विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं ।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ॥
स्वहीत माझें होतां दिसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३१ ॥
विषया जनानें मज लाजवीलें ।
प्रपंचसंगे आयुष्य गेलें ॥
समयीं बहू क्रोध शांती घडेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३२ ॥
संसारसंगे बहु पीडलों रे ।
कारुण्यसिंधू मज सोडवीं रे ॥
कृपाकटाक्षें सांभाळि दीना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३३ ॥
आम्हां अनाथांसि तूं एक दाता ।
संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३४ ॥