संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


संत तुकाराम - पुरे एकचि पुत्र माय -पोटी...

पुरे एकचि पुत्र माय-पोटीं । हरिस्मरणें उद्धरीं कुळें कोटी ॥ध्रु०॥

धन्य वंशीं जन्मला भगीरथ । गंगा आणोनि पूर्वज केले मुक्त ॥१॥

गौतमानें आणिली गोदावरी । आपण तरोनि दुजयासि तारी ॥२॥

पांच वर्षाचें ध्रुव बाळ तान्हें । अढळ पदीं बैसलें बहुमानें ॥३॥

तेजःपुंज शीतळ सौख्यदानी । एक चंद्रप्रकाश त्रिभुवनीं ॥४॥

पहा कैसा तो पुंडलिक धीट । उभा केला वैकुंठनायक ॥५॥

रामरुपी जन्मला कीर्तिवंत । अंजनीचे उदरीं हनुमंत ॥६॥

तुका म्हणे हरिसी विन्मुख । गांधारीचे उदरीं शतमूर्ख ॥७॥