संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - जोडुनियां कर चरणीं ठेविला...

जोडुनियां कर चरणीं ठेविला माथा । परिसावी विनंति माझी पंढरीनाथा ॥१॥

असो नसो भाव आलों तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहें आतां पंढरीराया ॥२॥

अखंडित असावेंसें वाटतें पायीं । सांडुनी संकोच ठाव थोडासा देईं ॥३॥

तुका म्हणे आम्ही तुझीं वेडींवांकुडीं । नामें भवपाश हातीं आपुल्या तोडीं ॥४॥