अवघींच कैसीं जालींत निष्ठुर । माझा समाचार नेघे कोणी ॥१॥
गरुड हनुमंत माता रखुमाई । तुम्हां तरी काई जालें सांगा ॥२॥
भेणें म्हणों मन केलेंसे कठीण । लागे देणें घेणें म्हणोनियां ॥३॥
काय कळे कांहीं घरिं नाहीं आहारा । न्यावया माहेरा नाहीं बळ ॥४॥
तुका म्हणे रुक्मादेवी माउलिये । तुज तरी काय जालें सांग ॥५॥