संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - मनाची या खोडी काय सांगूं ...

मनाची या खोडी काय सांगूं देवा । करुं नेदी सेवा तुझी मज ॥१॥

मनाचिया ठायीं बहुत उद्वेग । करुं नेदी संग संतांचा तो ॥२॥

बळें संग जरी लावूं जाये अंगी । विषयांचे मार्गीं घाली मन ॥३॥

तुका म्हणे ऐसा मनाचा व्यापार । तेथे सारासार निवडी कोण ॥४॥