संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - कउलाची पेठ दुकान साजिरें ...

कउलाची पेठ दुकान साजिरें । मांडिले पसारे नामकेणें ॥१॥

भक्ति हेंचि पोतें नाम हे साखर । अनुभवेंसी सार भरियेलें ॥२॥

विवेक हा बैल वैराग्याची गोणी । बोधाची टांचनी शिवियेली ॥३॥

आम्हा बरोबरी तुम्ही कोणी चाला । जकात तुम्हाला पडों नेदीं ॥४॥

उद्धव हनुमंत शुकसनकादिक । जनक पुंडलीक गेले पुढें ॥५॥

कबीर मोमीन लतीब मुसलमान । सुरदास तानसेन गेले पुढें ॥६॥

चोखामेळा महार नरहरि सोनार । रोहिदास चांभार गेले पुढें ॥७॥

नामा ज्ञानेश्वर निवृत्ति सोपान । एका जनार्दन गेलें पुढें ॥८॥

तुकोबा निघाला सायुज्याच्या हाटा । प्रपंचाच्या पेठा वोस केल्या ॥९॥