संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


विठ्ठल जीवाचा सांगाती । व...

विठ्ठल जीवाचा सांगाती । विठ्ठल वसे सर्वां भूतीं ।

विठ्ठल दिसतसे सुषुप्ती । स्वप्न जागृति विठ्ठल ॥१॥

विठ्ठल सर्वांचा आधार । विठ्ठल मुक्तीचें माहेर ।

विठ्ठल साराचेंही सार । विश्वाधार विठ्ठल ॥२॥

विठ्ठल साधन परब्रम्ह । विठ्ठल कैवल्याचें धाम ।

विठ्ठल नाम परम । हरती श्रम जन्माचे ॥३॥

विठ्ठल सर्वस्वें उदार । उभारिला अभयकार ।

रुक्मादेवीस्वामी वर । करुणाकर विठ्ठल ॥४॥

विठ्ठल सकळांचा दाता । विठ्ठल सर्वां अधिष्ठिता ।

विठ्ठल भर्ता आणि भोक्ता । विठ्ठल दाता दीनाचा ॥५॥

विठ्ठल गुणांचा गुणनिधि । विठ्ठल करुणेचा उदधि ।

विठ्ठल माझी सर्व सिद्धि। विठ्ठल विधिविधान ॥६॥

विठ्ठल जीवाचा हा जीव । विठ्ठल भावाचाही भाव ।

तुका म्हणे गुणार्णव । भावाभाव विठ्ठल ॥७॥