स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥
सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥
घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥
जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी ।
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥
भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी ।
सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥
असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी ।
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥
स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥ १७ ॥
सदा प्रेमराशी तयां भेटलासी ।
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥
तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥
बहू धारणा थोर चकीत जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥
बहुसाल देवालयें हाटकाचीं ॥
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥
पुजा देखितां जाड जीवीं गळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥