संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - नाहीं गाइलें ऐकिलें गीत ।...

नाहीं गाइलें ऐकिलें गीत । धरिली लाज सांडिलें हित ।

नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥१॥

अंगसंगें घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ।

न कळे होतें काय । बोलों नये आठवूं तें ॥२॥

आपआपणा घातकर । शत्रु मी झालों दावेदार ।

परी कृपेचा सागर । उतरीं पार तुका म्हणे ॥३॥