संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


आगी लागो जाणपणा । आड न यो...

आगी लागो जाणपणा । आड न यो नारायाणा ।

घेइन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडें ॥१॥

यासी तुळे ऐसें कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं ।

काला भात दहीं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥२॥

निमिषार्ध सत्संगति । वास वैकुंठीं कल्पांतीं ।

मोक्षपदें येती । ते विश्रांति बापुडी ॥३॥

तुका म्हणे हेंचि देईं । मीं तूंपणा खंड नाहीं ।

बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥४॥