संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आसनीं शयनीं जपे चक्रपाणी ...

आसनीं शयनीं जपे चक्रपाणी । लाविली निशाणीं वैकुंठींची ॥१॥

कैंचें रे बंधन आम्हा जीवन्मुक्तां । गीतीं गुण गातां विठोबाचे ॥२॥

भवसिंधुजळ झाली पायवाट । गर्जती उद्भट नामघोषें ॥३॥

प्रेमें वोसंडत नामें पिटूं टाळी । हृदयकमळीं विठोबाचे (?) ॥४॥

नाहीं कायाक्लेश न करीं सायास । धरिला विश्वास दृढ नामीं ॥५॥

तुका म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पांडुरंगें ॥६॥