संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


मानो न मानो तुज माझें हें...

मानो न मानो तुज माझें हें करणें । काय झालें उणें करितां स्नान ॥१॥

संतांचा मारग चालतों झाडणी । हो कां लाभ हानि कांहीं तरी ॥२॥

न तारिसी तरी हेंचि कोड मज । भक्ति गोड काज आणिक नाहीं ॥३॥

करीन सेवा कथा नाचेन अंगणीं । प्रेमसुख धणी पुरलें तें ॥४॥

महाद्वारीं सुखें वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥५॥

तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हेंचि जन्म गोड घेतां मज ॥६॥