक्ति या कुसरी । जाणिवेच्या परी सकळिंका ॥१॥

नलगे पहावें अबद्ध वांकुडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥२॥

नेणों वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक योगयुक्त ॥३॥

पुरणींही कोठें न मिळे पाहतां । तैसीं या अनंता नामें ठेऊं ॥४॥

आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करुं छंद कथाकाळीं ॥५॥

तुका म्हणे आम्ही आनंदेंचि धालों । आनंदचि ल्यालों अलंकार ॥६॥