करुणाष्टके

करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे.


करुणाष्टके १ ते १०

अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥